नीरव मोदीच्या पत्नीविरोधात अजामीनपात्र वॉरंट !

मुंबई – पीएन्बी घोटाळ्याप्रकरणी फरार आरोपी नीरव मोदीची पत्नी आमी मोदी हिच्याविरुद्ध विशेष प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉड्रिंग अ‍ॅक्ट (पीएम्एल्ए) न्यायालयाचे न्यायाधीश एम्.एस्. आझमी यांनी १५ मार्च या दिवशी अजामीनपात्र वॉरंट जारी केले. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नीरव मोदीविरुद्ध प्रविष्ट केलेल्या पुरवणी आरोपपत्राची नोंद घेऊन ही कार्यवाही करण्यात आली.

अमेरिकेत मोदीच्या दोन स्थावर मालमत्ता आहेत. ईडीने त्या कह्यात घेतल्या आहेत. आमी मोदीने अधिकोषाचे पैसे मोदीची बहीण पूर्वीच्या माध्यमातून वळते करून त्याच पैशातून न्यूयॉर्क येथील पॉश सेंट्रल पार्क परिसरात प्रॉपर्टी खरेदी केली. त्यामुळे तिच्याविरुद्धही अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची ईडीची विनंती विशेष न्यायालयाने मान्य केली.

विशेष न्यायालयाने मोदीच्या काही आस्थापनांना समन्स बजावले. या आस्थापनांनी अन्वेषण यंत्रणेवर आरोप केले आहेत. अन्वेषण यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, मोदीने अनेक बनावट आस्थापना स्थापन केल्या. या आस्थापनांचा वापर तो लेटर ऑफ अंडरटेकिंग (एल्ओयू) घेण्यासाठी करायचा. आस्थापनांचे एल्ओयू वापरून नीरव मोदी पीएन्बीमधून कर्ज घेत होता. हा घोटाळा उजेडात आल्यानंतर मोदी देश सोडून लंडनमध्ये पळाला. सध्या तो लंडनच्या सेंटर पॉइंट टॉवर ब्लॉकमध्ये रहात असल्याचा दावा इंग्लंडच्या एका वर्तमानपत्राने केला आहे. त्यांनी त्याची ध्वनीचित्रफीत प्रसिद्ध केली आहे.


Multi Language |Offline reading | PDF