आपण काय खातो ?

सजिवांना जगण्यासाठी अन्नसेवन करावे लागते. आहाराचा भाग स्थानिक वातावरण आणि प्रदेश यांनुसार वेगळा असतो. गेल्या काही वर्षांपासून भारतातील ऋतूचक्र बिघडले आहे. अर्थातच त्याचा परिणाम मानवी जीवांवर होण्यासह अन्नधान्य यांवरही होत आहे. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आवश्यक आहार न घेता अनावश्यक आहार घेतला जात आहे. त्याही गोष्टी शरीर पचवत असले, तरी दीर्घकाळ असेच चालू ठेवणे शरीराला शक्य नसते. कालांतराने शरीर कोणत्या तरी शारीरिक व्याधीच्या माध्यमातून, त्याचे पडसाद दाखवून देते. अशा प्रकारे आपणच आपल्या पचन शक्तीचा र्‍हास करतो. पिझ्झा, बर्गर आदी पदार्थ खाणे प्रतिष्ठेचे समजले जात आहे. येथील वातावरण कसे आहे ? आणि त्या अनुरूप आपला आहार कसा आहे ? याचा सारासार विचार होत नाही. अशा प्रकारचे पदार्थ उपलब्ध असणार्‍या उपहारगृहांत मित्र-मैत्रिणी यांसह एकत्र येऊन पुष्कळ वेळ वाया घालवला जातो. यासह पदार्थाचे छायाचित्र काढणे, तो खातांना ‘सेल्फी’ काढणे यांसारख्या गोष्टी आपसूकच चालू होतात आणि सामाजिक प्रसारमाध्यमांवर त्या ‘पोस्ट’ केल्या जातात. त्या पदार्थ सेवनातून शरीरासाठी पोषक असे काहीच मिळत नाही, तरीही आम्हाला त्याचीच चव आवडते. आपण शिक्षणाने प्रगत झालो; पण खर्‍या अर्थाने साक्षर झालो नाही, तर निरक्षरच राहिलो आहोत; कारण आपला आहार काय असावा ?, हे जाणून घेण्याची इच्छाच नाही.

‘अति घाई संकटात नेई’ असे एक सुवचन आहे. ते घाटमार्ग-महामार्ग येथून प्रवास करतांना पाट्यांवर वाचनात येते. ते वाक्य केवळ वाहन प्रवासापर्यंत मर्यादित नसून जीवनातील प्रत्येक क्षणी उपयोगात येणारे आहे. झटपट बनणारे, चटपटीत असणारे पदार्थ चवीने-आवडीने, अल्पाहार-भोजन म्हणून खाण्याचा आत्मघातकी प्रकार समाज मनावर बिंबला आहे. दूरचित्रवाहिन्या, वृत्तपत्रे यांतील विज्ञापनांतून त्या पदार्थांच्या विज्ञापनांचा भडीमार केला जात आहे आणि आम्ही त्याला बळी पडून स्वतःच्या शरीराची चाळण करून घेत आहोत. चिनी पदार्थ-वस्तू यांना येथे पायघड्याच घालण्यात आल्या आहेत. केवळ आता आपल्याला चिनी भाषा बोलता येणे आणि त्यांच्या प्रमाणे पोषाख परिधान करणे शेष राहिले आहे. आपली युवापिढी ही कमतरताही थोड्या दिवसांनी पूर्ण करेल, अशी स्थिती आहे. किती गुलाम मानसिकता ? येथील चिनी खाद्यपदार्थांच्या गाड्यांप्रमाणे चीनमध्येही भारतीय खाद्य पदार्थांच्या गाड्या लागत असतील का ?, हे लक्षात घेतले जात नाही. चिनी पदार्थांसाठी भुकेलेले भारतीयच शत्रूराष्ट्र ‘चीन’च्या खाद्य पदार्थांचा प्रचार-प्रसार करत आहेत. येथील सकस, पोषक असा आहार ग्रहण करायचा सोडून बुद्धी (अक्कल) गहाण टाकल्याप्रमाणे शरीराला हानी पोहोचवणार्‍या पदार्थांचेच सेवन करण्यावर जोर दिला जात आहे. जन्माने भारतीय असण्यासह प्रत्येक गोष्टीतही ‘भारतीय बाणा’ कसा राहील, याचा कृतीशील विचार आवश्यक आहे.

– श्री. जयेश राणे, भांडुप, मुंबई.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now