सनातनच्या ७७ व्या संत पू. सत्यवती दळवीआजी यांच्या देहत्यागाच्या वेळी आणि देहत्यागानंतर स्थुलातून, तसेच सूक्ष्मातून साधिकेला जाणवलेली सूत्रे

पू. सत्यवती दळवी

सनातनच्या संत पू. (श्रीमती) सत्यवती दळवी (वय ८३ वर्षे) यांनी २७.२.२०१९ या दिवशी सायंकाळी ७.५५ वाजता देवद येथील सनातनच्या आश्रमात देहत्याग केला. त्यांच्या देहत्यागापूर्वी, देहत्यागाच्या वेळी आणि देहत्यागानंतर साधिकेला स्थुलातून, तसेच सूक्ष्मातून जाणवलेली सूत्रे पुढे देत आहोत.

सौ. कोमल जोशी

१. देहत्यागापूर्वी

१ अ. पू. आजींना पुष्कळ थकवा आणि श्‍वास घेण्यास कष्ट होत असणे; पण अशा स्थितीतही त्यांनी दोन्ही हात उंचावून घोषणा देण्याचा प्रयत्न करणे : ‘पू. आजींना पुष्कळ थकवा आला होता. त्यांना श्‍वास घेण्यास पुष्कळ कष्ट होत होते आणि बोलताही येत नव्हते. त्यांचे हात शक्तीहीन झाले होते. अशा स्थितीतही दोन्ही हात उंचावून त्या घोषणा देत होत्या. त्या वेळी त्यांच्या डोळ्यांतून क्षात्रतेजाचे कण प्रक्षेपित होत होते आणि वातावरणात क्षात्रवृत्ती निर्माण झाली होती.

२. देहत्यागानंतर

२ अ. पू. आजींच्या खोलीत जाण्यापूर्वी पुष्कळ आध्यात्मिक त्रास होत असणे आणि खोलीत गेल्यावर तेथील चैतन्यामुळे देहावरील आवरण वेगाने न्यून होऊ लागणे : पू. आजींचे ‘स्पंजिंग’ करत असलेल्या साधिकेला पू. आजींची मान अचानक एका बाजूला कलल्याचे दिसले. मी रुग्णांची सेवा केली असल्याने तिने मला पू. आजींना पहाण्यासाठी बोलवले. मी पू. आजींच्या खोलीत गेले. खोलीत जाण्यापूर्वी मला पुष्कळ आध्यात्मिक त्रास होत होता; परंतु खोलीत गेल्यानंतर ५ मिनिटांतच मला चैतन्य मिळून माझ्या देहावरील आवरण वेगाने न्यून होऊ लागले. पू. आजींच्या खोलीतील चैतन्यात पुष्कळ वाढ झाली होती. त्यामुळे ‘मी पांढर्‍या शुभ्र प्रकाशझोतात प्रवेश करत असून माझ्या देहाभोवतीचे त्रासदायक आवरण नष्ट होत आहे’, असे मला जाणवलेे. त्या वेळी माझे मन निर्विचार झाले.

२ आ. पू. आजींच्या लिंगदेहाचे ज्योती स्वरूपात दर्शन होणे : मी पू. आजींची नाडी पाहिली. ती बंद होती; पण मला पू. आजींचा हसरा आणि तेजस्वी तोंडवळा दिसू लागला. त्यांच्या देहातून बाहेर आलेला हसणारा आणि चैतन्य अन् क्षात्रतेज यांनी भारित झालेला त्यांचा लिंगदेह मला ज्योती स्वरूपात दिसू लागला.

२ इ. पू. आजींचा देह पिवळ्या रंगाचा दिसून देहाभोवती पिवळ्या रंगाचे वलय दिसणे : त्यांचा देह पिवळ्या रंगाचा, जणू ‘पूर्ण अंगाला हळद लावली आहे’, असा दिसत होता. त्यांच्या त्वचेच्या छिद्रातून चैतन्य प्रक्षेपित होत होते. ‘त्यांच्या देहाभोवती पिवळ्या रंगाचे वलय आहे’, असे मला दिसत होते.

२ ई. पू. आजींच्या देहात निर्गुण तत्त्व कार्यरत झाल्याचे जाणवणे : त्यांच्या त्वचेतून ‘ॐ’ बाहेर पडून तेे वातावरणात एकरूप होत होते. पू. आजींच्या देहात निर्गुण तत्त्व कार्यरत झाल्याचे जाणवत होते.

२ उ. त्यांची सप्तचक्रे प्रकाशमान दिसत होती, तसेच सप्तचक्रांमधून चैतन्य प्रवाहित होत होते.

२ ऊ. खोलीत भाव आणि आनंद जाणवणे : पू. आजी त्यांच्या खोलीत आलेल्या सर्व साधिकांकडे पाहून हसून चैतन्यरूपी आशीर्वाद देत आहेत आणि ‘खोलीत भाव अन् आनंद पसरला आहे’, असे मला जाणवले.

२ ए. खोलीतील पू. आजींनी वापरलेली गादी, पलंग, तसेच त्यांचे प्रत्येक साहित्य यांमध्ये पुष्कळ चैतन्य आणि क्षात्रतेज जाणवणे : तेथील सर्व साहित्यात पुष्कळ चैतन्य जाणवत होते. पू. आजींनी वापरलेली हवेची गादी, तसेच त्यांनी झोपण्यासाठी वापरलेला पलंग यांतून ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।’ या घोषणेचा नाद मला स्पष्टपणे ऐकू येत होता. पलंगातून भगव्या रंगाचे क्षात्रतेजयुक्त चैतन्य कण प्रक्षेपित होतांना दिसत होते, तसेच त्यातून ‘पू. आजींच्या आवाजातील ‘कृष्णा ऽऽ’, ‘परम पूज्य डॉक्टर ऽऽ’, अशी आर्त हाकही ऐकू येत आहे’, असे मला जाणवले. ‘हिंदु राष्ट्र यावे’, याविषयी पू. आजींना असलेली तीव्र तळमळ त्यांच्या प्रत्येक वस्तूतून जाणवत होती. ‘त्यांनी वापरलेल्या वस्तूंमध्येही भाव आणि क्षात्रतेज जागृत झाले आहे’, असे मला स्पष्टपणे जाणवले.

३. पू. आजींच्या लिंगदेहाचा प्रवास !

३ अ. पू. आजींच्या लिंगदेहाने ‘परात्पर गुरु डॉक्टरांमुळे देहातून बाहेर पडतांना कोणताच त्रास झाला नाही’, असे सांगणे : पू. आजींची नाडी तपासत असतांना मला त्यांच्या लिंगदेहाने सांगितले, ‘देहातून बाहेर पडतांना मला कोणताच त्रास झाला नाही. परात्पर गुरु डॉक्टरांनी देहातून मला अगदी फुलासारखे अलगद बाहेर काढले. मला मृत्यूचे भय वाटले नाही; कारण परात्पर गुरु डॉक्टर सतत माझ्या समवेत होते आणि आहेत.’ सर्वसाधारण मनुष्याला देह सोडतांना असंख्य यातना होतात आणि त्या त्याच्या तोंडवळ्यावरही दिसतात. त्याला ‘स्वतःच्या देहातून प्राण जात आहे’, याची जाणीव नसते; परंतु पू. आजींना ‘आपण देहत्याग करत आहोत’, याची पूर्ण जाणीव होती. त्या स्थितीतही त्यांच्या ठिकाणी शरणागतभाव आणि कृतज्ञता यांची जाणीव पूर्णपणे जागृत होती.

३ आ. सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉक्टरांनी पू. आजींचा लिंगदेह अलगदपणे वर वर नेऊन मुखावाटे बाहेर नेणे, त्या वेळी पू. आजींनी ‘मी निघाले’, असे सांगणे आणि त्यांचा तोंडवळा हसरा अन् तेजस्वी दिसणे : मी पू. आजींची नाडी तपासत असतांना सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉक्टरांनी काही सेकंदातच पू. आजींचा लिंगदेह अलगदपणे वर वर नेऊन फुलाप्रमाणे त्यांच्या मुखावाटे बाहेर नेला. त्या वेळी पू. आजी हसून मला म्हणाल्या, ‘मी निघाले. बघ, मला परात्पर गुरु डॉ. आठवले नेण्यास आले आहेत. तेच श्रीराम आणि तेच श्रीकृष्ण आहेत.’ त्या वेळी स्थुलातून पू. आजींचा तोंडवळा हसरा आणि तेजस्वी दिसत होता. पू. आजींचा लिंगदेह परात्पर गुरु डॉक्टरांसमवेत जात असून गुरु-शिष्य हसत हसत पुढे जात होते. त्यांच्यामागे सूक्ष्मातून निर्गुण पोकळी निर्माण झाली होती. त्या वेळी मला पुष्कळ स्थिरता जाणवली. माझे मन निर्विचार आणि स्थिर झाले.

३ इ. पू. आजींचा लिंगदेह ज्योतीप्रमाणे दिसून त्यातून खोलीत उपस्थित असलेल्या सर्व साधिकांना चैतन्य आणि आशीर्वाद मिळणे : पू. आजींचा लिंगदेह ज्योतीप्रमाणे दिसून त्याभोवती भगव्या आणि निळसर रंगांची प्रभावळ होती. मध्येच पांढरा बिंदू अन् पिवळी प्रभावळही दिसत होती. त्यांच्या लिंगदेहाभोवती भगवा रंग अधिक प्रमाणात होता. त्यांच्या लिंगदेहरूपी ज्योतीतून खोलीत उपस्थित असलेल्या सर्व साधिकांना चैतन्य आणि आशीर्वाद मिळत होता. त्या वेळी ईश्‍वराने मला सूक्ष्मातून सांगितले, ‘पू. आजींचे चैतन्य मिळण्यासाठी उपस्थित साधिकांना प्रार्थना करायला सांग.’

३ ई. पू. आजींच्या लिंगदेहाने संतांचे दर्शन घेणे : ‘पू. आजींचा लिंगदेह पू. नेनेआजी आणि परात्पर गुरु पांडे महाराज यांना भेटून पुढे जात आहे’, असे मला जाणवले.

३ उ. पू. आजींच्या लिंगदेहाने घोषणा देणे आणि त्या वेळी लिंगदेहातून क्षात्रतेजाचे असंख्य कण वातावरणात प्रक्षेपित होणे : पू. आजी (लिंगदेह) परात्पर गुरु डॉक्टरांना म्हणत होत्या, ‘तुम्ही आहात. त्यामुळे हिंदु राष्ट्र येणारच आहे.’ त्या वेळी त्या ‘हिंदु राष्ट्र की जय ।’, ‘जय गुरुदेव ।’, ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।’, अशा घोषणाही देत होत्या. त्या वेळी त्यांच्या लिंगदेहातून क्षात्रतेजाचे असंख्य कण वातावरणात प्रक्षेपित होऊन ते साधकांकडे जात होते, तसेच चैतन्य आणि भाव यांच्या कणांचेही पुष्कळ प्रक्षेपण होत होते.

३ ऊ. परात्पर गुरु डॉक्टरांनी पू. आजींना ‘आता निर्गुणातून कार्य करा’, असा आशीर्वाद देणे : परात्पर गुरु डॉक्टर पू. आजींच्या लिंगदेहाला सांगत होते, ‘तुम्ही देहात असतांना श्रद्धेच्या बळावर लढलात आणि आध्यात्मिक प्रगती करून जन्माचे सार्थक केलेत. ‘रुग्णाईत असतांना श्रद्धा कशी असावी ? आणि शारीरिक भोग हसत अन् आनंदाने कसे भोगावेत ?’, याचा आदर्श तुम्ही घालून दिला आहे. आता तुम्ही निर्गुणातून कार्य करा !’

३ ए. परात्पर गुरु डॉक्टरांच्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचे दर्शन होणे : परात्पर गुरु डॉक्टर पू. आजींचा लिंगदेह पुढे पुढे नेत असतांना काही वेळा मला त्यांच्या जागी ‘भगवान श्रीकृष्ण पू. आजींना पुढे नेत आहे’, असे जाणवत होते.

३ ऐ. पू. आजींभोवती असलेल्या संरक्षक कवचामुळे त्यांच्या लिंगदेहावर आक्रमण करण्यास सिद्ध झालेल्या वाईट शक्तींना काहीही करता न येणे : पू. आजींचा लिंगदेह पुढे जात असतांना ‘असंख्य मोठ्या वाईट शक्ती पू. आजींच्या लिंगदेहावर आक्रमण करण्यासाठी सिद्ध आहेत’, असे मला दिसले; परंतु पू. आजींमधील क्षात्रतेज आणि त्यांच्याभोवती असलेले कृष्णतत्त्व यांमुळे निर्माण झालेले संरक्षक कवच यांमुळे त्यांचा लिंगदेह सुरक्षित होता. वाईट शक्ती लिंगदेहाला काहीच करू शकत नव्हत्या.

३ ओ. देवतांनी पू. आजींवर पुष्पवृष्टी करणे आणि ऋषिमुनींनी आदराने त्यांचे स्वागत करणे : पू. आजींच्या लिंगदेहावर देवता पुष्पवृष्टी करत होत्या आणि अनेक ऋषिमुनी नम्रतेने अन् आदराने पू. आजींचे स्वागत करत होते. पू. आजी त्यांना नम्रतेने, आदरपूर्वक आणि आनंदाने प्रतिसाद देत होत्या.

३ औ. पू. आजींच्या सूक्ष्मदेहातून सात्त्विक स्पंदने प्रक्षेपित होणे : ‘पू. आजींच्या नखांवर सूक्ष्मातून ‘ॐ’ आहेत आणि त्यांची नखे, त्वचा, सप्तचक्रे अन् अस्थी यांतून क्षात्रतेज, परात्पर गुरुदेवांप्रतीची श्रद्धा आणि भाव यांची सात्त्विक स्पंदने प्रक्षेपित होत आहेत’, असे मला जाणवत होते.

३ अं. पू. आजींचा लिंगदेह मध्येच ज्योतीरूपात दिसत होता आणि मध्येच त्यांचा हसरा तोंडवळाही दिसत होता.

या सर्व घटना सूक्ष्मातून अनुभवतांना मला अधिकाधिक चैतन्य मिळून उत्साह वाटत होता. त्या वेळी माझे मन अतिशय शांत आणि स्थिर होते.’

– सौ. कोमल जोशी, सनातन आश्रम, देवद (२७.२.२०१९)

सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.


Multi Language |Offline reading | PDF