परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली १४ वर्षांची कु. करुणा मुळे हिच्या केवळ अस्तित्वामुळे शिकायला मिळाले कविता करणे !

रामनाथी आश्रमात सेवा करणारी कु. करुणा मुळे हिचा फाल्गुन शुक्ल पक्ष द्वादशी (१८.३.२०१९) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची गुणवैशिष्ट्ये आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी झालेला भावसंवाद येथे दिला आहे. त्यावरून तिची आध्यात्मिक प्रगल्भता लक्षात येते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी तिच्याशी साधलेल्या संवादातून ‘ते परात्पर गुरुपदी विराजमान असूनही साधकांकडूनही सातत्याने शिकण्याच्या स्थितीत असतात’, हे त्यांचे वैशिष्ट्य साधकांना शिकायला मिळेल.

कु. करुणा मुळे हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून अनेक शुभाशीर्वाद !

कु. करुणा मुळे

‘कु. करुणा मुळे हिचा फाल्गुन शुक्ल पक्ष द्वादशीला, म्हणजे १८.३.२०१९ या दिवशी वाढदिवस आहे. ती माझ्या खोलीतील स्वच्छता आणि देवपूजा करते. ती सेवेला यायला लागल्याच्या तिसर्‍या-चौथ्या दिवसापासूनच तिचे बोलणे, कविता स्फुरणे, गाणे इत्यादी वैशिष्ट्ये माझ्या लक्षात यायला लागली. मला शाळेपासूनच वाङ्मयाची नाही, तर विज्ञानाची आवड आहे. त्यामुळे माझी बोलण्यातील आणि ग्रंथांतील भाषा वैज्ञानिक आहे. करुणाच्या काही दिवसांच्या प्रभावाने मलाही काही कवितांच्या ओळी सुचू लागल्या. त्यांतील काही ओळी मी तिला गाऊन नाही, तर म्हणून दाखवायचो. त्यावर काही वेळा ती लगेच काही ओळी गाऊनही दाखवायची.

आतापर्यंत माझ्याकडून साधक काय शिकले, हेच मला माहीत होते. आता करुणाकडून मी कवितांच्या ओळी करणे शिकायला लागल्यापासून ‘साधकांकडूनही मला शिकण्यासारखे बरेच आहे’, हे माझ्या लक्षात आले. मला सुचलेल्या कवितांच्या ओळी आणि आमच्यात कवितांच्या ओळींत झालेल्या संभाषणांच्या ओळी यांची काही उदाहरणे येथे दिली आहेत.

६४ कलांमधील एक कला ‘कविता करणे’ मला शिकवल्याबद्दल करुणा माझ्या नेहमीच स्मरणात राहील.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीची एखादी बालसाधिका इतकी प्रगल्भ असू शकते, हे करुणाच्या उदाहरणावरून लक्षात येईल.

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. करुणासंदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सहज सुचलेल्या काही ओळी

अ. एकदा करुणा पूजा करत असतांना मी तिला काहीतरी सांगायला तिच्या बाजूला ३ – ४ मिनिटे उभा होतो. तेव्हा तिचे मन पूजेत एवढे एकाग्र होते की, मी बाजूला उभा असल्याचे तिला कळलेही नाही. तेव्हा मी तिला पद्यात म्हणालो,

मन एकाग्र किती गं तुझं । हरवते मज वारंवार ॥

आ. नाव तुझे सुंदर । सेवा तुझी सुंदर ॥
तुझे सर्व काही । सुंदर सुंदर ॥
गाणे तुझे गोड । बोल तुझे गोड ॥
तुझे सर्व काही । गोड अति गोड ॥

इ. कान थकले वाट पाहुनी ।
मधुर स्वर ते ऐकू न येती ॥

ई. भिंतीपलीकडील तू न दिसशी ।
पण तुझे सुंदर गाणे ऐकविशी ॥
गायलीस गं गायलीस गं । भावविभोर होऊनी तू गायलीस गं ॥

उ. साडी तुझी सुंदर, तूही आहेस गुणवान ॥
साडीमुळे तू आणि तुझ्यामुळे साडी ।
दोन्ही दिसतात सुंदर सुंदर ॥

ऊ. चिमट्यांची गंमत

चिमटे घेतेस गं, घेतेस गं ।
हातांत चिमटे घेतेस गं ।
परि साधकांना न घेशी चिमटे ।
कपड्यांना लाविशी चिमटे गं ॥
चिमटा काढू नको गं, काढू नको ।
साधकांना तू चिमटा काढू नको ॥
चिमटा काढ गं काढ गं । दोरीवरचा चिमटा काढ गं ॥

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वेगवेगळ्या दिवशी केलेल्या कवितेच्या दोन ओळींना कु. करुणाने गीतात दिलेले उत्तर

एकदा करुणा सेवा करतांना इतके सुंदर गात होती की, मला पुढील दोन ओळी आपोआप सुचल्या. त्या मी तिला पद्यात सांगितल्या.

अ. परात्पर गुरु डॉ. आठवले

सुंदर सुंदर, तुझं गाणं किती गं सुंदर ।
सुंदर सुंदर, तुझं सर्वच सुंदर ॥

कु. करुणा (करुणाने लगेच दिलेले उत्तर)

गुरूंचे वर्णन करण्यासी । शब्द नाहीत मजपाशी ॥
सुंदर सुंदर, तुमचे हे बोल । ऐकून मोहिले माझे मन ॥ १ ॥

तुमचे हे रूप मनोहर सुंदर ।
पहाता मन मोहून जाते वारंवार ॥ २ ॥

तुमचे हे सुंदर मधुर हास्य ।
पहाता नेत्र होती तृप्त ॥ ३ ॥

तुमची ही करुणामय दिव्यदृष्टी ।
असू दे सदैव आम्हावरी ॥ ४ ॥

तुमचा हा परम आनंदमय सहवास ।
कधी संपू नये, असे वाटते मनास ॥ ५ ॥

भाव-भक्तीमय सेवा करूनी ।
मला अर्पण व्हायचे आहे गुरुचरणी ॥ ६ ॥

आ. परात्पर गुरु डॉ. आठवले

जरि पायांत नसती घुंगरू ।
तुझ्या पायी वाजती घुंगरू ॥

कु. करुणा (करुणाने लगेच दिलेले उत्तर)

सूक्ष्म घुंगरू असती पायांत ।
ऐकता तुम्ही सूक्ष्म नाद ॥

कु. करुणा मुळे हिने केलेल्या काही कविता

१. मला तुमच्या चरणांशी एकरूप करा गुरुदेव ।
माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करून ।
मला तुमची करुणा अनुभवायला दिलीत गुरुदेव ॥ १ ॥

सनातनच्या झाडाची मुळे देऊन ।
साधनेचा आधार दिलात गुरुदेव ॥ २ ॥

स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया शिकवून ।
स्वभावदोषांवर मात करण्यास शस्त्र दिलेत गुरुदेव ॥ ३ ॥

सर्वकाही लाड पुरवून ।
मागायची गरजच ठेवली नाही गुरुदेव ॥ ४ ॥

तुम्ही दिलेल्या शिकवणी कृतीत आणून ।
मला तुमच्या चरणांशी एकरूप करा गुरुदेव ॥ ५ ॥

– गुरुचरणी नतमस्तक

२. गुरुदेव, तुम्ही म्हणता सदैव ।
तू जिंकलीस मी हरलो ॥

गुरुदेव, तुम्ही म्हणता सदैव ।
तू जिंकलीस मी हरलो ॥

परंतु नसे हे असे । मला हरवून देव जिंकतो ।
तरीही मला जिंकवण्यासाठी स्वतः हरतो ।
आणि ‘तू जिंकलीस’ असे म्हणून मला फसवतो ॥

३. गुरूंची प्रीती !

माझी प्रेमळ ती गुरुमाऊली । करुणासागर वात्सल्यमूर्ती ॥ १ ॥

जे कधी कुणी ना केले । ते प्रेम गुरूंनी मज दिधले ॥ २ ॥

प्रत्येक प्रसंग घडवूनी । मला घडवितसे ती माऊली ॥ ३ ॥

जरी अपराध केले अनंत । तरी गुरुकृपेचा होत नसे अंत ॥ ४ ॥

एकच प्रार्थना तव चरणी ।

शिकवी मज तुझ्या चरणांची कशी करावी भक्ती ॥ ५ ॥

यापेक्षा काही नको आता । कृतज्ञतेसी पात्र करावे गुरुराया ॥ ६ ॥

४. गुरुचरणी प्रार्थना !

‘हे गुरुदेवा, तुम्ही मला सर्वकाही दिले; पण त्याविषयी मी कृतज्ञ रहात नाही. मला कृतज्ञ रहायला शिकवा. प.पू. (परात्पर गुरु) डॉक्टर, तुम्हीच माझे सर्वस्व आहात. तुमच्याविना माझ्यावर प्रीती करणारे कुणी नाही. माझ्यावर अखंड तुमच्या प्रीतीची करुणामय दृष्टी राहू दे. तुम्ही मला प्रत्येक प्रसंगातून, तुमच्या बोलण्यातून जे शिकवत असता, ते मला शिकता येऊन पुढे घेऊन चला !

मोक्षप्राप्तीपर्यंतची ही वाट । चालण्यास मी असे असमर्थ ॥

तरी आता कृपा करूनी गुरुराया ।
माझा हात धरूनी मज नेई आता ॥’

– देवाची करुणा अनुभवण्यास आतुरलेली कु. करुणा मुळे (वय १४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.३.२०१९)

अध्यात्मात रमून गेलेली करुणा !

‘एकदा मी करुणाला विचारले, ‘‘शाळेतील मुले आनंदी असतात ना ?’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘नाही. आश्रमातील मुले आनंदी असतात !’’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले


Multi Language |Offline reading | PDF