गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन

पणजी – गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचे १७ मार्च या दिवशी सायंकाळी निधन झाले. गेल्या काही मासांपासून ते स्वादुपिंड कर्करोगाने आजारी होते. १६ मार्चपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. सकाळीच त्यांची प्रकृती स्थिर असून ते फक्त डोळे उघडतात, असे सांगण्यात आले होते. त्यांना कृत्रिम ऑक्सिजन (व्हेंटिलिटर) देण्यात आल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली होती. पर्रीकर यांनी वर्ष १९७८ मध्ये मुंबई आयआयटीतून पदवी प्राप्त केली होती. ते आयआयटीची पदवी असणारे देशातील पहिले मुख्यमंत्री होते. त्यांचा जन्म १३ डिसेंबर १९५५ मध्ये झाला होता.

मनोहर पर्रीकर यांची राजकीय कारकीर्द

१. जून १९९९ ते नोव्हेंबर १९९९ पर्यंत ते गोवा विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते होते.

२. २४ ऑक्टोबर २००० ते २७ फेब्रुवारी २००२ पर्यंत ते मुख्यमंत्री होते. गोव्यामध्ये भाजपचे पहिल्यांदा सरकार स्थापन करण्याचे श्रेय त्यांना जाते.

३. ५ जून २००२ मध्ये ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. वर्ष २००५ पर्यंत ते मुख्यमंत्री होते.

४. वर्ष २०१२ मध्ये ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. वर्ष २०१४ मध्ये भाजपच्या केंद्रातील सरकारमध्ये त्यांना देशाचे संरक्षणमंत्री करण्यात आल्याने ते वर्ष २०१७ पर्यंत त्या पदावर होते. वर्ष २०१७ मध्ये झालेल्या गोव्याच्या निवडणुकीनंतर संरक्षमंत्रीपदाचा त्याग करून ते पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्री झाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांत ते सहभागी होत असल्याने त्यांच्यावर प्रारंभीपासूनच संघाचे संस्कार होते. मुख्यमंत्री असतांनाही ते संघाच्या वार्षिक कार्यक्रमात संघाचा पेहराव करून सहभागी होत असत. साधा शर्ट आणि पॅन्ट घालणारे, विधानसभेतही दुचाकीवरून जाणारे आणि पायात कधीच बूट न घालणारे व्यक्तीमत्व म्हणून ते गोव्यात प्रसिद्ध होते. त्यांना मुख्यमंत्रीपद मिळाल्यावरही शासकीय बंगल्यात न रहाता स्वतःच्या घरीच रहाणे पसंत केेले.

सनातन परिवार पर्रीकर कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.


Multi Language |Offline reading | PDF