मुलीने पूर्णवेळ साधना करण्याच्या संदर्भात वडिलांचे मुलीला व्यावहारिक दृष्टीने समजावणे आणि मुलीचे आध्यात्मिक दृष्टीने समजावणे

दैवी बालकांचे साधनेविषयीचे दृष्टीकोन असे असतात !

मुलगी : ‘बाबा, मला पूर्णवेळ साधना करायची आहे. मला शाळेत जायचे नाही.

बाबा : तू दोन्ही (शाळा आणि साधना) कर. तुला सेवेसाठी आवश्यकता असेल, तेव्हा मी तुला शाळेतून सुट्टी मिळवून देण्यात साहाय्य करीन.

मुलगी : मला शाळेतच जायचे नाही, तर सुट्टीचा प्रश्‍न कुठे येतो ?

बाबा : आठवीत गेल्यावर थोडी दारे उघडतात. १० वी नंतर पूर्ण उघडतात. आता शाळा सोडलीस, तर तुला सर्व दारे बंद होतील. तुझ्या वयाची मुले पूर्णवेळ साधना करत आहेत; म्हणून केवळ त्यांचे पाहून तू पूर्णवेळ होण्याचा निर्णय घेऊ नकोस. नंतर साधना जमली नाही, तर तुला पश्‍चात्ताप होईल.

मुलगी : बाबा, सर्व दारे बंद झाली, तरी गुरुकृपेचे दार सदैव उघडेच रहाणार आहे ना ? ते कधीच बंद होणार नाही.

बाबा : मला तुझ्यात पालट जाणवला, तर मी तुला स्वतःच ‘पूर्णवेळ हो !’, असे सांगेन.

मुलगी : मी पूर्णवेळ साधना करू लागले की, तुम्हाला माझ्यात पालट दिसेल ना ?

बाबा : तुला शाळा आणि अभ्यास नको, त्याचा तुला कंटाळा आणि आळस आला आहे. तुला नुसती मजा करायची आहे; म्हणून ‘तू आळसापोटी’, असे म्हणत आहेस.

(कोणामध्ये केव्हा आणि कसा पालट होणार, हे ज्याचे त्याचे प्रारब्ध आणि साधनेची तळमळ यांवर अवलंबून असते. एकाच वेळी पूर्णवेळ झालेल्या दोन साधकांची प्रगती झपाट्याने होईल, असे नाही. ज्याची ईश्‍वरप्राप्तीची तळमळ अधिक आणि त्यानुसार साधनेचे प्रयत्नही चांगले होतील, त्याची प्रगती देव निश्‍चित करून घेतो. – संकलक)

मुलगी : नाही बाबा, मला कायम साधनारत रहायचे आहे. तुम्हाला वाटत असेल की, व्यवहारात गणिताचा जास्त उपयोग होतो, तर तुम्ही माझी गणिताची शिकवणी घेऊ शकता.

बाबा : ९० टक्के सेवा या शिक्षणाशीच संबंधित आहेत. त्यामुळे तू शिक्षण घे आणि सेवाही कर. शिक्षणाने परिपक्वता येते आणि ती साधनेतही उपयोगी पडते.

मुलगी : बाबा, आपत्काळात सर्व शाळा बंद होतील. सर्व दारे बंद होतील. त्या वेळी एकच दार उघडे असेल आणि तेव्हा पुष्कळ गर्दी झालेली असेल; म्हणून आता ते दार उघडे आहे, तर त्याचा सदुपयोग करून घेऊया ना ?

बाबा : ज्या वेळी सर्व शाळा बंद होतील, त्या वेळी तू पूर्णवेळ हो !

मुलगी : बाबा, नंतर तुम्हालाच वाटेल, ‘तू आधीच पूर्णवेळ साधना करायला हवी होतीस.’

बाबा : तू आता अर्धवेळ आहेसच. ज्या वेळी तू पूर्णवेळ होशील, त्या वेळी सेवेत दुप्पटीने वाढ होईल. या व्यतिरिक्त तुझ्यात काही पालट होणार नाहीत.

मुलगी : बाबा, मला सतत त्याच सेवा करायला मिळाल्या, तरी चालतील; पण मला सेवारतच रहायचे आहे. मला तुम्ही इतक्या सवलती देता, तर ही सवलत का देत नाही ?

बाबा : तुझा असाच हट्ट असेल, तर पुण्याला चल. (पुण्याला मित्र-मैत्रिणी शिक्षण घेतांना पाहून त्या वातावरणात गेल्यास मुलीला शिक्षण पूर्ण करावेसे वाटेल, असे वडिलांना वाटत होते.)

साधारण १ वर्षापूर्वी त्या दोघांमध्ये वरील संभाषण झाले होते. या कालावधीत मुलीची साधना करण्याच्या तळमळीत वाढ होत गेली. त्यामुळे आता वडिलांनी तिला १० वी झाल्यानंतर पूर्णवेळ साधना करण्यास अनुमती दिली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, १० वी नंतर थोडीतरी प्रगल्भता येते आणि मुले योग्य निर्णय घेऊ शकतात.’

(दैवी बालकांमध्ये साधना करण्याची तळमळ उपजत असते. त्यामुळे ती व्यावहारिक जीवनात रमत नाहीत. लहान वयात पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतात तेव्हा ‘देवच काळजी घेईल’, अशी त्यांची श्रद्धा असते. खरेतर व्यक्ती व्यावहारिक जीवनात असो कि अध्यात्मात, देवच प्रत्येकाची काळजी घेत असतो. हे ज्याच्या लक्षात येईल, तो साधना करण्याचा निर्णय सहजतेने घेऊ शकतो. – संकलक)

– एक साधिका, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.११.२०१७)


Multi Language |Offline reading | PDF