हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संतपद गाठण्याचे ध्येय ठेवणारी ६३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली रामनाथी आश्रमातील साधिका कु. हर्षाली कदवाने (वय १५ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. हर्षाली कदवाने आणि कु. करुणा मुळे या आहेत !

फाल्गुन शुक्ल पक्ष द्वादशी, १८.३.२०१९ या दिवशी कु. हर्षाली कदवाने हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने कु. हर्षाली हिने पूर्णवेळ साधक होण्यासंदर्भात व्यक्त केलेले विचार आणि त्यासाठी अनुमती देणारे तिने आई-वडील यांप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता येथे प्रसिद्ध करत आहोत.

कु. हर्षाली कदवाने

कु. हर्षाली कदवाने हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून अनेकानेक शुभाशीर्वाद !

१. रामनाथी आश्रमात येणे, त्या वेळी एका संतांनी पूर्णवेळ साधिका होण्याविषयी सुचवणे आणि मनाची सिद्धता होऊन आठवीची परीक्षा झाल्यावर पूर्णवेळ साधिका होणे

‘शाळेला सुटी असल्याने मी रामनाथी आश्रमात एक मास राहून साधनेचे विविध पैलू शिकण्यासाठी आले होते. त्या वेळी माझी एका संतांशी भेट झाली आणि त्यांनी मला पूर्णवेळ साधिका होण्याविषयी सुचवले. तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘मलाही पूर्णवेळ साधनेसाठी आश्रमात यायचे आहे; पण बाबा ‘नाही’, असे म्हणतात.’’ त्यावर ते संत म्हणाले, ‘‘एकदा परत बाबांना विचार आणि साधनेसाठी आश्रमात ये !’’ तेव्हा माझ्या मनात श्रद्धापूर्वक विचार आला, ‘आता गुरुदेवांचा संकल्प झाला आहे. त्यामुळे बाबासुद्धा मला पूर्णवेळ साधिका होण्यास होकार देतील आणि मी पूर्णवेळ साधिका होणारच !’ नंतर मी घरी गेले आणि बाबांना मी पूर्णवेळ साधिका होण्याविषयी विचारले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुझे आठवीपर्यंत शिक्षण पूर्ण होऊ दे. मग बघूया !’’ त्या वेळी माझ्या मनात नकारात्मक विचार येत होते, ‘तिथे तर मी कोणाला ओळखतही नाही. मला काही अधिक माहितीपण नाही, तर माझे तिथे कसे होणार ? मला आई-बाबांची आठवणही येईल.’ तेव्हा देवाने मला आतून सांगितले, ‘तू कशाला काळजी करतेस ? मी आहे ना तुझ्या समवेत ! सर्व साधकही पुष्कळ प्रेमळ आहेत. तुला आई-बाबांची आठवणपण येणार नाही.’

मग मला वाटले, ‘हो ! गुरुदेव आहेत माझ्या समवेत आणि तेच माझे खरे घर आहे.’ आश्रमात आल्यावरच असे वाटते की, हे माझे खरे जग आहे. बाहेरच्या मायावी जगात कुठे आहे खरा आनंद ? कुठे आहेत आनंद देणारे ? त्याचप्रमाणे जी देवाजवळ घेऊन जाणारी मनाची प्रक्रिया असते, ती मनाची प्रक्रिया केवळ साधना करूनच होणार आहे. बाहेरच्या या मायावी जगात माझी साधनासुद्धा होत नाही.’ तेव्हापासून माझे एकच ध्येय होते, ‘देवाने आपल्याला हा मनुष्यजन्म दिला आहे. त्यानेच मला साधनेतही आणले. त्यामुळे साधना करून मनुष्यजन्माचे सार्थक करायचे, म्हणजेच ईश्‍वरप्राप्तीचे एक-एक टप्पे पुढे पुढे जायचे आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी समष्टी सेवाही झोकून देऊन करायची. आमच्यावर (भावी पिढीवर) गुरुदेवांनी हिंदु राष्ट्र सांभाळण्याचे जे दायित्व दिले आहे, त्यासाठी आपण पूर्णपणे सक्षम व्हायचे !’ अशा प्रकारे माझी विचारप्रक्रिया झाली आणि देवानेही मला हे विचार दिले अन् त्यासाठी बळही दिले. (असे विचार ८ वीतील मुलीचे असू शकतात, यावर कोणाचा विश्‍वासही बसणार नाही. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले)

मी देवाला नेहमी प्रार्थना करायचे, ‘माझ्या बाबांना सकारात्मक कर. त्यांनी मला आश्रमात जाऊ द्यावे, यासाठी त्यांना तूच सद्बुद्धी दे. त्यांनाही ‘पूर्णवेळ साधना केल्याने कोणते लाभ होतात’, हे कळू दे आणि मी आश्रमात पूर्णवेळ झाल्यावर आईलाही माझी आठवण न येता सतत तुझ्या अनुसंधानात राहून तिचीही साधना होऊ दे.’ मग मी काही दिवसांनी बाबांना विचारले, ‘मी पूर्णवेळ साधिका होऊ ना !’ तेव्हा देवानेच त्यांना सकारात्मक केले आणि ते मला म्हणाले, ‘‘ठीक आहे जा; पण मधे-मधे घरी येत रहा. चांगली साधना कर !’’ त्या वेळी मला पुष्कळ आनंद झाला आणि मी रामनाथी आश्रमात यायची सिद्धता करायला लागले. आठवीची परीक्षा झाल्यावर मी पूर्णवेळ साधिका झाले.

२. आश्रमात पूर्णवेळ साधिका झाल्यावर एक वर्षाने ६३ टक्के आध्यात्मिक पातळी होणे अन् ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी लवकर संतपद गाठण्याचे ध्येय ठेवायचे अन् ते पूर्ण होण्यासाठी देवच साहाय्य करील’, अशी श्रद्धा निर्माण होणे

मी आश्रमात पूर्णवेळ साधिका झाल्यावर मला विविध प्रकारच्या सेवा मिळाल्या आणि साधकांचे प्रेम मिळाले. या सेवांतून देवाने मला पुष्कळ आनंद दिला आणि मला घरची आठवणही येऊ दिली नाही. ६ मासांनी मला व्यवस्थापन विभागात सेवा मिळाली. तेव्हा सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची सेवा आणि व्यवस्थापनासंबंधी इतर सेवा करतांना देवाने मला पुष्कळ शिकवले. मला सेवेतील प्रत्येक बारकावा शिकवला आणि माझ्याकडून देवाच्या अनुसंधानात राहून देवाची समष्टी सेवाही करून घेतली. एक वर्ष पूर्ण झाल्यावर २७.२.२०१८ या दिवशी माझी ६३ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाली. तेव्हा मला प्रत्येक क्षणी ‘देव किती देतो ?’, याची जाणीव होऊन कृतज्ञता वाटली. तेव्हा मी आणखी एक टप्पा जवळ गेले. आता एक-एक टप्पा पुढे-पुढे जात मला देवाच्या चरणी लीन व्हायचे आहे. हिंदु राष्ट्राची स्थापना तर होणारच आहे. मला त्या सेवेतही सहभागी व्हायचे आहे. ‘देवाने आपल्याला आश्रमात येण्याची संधी देऊन त्याच्या जवळही घेतले’, याची जाणीव होऊन मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. आता इथेच न थांबता लवकर झोकून देऊन साधना करून संतही व्हायचे आहे. ‘मला देवच साहाय्य करणार आहे’, अशी माझी पूर्ण श्रद्धा आहे. ‘देवा, प्रत्येक क्षणी हे तन, मन आणि बुद्धी तुझ्या सेवेसाठी, तुझ्या जवळ येण्यासाठी आणि केवळ तुझ्यासाठी तुझ्याच चरणी अर्पण होऊ दे’, हीच तुझ्या चरणी कळकळीची प्रार्थना आहे.’

३. पूर्णवेळ साधिका होण्यासाठी आई-बाबांनी साहाय्य केल्याने त्यांच्याप्रती कृतज्ञता वाटणे आणि त्यांचीही शीघ्र आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी देवाच्या चरणी प्रार्थना होणे

मध्यप्रदेशातील ब्रह्मपूर (सध्याचे बुरहानपूर) येथे आमच्या घरी जळगाव (महाराष्ट्र) किंवा इतर जिल्ह्यांतील सेवाकेंद्रातून सनातनचे साधक सेवेसाठी यायचे, तेव्हा ते आमच्याच घरी काही दिवस थांबायचे. तेव्हापण बाबांनी काही विरोध केला नाही. कधीतरी बाबा सत्संगातही बसायचे. आता ते नामजप करतात. मला देवाविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटते, ‘देवाने माझ्या बाबांमध्ये एवढा पालट केला. त्यांनाही साधनेत आणले. आईही ब्रह्मपूरला सेवा दायित्व घेऊन करते. देव तिला सेवेसाठी शारीरिक आणि आध्यात्मिक बळ देत आहे. (‘सौ. विमल कदवाने यांची ६५ टक्के आध्यात्मिक पातळी आहे.’ – संकलक) मला आईकडूनपण पुष्कळ शिकायला मिळते. ती मला मुळापासून स्वभावदोष शोधून सांगते आणि मला साधनेसाठी प्रोत्साहन देते. मी घरी असतांना जेव्हा साधना करत नव्हते, तेव्हा आईनेच मला कापूर आणि अत्तर यांद्वारे आध्यात्मिक उपाय करणे, नामजप करणे, स्वभावदोष आणि अहं निर्मूलनासाठी स्वयंसूचना सत्र करणे, असे सर्वकाही शिकवले.

तिने मला वेळोवेळी साधनेविषयी मार्गदर्शन केले. माझ्यावर सुसंस्कार केले. आई-बाबांमुळे मी साधनेत येऊ शकले. सनातन आश्रमात साधनेसाठी पूर्णवेळ साधिका होऊ शकले आणि साधनेमुळे देवाच्या जवळ जाऊ शकले. देवा, एवढे चांगले आई-बाबा दिल्याविषयी मी तुझ्या चरणी जेवढी कृतज्ञता व्यक्त करते, तेवढी कमीच आहे रे !’

आई-बाबांना मी एकच मुलगी आहे. मी त्यांना २१ वर्षांनी झाली आहे, तरीही त्यांनी मला सनातन आश्रमात पूर्णवेळ साधनेसाठी पाठवले. त्यांनी हा एक प्रकारे त्याग केला आहे; म्हणून मला देवाविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटते. आईला माझी आठवण येते; पण तिने मला केवळ देवावर सोपवले. माझी चांगली साधना व्हावी; म्हणून मला आश्रमात पाठवले. बाबांची मी पुष्कळ लाडकी मुलगी आहे. मी कधी विचारसुद्धा केलेला नाही की, बाबा मला आश्रमात जाण्यासाठी अनुमती देतील; पण देवानेच त्यांना बुद्धी दिली आणि त्यासाठी बळ दिले. बाबांना साधनेविषयी एवढे ठाऊक नाही; पण आई साधना करते. त्यामुळे बाबा थोडी-थोडी साधना करतात. आई प्रसारात सेवेला जात असतांना बाबांनी आईला कधीच विरोध केला नाही. त्यांनी आईला ‘तू सेवा करू नकोस. घरात राहून सेवा कर’, असे कधीच सांगितले नाही.  बाबा आईला दैनिक सनातन प्रभात आणि सनातनची सात्त्विक उत्पादने यांचे वितरण करणे, तसेच हिंदु धर्मजागृती सभा आदी प्रासंगिक सेवांमध्ये साहाय्य करतात. त्यांनी आईला कधीच विरोध केला नाही. ‘देवा, माझ्या आई-बाबांकडून साधना करून घे आणि त्यांचीही साधनेत प्रगती शीघ्र गतीने होऊ दे’, हीच तुझ्या चरणी माझी प्रार्थना आहे.’

४. कृतज्ञता

‘देवा, आई-बाबातर सर्वांनाच असतात; पण साधनेचे सुसंस्कार करणारे, मुलांना साधनेविषयी प्रोत्साहित करणारे आई-बाबा अत्यल्प असतात. देवा, मी तुझ्या चरणी अनंत कोटी कृतज्ञ आहे.’

– देवाचेच लेकरू, कु. हर्षाली कदवाने (वय १५ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

श्री. विलास आणि सौ. विमल कदवाने

चौदा वर्षांच्या मुलीला रामनाथी येथील आश्रमात साधना करण्यासाठी पाठवणारे आदर्श आई-वडील श्री. आणि सौ. कदवाने !

‘कलियुगातील बहुतेक आई-वडील स्वतः साधना करत नाहीत आणि मुलांनाही करू देत नाहीत. अशा सर्व आई-वडिलांपुढे बुरहानपूर, मध्यप्रदेश येथील श्री. आणि सौ. कदवाने यांनी फार मोठा आदर्श ठेवला आहे. त्यांनी त्यांची केवळ १४ वर्षांची असतांना मुलगी हर्षाली हिला मध्यप्रदेशातून गोव्यातील रामनाथी येथील आश्रमात साधना करण्यासाठी पाठवले. याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे ! मुलांना पूर्णवेळ साधनेसाठी आश्रमात पाठवण्याच्या संदर्भात त्यांच्या आई-वडिलांकडून इतर पालकांना बरेच काही शिकता येईल. ‘आई-वडिलांचीही साधनेत जलद गतीने आध्यात्मिक प्रगती होईल’, याची मला खात्री आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले


Multi Language |Offline reading | PDF