गोव्याचे मनोहर भाई !

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर म्हणजेच गोमंतकियांचे मनोहरभाई यांची जीवनज्योत मालवली आणि केवळ गोंयकारच (गोमंतकीयच) नव्हे, तर अख्खा देश हळहळला. मनोहर पर्रीकर हे व्यक्तिमत्त्वच असे होते की, ते जातील तेथे त्यांचा ठसा उमटवत. अत्यंत कुशाग्र बुद्धीचे, सतत उत्साही, धडाडी, तत्परता, निर्णयक्षमता आदी समष्टीसाठी आवश्यक असलेल्या गुणांचा संगम म्हणजे पर्रीकर ! त्यांच्या कामाचा आवाका एवढा प्रचंड होता की, ते त्यांच्याकडे असलेल्या सरकारी खात्यांचे दायित्व व्यवस्थित सांभाळून अन्य खात्यांमधील कामांचाही पाठपुरावा घेत. गोव्यात आतापर्यंत जे कडबोळे सरकार अस्तित्वात आहे, त्यांचा एकमेव धागा मनोहर पर्रीकर हेच होते. वर्ष २०१७ मधील विधानसभा निवडणुकीनंतर गोवा फॉरवर्ड आणि भाजप यांची युती होऊ शकेल, असे गोमंतकियांना कधी वाटलेही नव्हते; पण मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकर या एकाच धाग्याच्या आधारे भाजप, मगोप, गोवा फॉरवर्ड आणि अपक्ष यांची माळ गुंफून गेली २ वर्षे गोव्यात सरकार अस्तित्वात आहे, यातच मनोहर पर्रीकर या व्यक्तिमत्त्वाची ओळख होते. वर्ष १९९० ते १९९९ या कालावधीत गोव्यात १२ मुख्यमंत्री झाले. ही अस्थिरता पर्रीकर यांच्या राजकारणातील आगमनानंतर संपली, हेही लक्षात घ्यायला हवे.

समर्पण आणि त्याग !

‘गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद (भाऊसाहेब) बांदोडकर यांच्यानंतर जनतेचा नेता असा लौकीक मनोहर पर्रीकर यांनाच मिळाला’, असे म्हटल्यासही अतिशयोक्ती ठरू नये. बांदोडकर गोमंतकियांचे भाऊ, तर हे पर्रीकर आधुनिक गोव्याचे भाई ! भाऊसाहेब बांदोडकर यांच्याप्रमाणेच एका झंझावाताप्रमाणे त्यांचे जीवन होते. स्वतःच्या कामाशी प्रामाणिकपणा, पूर्ण समर्पण आणि त्याग होता. दूरदृष्टी होती. गोव्याच्या पर्यावरणाचा समतोल साधून गोव्यात उद्योग आणणे सोपे काम नव्हते; पण राज्याकडे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आयोजनाचे दायित्व त्यांनी घेतले आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यातील हॉटेल व्यवसायासारख्या उद्योगांना भरभराटीचे दिवस आणले. तेव्हापासून आजतागायत गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरत आहे. या महोत्सवाच्या आयोजनाचे पूर्ण श्रेय पर्रीकर यांनाच जाते; कारण त्यांनीच गोव्यात आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी पायाभूत सुविधा काही मासांमध्ये निर्माण केल्या. अजूनही ते दिवस आठवतात जेव्हा ही मुख्यमंत्री पदावरील व्यक्ती रात्री १ वाजल्यानंतर स्वतःच्या छोट्या चारचाकी गाडीने महोत्सवासाठीच्या कामाच्या ठिकाणी उपस्थित राहून सर्वांचीच झोप उडवायची.

कामाचा झपाटा !

राज्यातील सर्व अडचणींवरील उपाय कोणाकडे असेल, तर ते म्हणजे पर्रीकर ! पक्षांतर्गत धुसफूस आहे भाईंना विचारा, राज्यातील प्रश्‍न आहे भाईंना विचारा, असे हे भाई देशाचे संरक्षणमंत्री झाल्यावर प्रत्येक शनिवार-रविवार गोव्यात येऊन येथील राजकीय आढावा घेऊन मार्गदर्शन करत. पंतप्रधान मोदी यांना संरक्षण मंत्रालयाचे दायित्व गोव्यासारख्या छोट्या राज्यातील मुख्यमंत्रीपदावरील व्यक्तीकडे सोपवावे वाटले, यातच पर्रीकर यांच्या कर्तृत्वाची कल्पना येते. संरक्षण मंत्रालयासाठी काम करणार्‍या शास्त्रज्ञांशी संपर्क असणार्‍या एका व्यक्तीशी नुकताच संबंध आला. गप्पांच्या ओघात त्यांनी सांगितले की, शास्त्रज्ञ ज्या वेळी संरक्षणमंत्र्यांसमोर धारिका संमतीसाठी पाठवत, त्या वेळी त्यांना विषय खूप समजावून सांगावा लागत असे. त्यानंतर संमतीसाठीही बराच काळ जात असे; मात्र मनोहर पर्रीकर संरक्षणमंत्री झाल्यावर त्यांना धारिका वाचूनच विषय समजत असे आणि शास्त्रज्ञांना अधिक काही सांगावे न लागता धारिका लगेच संमत होत. असा झपाटा सध्याच्या सुस्तावलेल्या प्रशासनात क्वचितच पहायला मिळतो. उरी आक्रमणानंतरचा आतंकवाद्यांवरील पहिला ‘सर्जिकल स्ट्राईक’ किंवा म्यानमारच्या सीमेवरील आतंकवाद्यांचा खात्मा हा पर्रीकर संरक्षणमंत्री असतांनाच झाला होता. गोमंतकियांसाठी या गोष्टी भूषणावह ठरतात.

सक्षम विरोधी पक्षनेता !

वर्ष १९९९ मध्ये आणि त्यानंतर वर्ष २००५ ते वर्ष २०१२ या कालावधीत ते विरोधी पक्षनेते होते. त्या वेळी विधानसभेत काँग्रेस या सत्ताधारी पक्षातील कोणत्याच नेत्याचा पर्रीकर यांच्या प्रश्‍नाच्या भडीमारापुढे टिकाव लागत नसे. विधानसभेत आतापर्यंत सर्वांत अधिक काळ कोण बोलले असेल, सर्वाधिक सूत्रे कोणी मांडली असतील किंवा सर्वाधिक उत्तरे कोणी दिली असतील, याचा अभ्यास केला, तर ते मनोहर पर्रीकर हेच असतील. कोणताही विषय असो त्या विषयात पर्रीकर यांच्याएवढा खोलवर अभ्यास कोणाचाच नसायचा.

कालाय तस्मै नमः ।

गोव्याचे भाई पर्रीकर यांच्या कर्तबगारीविषयी सांगण्यासारखे आहे, तसेच एक व्यक्ती म्हणूनही त्यांच्याविषयी सांगण्यासारखे बरेच काही आहे. संघाचे संस्कार झाल्यामुळे त्यांच्यात साधेपणा आधीपासूनच होता; पण मुख्यमंत्री किंवा संरक्षणमंत्री झाल्यावरही त्यांनी वेशभूषा, संपर्क यांद्वारे तो टिकवून ठेवला होता. चित्रपट महोत्सवासारख्या चंदेरी जगात उद्घाटनाच्या वेळी सूटबूट न घालताही केवळ कर्तृत्वाने स्वतःकडे लक्ष वेधून घेणारा तो एकमेव ‘हिरो’ (नायक) आहे. अशी व्यक्ती अध्यात्म क्षेत्रात आली, तर ती तिच्यातील गुणांच्या आधारे झटपट प्रगती करून मनुष्यजन्माचे सार्थक करून घेऊ शकते. पर्रीकर यांचाही वृद्धापकाळात अध्यात्मक्षेत्राकडे वळण्याचा मानस होता, असे काही संकेत ते जाण्यापूर्वी मिळाले होते; पण काळाने त्यांच्यावर त्याआधीच झडप घातली. काळ कोणासाठी थांबत नसतो. कालाय तस्मै नमः । म्हणायचे ते यासाठीच ! पर्रीकर यांनी गोव्याचा भौतिक कायापालट केला. गोवा हे सर्वच दृष्टींनी आदर्श राज्य बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे, हे त्यापुढील राज्यकर्त्यांचे कर्तव्य राहील आणि तीच पर्रीकर यांना श्रद्धांजली ठरेल !


Multi Language |Offline reading | PDF