होळी आणि रंगपंचमी यांनिमित्ताने होणार्‍या अपप्रकारांना आळा घाला !

पनवेल, यवतमाळ, वर्धा आणि धुळे येथे हिंदु जनजागृती समितीची पोलीस अन् प्रशासन यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

पोलीस निरीक्षक श्री. विनोद चव्हाण यांना निवेदन देतांना धर्माभिमानी

पनवेल येथे निवेदन देण्यात स्थानिक धर्माभिमान्यांचाही सहभाग

पनवेल, १७ मार्च (वार्ता.) – होळी आणि रंगपंचमी यांनिमित्ताने होणार्‍या अपप्रकारांना आळा घालण्यात यावा, तसेच हे सण धर्मशास्त्रानुसार साजरे करण्यात यावेत, यासाठी १४ मार्च या दिवशी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि धर्माभिमानी यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनोद चव्हाण यांना निवेदन दिले. या वेळी समितीचे श्री. राजेंद्र पावसकर आणि धर्माभिमानी कु. आदेश मोकल, कु. सुरज भोईर आणि श्री. रोहिदास शेडगे उपस्थित होते. ‘आम्ही योग्य ती कारवाई नक्कीच करू’, असे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चव्हाण यांनी या वेळी सांगितले.

यवतमाळ आणि वणी येथील पोलीस अधिकार्‍यांना निवेदन

यवतमाळ, १७ मार्च (वार्ता.) – होळी आणि रंगपंचमी या काळामध्ये होणार्‍या अपप्रकारांना आळा घालावा, महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करावी. आरोग्यास घातक, तसेच प्रतिबंधित रासायनिक रंगांची विक्री करणार्‍यांवर आणि बळजोरीने रंग फासून फुगे मागणार्‍यांवर कठोर कारवाई करावी. या मागण्यांचे निवेदन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम्. राजकुमार, तसेच नेर येथील (जिल्हा यवतमाळ) पोलीस निरीक्षक श्री. जाधव यांना देण्यात आले. या वेळी महिला उत्थानमंडळ, सनातन संस्था आणि समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. वणी येथेही पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांनाही निवेदन देण्यात आले.

वर्धा येथील जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन

वर्धा, १७ मार्च (वार्ता.) – होळी आणि रंगपंचमी या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांना आळा घालण्यात यावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १३ मार्च या दिवशी येथील जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने हे निवेदन कार्यालयीन अधीक्षक लता गुजर यांनी स्वीकारले, तर पोलीस अधीक्षक यांचे निवेदन पोलीस उपअधीक्षक श्री. निखिल पिंगळे यांनी स्वीकारले. या वेळी समितीचे श्री. शशिकांत पाध्ये, श्री. विजय डगवार, श्री. शिवा थोटे आदी उपस्थित होते.

धुळे येथे पोलीस उपअधीक्षकांना निवेदन

निवेदन स्वीकारतांना पुणे उपअधीक्षक रवींद्र सोनवणे

धर्मशास्त्रानुसार होळी साजरी करण्याचे हिंदु जनजागृती समितीचे आवाहन !

धुळे, १७ मार्च (वार्ता.) – होळी आणि रंगपंचमीनिमित्त अपप्रकार करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, होळी सण धर्मशास्त्रानुसार साजरा करण्यात यावा, तसेच या काळात पोलिसांच्या गस्तीची पथके सिद्ध करावीत, अशा मागण्यांचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पोलीस उपअधीक्षक रवींद्र सोनवणे यांना १५ मार्च या दिवशी देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांसह हिंदुत्वनिष्ठ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Multi Language |Offline reading | PDF