मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना गोमंतकियांनी दिला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक राष्ट्रीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली, अंत्ययात्रेचे राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवरून झाले थेट प्रक्षेपण, मिरामार येथील समुद्रकिनार्‍यावर झाले अंत्यविधी

पणजी, १८ मार्च (वार्ता.) – भाजपला गोव्यात शून्यातून सत्तेपर्यंत पोहोचवणारे, गोव्याचे ४  वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेले, देशाचे २ वर्षे सरंक्षणमंत्रीपद भूषवलेले आणि साधी राहणी, उत्कृष्ट प्रशासक या गुणांसाठी परिचित असलेले गोव्याचे लाडके नेते ‘भाई’ म्हणजेच मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (वय ६३ वर्षे) यांना गोमंतकियांनी १८ मार्च या दिवशी साश्रू नयनांनी अंतिम निरोप दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक राष्ट्रीय नेत्यांनी पणजी येथे मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. विशेष म्हणजे कला अकादमी ते मिरामार समुद्रकिनारा येथपर्यंतच्या अंत्ययात्रेचे, तसेच मिरामार येथे झालेल्या अंत्यसंस्काराचे राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांसमवेतच गोव्यातील वृत्तवाहिन्यांवरून थेट प्रेक्षपण करण्यात आले. यामुळे अंत्यविधीला पोहोचू न शकणार्‍या लाखो गोमंतकियांनी दूरचित्रवाहिनीद्वारे मुख्यमंत्री पर्रीकर यांची अंत्ययात्रा पाहून त्यांचे अंतिम दर्शन घेतले.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अंत्ययात्रेला १८ मार्च या दिवशी सकाळी त्यांच्या ताळगाव येथील खासगी निवासस्थानावरून प्रारंभ झाला. या वेळी मुख्यमंत्री पर्रीकर यांचे पार्थिव तिरंगा झेंड्याने लपेटण्यात आले होते आणि फुलांनी सजवलेल्या सैन्याच्या एका ट्रकमध्ये हे पार्थिव ठेवण्यात आले होते. ही अंत्ययात्रा प्रथम पणजी येथील भाजपच्या कार्यालयाजवळ आली.

या ठिकाणी भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. यानंतर हे पार्थिव लोकांना दर्शन घेण्यासाठी कला अकादमी येथे आणण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक राष्ट्रीय नेते, सहस्रो गोमंतकीय यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर पार्थिव अंत्यविधीसाठी कला अकादमी येथून मिरामार येथे नेण्यात आले. या वेळी अंत्ययात्रेत सहस्रो गोमंतकीय सहभागी झाले होते. अखेर मिरामार समुद्रकिनार्‍याजवळील गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या समाधीजवळ मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक राष्ट्रीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक राष्ट्रीय नेत्यांनी कला अकादमी येथे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. यामध्ये संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन्, नागरी उड्डाणमंत्री सुरेश प्रभु, केंद्रीयमंत्री स्मृती इराणी, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, भाजपचे वरिष्ठ नेते सुशिलकुमार मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, गोव्याच्या राज्यपाल सौ. मुदुला सिन्हा, गोव्याचे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर, गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर आदी प्रमुख नेत्यांचा सहभाग होता. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीही श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच राष्ट्रीय नेते यांनी या वेळी पर्रीकर कुटुंबियांसमवेत काही वेळ घालवून त्यांचे सांत्वन केले.

क्षणचित्रे

१. पुत्र अभिजात आणि उत्पल पर्रीकर यांनी मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या पार्थिवाला अग्नी दिला.

२. मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी नौदलाने २१ बंदुकांची सलामी दिली.


Multi Language |Offline reading | PDF