शिमगोत्सवानिमित्त (होळी आणि रंगपंचमी) गाड्या अडवून बलपूर्वक पैसे मागणे थांबले पाहिजे ! – अधिवक्ता संदीप निंबाळकर

सावंतवाडी – कोकणामध्ये होळी आणि रंगपंचमी हे सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. या उत्सवांचे विशेष आकर्षण असते; मात्र बर्‍याच ठिकाणी या उत्सवात अपप्रकार होतांना दिसतात. रस्त्यावर गाड्या अडवून बलपूर्वक पैसे मागितले जातात, हे थांबणे आवश्यक असून पोलिसांनी यावर निर्बंध आणला पाहिजे, असे मत अधिवक्ता संदीप निंबाळकर यांनी येथील श्रीराम वाचन मंदिरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

‘शिमगोत्सवानिमित्त होणारी लूट’ याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित या पत्रकार परिषदेत मानसोपचार तज्ञ डॉ. रूपेश पाटकर, निरामय केंद्राच्या सौ. वंदना करंबळेकर, आरे कन्झर्वेशन ग्रुपचे ऋषिकेश पाटील उपस्थित होते.

शिमगोत्सवानिमित्त शहरात, तसेच गावागावांतून लोकांना थांबवून पैशाची मागणी केली जाते. यामुळे अनेकांना अपघातास सामोरे जावे लागले आहे. काही ठिकाणी वाद होऊन त्याचे पर्यावसान हाणामारीत होते. गाड्या अडवून जो पैसा जमा केला जातो, त्याचा चांगल्या गोष्टींसाठी उपयोगही होत नाही. हे प्रकार थांबवावेत, अशी मागणी दोडामार्ग, बांदा आणि सावंतवाडी या पोलीस ठाण्यांत एका निवेदनाद्वारे केली आहे. या विषयी पोलीस गंभीर नसल्याचे दिसून येत असून त्यांनी हा विषय गांभीर्याने घेऊन अशी लूट करणार्‍यांवर कारवाई केली पाहिजे. गावागावातील पोलीस पाटलांना याची माहिती दिल्यास, या प्रकारांना आळा बसेल, असे या वेळी सांगण्यात आले.


Multi Language |Offline reading | PDF