सामाजिक प्रसारमाध्यमांविषयी स्वतंत्र नियमावली बनवणार ! – निवडणूक आयोगाची उच्च न्यायालयात ग्वाही

मुंबई – सामाजिक प्रसारमाध्यमांविषयी लवकरच स्वतंत्र नियमावली घोषित करणार असून येत्या निवडणुकीच्या वेळी आचारसंहितेच्या काळात मतदानाच्या ४८ घंटे अगोदर फेसबूक, गुगल, ट्विटर आणि यू ट्यूब यांच्यासाठी अस्तित्वात असलेले नियम अधिक काटेकोरपणे राबवले जातील, अशी हमी निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयात दिली.

निवडणुकीच्या २ दिवस अगोदर राजकीय पक्षांविषयी प्रसारमाध्यमांवर प्रचाराच्या संदर्भात पोस्ट अपलोड केल्या जातात. त्यावर बंदी घालावी या मागणीसाठी अधिवक्ता सागर सूर्यवंशी यांनी न्यायालयात जनहित याचिका केली होती. या याचिकेवर १५ मार्च या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी निवडणूक आयोगाच्या वतीने अधिवक्ता प्रदीप राजगोपाल यांनी याविषयी नियमावली सिद्ध करणार असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले.

त्या वेळी ‘फेसबूक, ट्विटर यांसारख्या सामाजिक प्रसारमाध्यमांकडून या नियमावलीचे पालन न झाल्यास काय कारवाई करणार ?’, असा प्रश्‍न याचिकाकर्त्यांनी विचारला. त्या वेळी फेसबूकच्या वतीने सांगण्यात आले, ‘‘फेसबूकवर वापरकर्त्यांनी लिहिलेले लिखाण कोणाला पाठवायचे आहे, त्याचे संपूर्ण नियंत्रण हे संबंधित वापरकर्त्यांकडे असते’’, तर गुगलच्या वतीने सांगण्यात आले, ‘‘कोणते सूत्र हे देशासाठी महत्त्वाचे आहे, हे आम्ही किंवा कुणीही ठरवू शकत नाही.’’


Multi Language |Offline reading | PDF