पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी महानगरपालिका आयुक्तांकडून अतिरिक्त आयुक्त आणि प्रभारी जलअभियंते यांना नोटिसा

दायित्वशून्य महापालिका प्रशासन !

सांडपाणी थेट नदीत मिसळणे म्हणजे नागरिकांच्या आरोग्याशी खेळच आहे ! असे पाणी मिसळ्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्यास अथवा एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याचे दायित्व कोणाचे ?

कोल्हापूर, १७ मार्च – प्रदूषित पाणी पंचगंगा नदीत मिसळण्याच्या प्रकाराची महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी गंभीर नोंद घेतली असून या प्रकरणी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर आणि प्रभारी जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. शहरातील सांडपाणी जयंती नाल्यात येते.

तेथून ते कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रात जाते. सहा पंपांद्वारे सांडपाण्याचा उपसा होतो. त्यातील दोन पंपांत बिघाड झाल्याने फेसाळलेले सांडपाणी १५ मार्च या दिवशी थेट पंचगंगा नदीत मिसळत होते.

महापालिका आयुक्त कलशेट्टी यांनी भेट देऊन पाणी उपशाची पाहणी केली. सहापैकी दोन पंप बंद असल्याने सांडपाणी मिसळत असल्याचे सांगण्यात आले. त्यावर तातडीने उपाय करण्यास सांगून सांडपाणी पुन्हा नदीच्या दिशेने जाणार नाही, याची काळजी घेण्याची सूचना महानगपालिका आयुक्तांनी केली.


Multi Language |Offline reading | PDF