फेब्रुवारी २०१९ मध्ये विविध वैज्ञानिक उपकरणांच्या आधारे ६० प्रयोगांद्वारे हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे महत्त्व सिद्ध !

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या संशोधन कार्याचा आढावा !

कु. प्रियांका लोटलीकर
श्री. शॉन क्लार्क

‘आजकाल अनेक लोकांचा संतांच्या अनुभवसिद्ध ज्ञानापेक्षा वैज्ञानिक उपकरणाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीवर अधिक विश्‍वास असतो. त्यामुळे वर्ष २०१४ पासून ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली वैज्ञानिक उपकरणांच्या माध्यमातूनही संशोधन करण्यात येत आहे. ‘हिंदु धर्मातील आचार, धार्मिक कृती, सामाजिक कृती (उदा. दीप प्रज्वलन, उद्घाटन इत्यादी), यज्ञ, अनुष्ठान, मंत्रपठण इत्यादी विषयांचे आध्यात्मिक महत्त्व आधुनिक वैज्ञानिक परिभाषेत समाजाला समजावून सांगणे’, हा या संशोधनाचा उद्देश आहे. यासाठी ‘इलेक्ट्रोसोमॅटोग्राफिक स्कॅनिंग’, ‘युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर (यू.टी.एस्.)’, ‘पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी (पिप)’, ‘थर्मल इमेजिंग’, ‘गॅस डिस्चार्ज व्हिजुअलायझेशन (जी.डी.व्ही.)’ इत्यादी आधुनिक वैज्ञानिक उपकरणे आणि प्रणाली यांचे साहाय्य घेण्यात येत आहे. या संशोधन कार्याला पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील ज्ञानाची, म्हणजे सूक्ष्म परीक्षणाची जोड देऊन विश्‍लेषण करण्यात येत आहे. या संशोधन कार्याचा फेब्रुवारी २०१९ या मधील आढावा येथे देत आहोत.

यू.टी.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

१. फेब्रुवारी २०१९ मध्ये ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने ऊर्जा आणि प्रभामंडळ मापक यंत्रांच्या साहाय्याने एकूण ६० प्रयोगांतर्गत केलेल्या १६७ चाचण्यांमध्ये ३४८ घटक/सहभागी व्यक्ती यांच्या एकूण ६४३ मोजण्यांच्या नोंदी करण्यात आलेल्या असणे : फेब्रुवारी २०१९ मध्ये ‘युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर (यू.टी.एस्.)’ आणि ‘गॅस डिस्चार्ज व्हिजुअलायझेशन (जी.डी.व्ही.)’ ही ऊर्जा आणि प्रभामंडळ मापक यंत्रे अन् प्रणाली यांच्या माध्यमातून करण्यात आलेले प्रयोग, चाचण्या, घटक आणि मोजण्यांच्या नोंदी यांची संख्या पुढील सारणीत दिली आहे.

जी.डी.व्ही. बायोवेल (Biowell) उपकरण या उपकरणानेही विविध वैज्ञानिक प्रयोगांद्वारे संशोधन करण्यात येते.

१ अ. ‘प्रयोग, चाचण्या, घटक आणि मोजण्यांच्या नोंदी’ या संज्ञांचे अर्थ : या संज्ञांचे अर्थ ‘सात्त्विक आणि असात्त्विक नक्षी असलेल्या सोन्याच्या अलंकारांचा व्यक्तीवर आध्यात्मिक स्तरावर होणारा परिणाम’ अभ्यासण्यासाठी केलेल्या एका प्रयोगाचे उदाहरण घेऊन त्यातून आपण समजून घेऊया. या प्रयोगात वाईट शक्तींचा त्रास असलेल्या ५ साधिका आणि वाईट शक्तींचा त्रास नसलेल्या ५ साधिका सहभागी झाल्या होत्या. या प्रयोगाच्या संदर्भात ‘प्रयोग, चाचण्या, घटक आणि मोजण्यांच्या नोंदी’ या संज्ञांचे अर्थ पुढीलप्रमाणे आहेत.

१ अ १. प्रयोग : प्रयोगातील प्रत्येक साधिकेने सात्त्विक नक्षी असलेला हार आणि असात्त्विक नक्षी असलेला हार घालण्यापूर्वी अन् घातल्यानंतर वरील सारणीमध्ये दिलेल्या यंत्रांपैकी एका यंत्राद्वारे (उदा. ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे) केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या. हा एक प्रयोग झाला.

१ अ २. चाचण्या : या एका प्रयोगात ‘सात्त्विक नक्षी असलेल्या हाराचा परिणाम अभ्यासणे’ आणि ‘असात्त्विक नक्षी असलेल्या हाराचा परिणाम अभ्यासणे’, अशा २ चाचण्या आहेत.

१ अ ३. घटक : या प्रयोगामध्ये वाईट शक्तींचा त्रास असलेल्या ५ साधिका आणि वाईट शक्तींचा त्रास नसलेल्या ५ साधिका अशा एकूण १० साधिका, म्हणजे १० घटक आहेत.

१ अ ४. मोजण्यांच्या नोंदी : या प्रयोगामध्ये प्रत्येक साधिकेच्या संदर्भात तिने सात्त्विक नक्षी असलेला हार घालण्यापूर्वी आणि घातल्यानंतर, तसेच असात्त्विक नक्षी असलेला हार घालण्यापूर्वी अन् घातल्यानंतर, अशा प्रकारे यंत्राद्वारे केलेल्या मोजण्यांच्या एकूण ४ नोंदी करण्यात आल्या. याचा अर्थ १० साधिकांच्या यंत्राद्वारे केलेल्या एकूण ४० मोजण्यांच्या नोंदी झाल्या.

२. फेब्रुवारी २०१९ मध्ये ‘यू.टी.एस्.’ या यंत्राच्या साहाय्याने केलेल्या प्रयोगांमध्ये केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे आध्यात्मिक विश्‍लेषण करून ८ संशोधन अहवाल बनवण्यात आले, तसेच यज्ञाच्या संदर्भात केलेल्या सूक्ष्म परीक्षणावर आधारित १ लेख बनवण्यात आला. वैशिष्ट्यपूर्ण संशोधन प्रयोगांतील ठळक निरीक्षणे आणि त्यामागील अध्यात्मशास्त्र पुढे दिले आहे. ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांच्यातील नकारात्मक ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा आणि एकूण प्रभावळ (ऑरा) मोजता येते. सामान्य व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये नकारात्मक ऊर्जा असू शकते; परंतु सकारात्मक ऊर्जा असेलच, असे नाही. ‘सामान्य व्यक्ती किंवा वस्तू यांची एकूण प्रभावळ साधारण १ मीटर असते’, हे लक्षात घेऊन पुढील सारणी वाचावी.

टीप – ‘ग्रहगणितामुळे कुंभपर्वक्षेत्रीचे गंगादी जलस्रोत आरोग्यवर्धक होणे : विशिष्ट तिथी, ग्रहस्थिती आणि नक्षत्र यांच्या योगावर येणार्‍या कुंभपर्वाच्या वेळी ब्रह्मांडीय ऊर्जेचा (कॉस्मिक एनर्जीचा) प्रभाव प्रयाग, हरिद्वार, उज्जैन, नाशिक येथील गंगादी पवित्र नद्या आणि त्यांच्या ४५ कि.मी. परिघातील सर्व जलस्रोत आकाशीय विद्युत-चुंबकीय प्रभावाच्या चिकित्सकीय गुणांनी युक्त होतात, तसेच त्यांतील जल कुठलेही विद्युतरोधक वस्तूंच्या (लाकूड, प्लास्टिक, काच इत्यादींच्या) पात्रात ठेवूनही त्यांचा हा गुण अनेक दिवस टिकून रहातो, असे आधुनिक अवकाश वैज्ञानिक आणि भौतिकतज्ञ यांनी संशोधनाअंती मान्य केले आहे.’ (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘कुंभपर्वाचे माहात्म्य’)

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पादुकांचे ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे केलेले संशोधन

भृगु जीवनाडी वाचक श्री. सेल्वम् गुरुजी यांच्या माध्यमातून महर्षींनी सांगितल्याप्रमाणे १०.२.२०१९ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ‘पादुका धारण सोहळा’ पार पडला. रामनाथी आश्रमासह अन्य १६ ठिकाणी असलेले सनातनचे आश्रम अन् सेवाकेंद्रे येथे ठेवण्यासाठी एकूण १७ पादुका बनवण्यात आल्या. या सर्व पादुकांचे ‘यू.टी.एस्.’ परीक्षण केले असता त्या पादुकांतील किमान सकारात्मक ऊर्जा १८.०४ मीटर, तर कमाल सकारात्मक ऊर्जा ७७.१७ मीटर होती. पादुकांच्या निर्मितीसाठी उन्नतांचा असलेला संकल्प, तसेच साधक-कलाकारांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार स्पंदनशास्त्राचा सुयोग्य अभ्यास करून पादुका भावपूर्णरीत्या बनवल्या असणे, यांमुळे त्या पादुकांमध्ये आरंभीच पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असल्याचे आढळले. या पादुकांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काही सेकंद हस्तस्पर्श केल्यानंतर त्या पादुकांच्या सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ प्रमाणात वाढ झाली. (हस्तस्पर्श केल्यानंतर पादुकांतील किमान सकारात्मक ऊर्जा ९४.७० मीटर होती, तर कमाल सकारात्मक ऊर्जा १५४.३६ मीटर होती.) या १७ पादुकांपैकी एक पादुका परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सोहळ्यात धारण केल्या होत्या. त्यांनी पादुका धारण केल्यानंतर त्या पादुकातील सकारात्मक ऊर्जा १७६.५३ मीटर झाली. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील चैतन्याच्या प्रभावामुळे त्यांनी केवळ काही सेकंद हस्तस्पर्श केलेल्या, तसेच सोहळ्यात धारण केलेल्या पादुका यांवर पुष्कळ सकारात्मक परिणाम झाला.

४. समाजात जाऊन संशोधन करणे

डावीकडून केरळ कलामंडलम्चे शैक्षणिक समन्वयक श्री. गोपाकुमार आणि इंग्रजीचे प्राध्यापक श्री. शिनोज यांना महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाची माहिती सांगतांना श्री. रूपेश रेडकर

४ अ. उद्देश : देशातील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैशिष्ट्ये अभ्यासण्यासाठी विविध धार्मिक स्थळे (मंदिरे, संतांची समाधीस्थाने, संतांचे आश्रम वा मठ आदी), विशेष धार्मिक उपक्रम (यज्ञ-याग, धार्मिक उत्सव आदी), तसेच वैशिष्ट्यपूर्ण आध्यात्मिक घटना यांविषयी आध्यात्मिक संशोधन करण्याच्या उद्देशाने समाजात जाऊन संशोधन केले जाते. हे संशोधन ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध केले जाते. तसेच त्या संदर्भात केलेल्या चित्रीकरणाची ध्वनीचित्र-तबकडी (सी.डी.) बनवून ती संबंधितांना भेट दिली जाते. या संशोधनातून देशातील विविध स्थानांची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैशिष्ट्ये, तसेच तेथील संस्कृतीचे जतन अन् संवर्धन यांसाठीचे वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न यांची माहिती समाजाला मिळते. तेथे केलेल्या संशोधनातून अध्यात्मशास्त्र सांगितल्याने अध्यात्मप्रसार होतो, तसेच सनातन धर्म आणि हिंदु संस्कृती यांचे महत्त्व लोकांवर बिंबते.

४ आ. केलेले संशोधन

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’चा एक संशोधन गट कु. प्रियांका लोटलीकर यांच्या नेतृत्वाखाली फेब्रुवारी मासात केरळ राज्यात संशोधनासाठी गेला होता. या संशोधन गटाने केरळ राज्याच्या कासारगोड आणि थ्रिसूर जिल्ह्यांतील प्राचीन मंदिरे, आश्रम, कला केंद्र इत्यादी स्थळांना भेटी दिल्या. या गटाने तेथे केलेल्या वैशिष्ट्यूपर्ण संशोधनाविषयी थोडक्यात माहिती पुढे दिली आहे.

४ आ १. कोंडेवूर, उप्पाला (केरळ) येथील श्री नित्यानंद योगाश्रम परिसरात केलेले संशोधन

४ आ १ अ. श्री नित्यानंद योगाश्रमाच्या परिसरातील माती आणि पाणी, तसेच ‘नक्षत्रवना’तील ग्रह, नक्षत्र, राशी यांच्याशी निगडित ४९ वनस्पतींचे ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे परीक्षण करण्यात आले. तेथील माती, पाणी आणि नक्षत्रवनातील वनस्पती यांमध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आढळली.

४ आ १ आ. ‘विश्‍वजित अथिरत्र सोमयाग’ : १८ ते २४ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत आश्रमात ‘विश्‍वजित अथिरत्र सोमयाग’ करण्यात आला. ‘अतिवृष्टी, तसेच अनावृष्टी होऊ नये’, यासाठी केरळच्या राजांनी ५०० वर्षांपूर्वी हा प्राचीन वैदिक याग केला होता, अशी मान्यता आहे. त्यानंतर हा याग आता प्रथमच करण्यात येत आहे. या यागाअंतर्गत २१.२.२०१९ या दिवशी केलेल्या ‘अरुण केतुक चयन’ या विधीचे ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे परीक्षण करण्यात आले. या विधीच्या अंतर्गत त्या दिवशी ४ मीटर खोल अन् ४ मीटर रुंद गोलाकार विहिरीसारख्या कुंडात १ सहस्र २०० मातीचे कलश ठेवण्यात आले. प्रत्येक कलशात पाण्यासह कमळ ठेवण्यात आले. दुसर्‍या दिवशी या कलशांतील कमळांवर अग्नीची स्थापना करण्यात आली, म्हणजे अग्नीत त्यांची आहुती देण्यात आली. या कुंडामध्ये कमळस्थापना करण्यापूर्वी अन् केल्यानंतर, तसेच अग्निस्थापना करण्यापूर्वी आणि केल्यानंतर त्या कुंडाचे ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे परीक्षण करण्यात आले. तेव्हा कुंडामध्ये कमळस्थापना केल्यानंतर त्या कुंडाच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत वाढ झाल्याचे आढळले. तसेच अग्नीची स्थापना केल्यानंतर, म्हणजे आहुती दिल्यानंतर त्या कुंडाच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत आणखी वाढ झाल्याचे दिसून आले.

४ आ २. ‘कथकली’ आणि ‘मोहिनीअट्टम’ या नृत्यांसंदर्भात केलेले संशोधन

मोहिनीअट्टम नृत्य करण्यापूर्वी नृत्यांगनेचे ‘यू.टी.एस्.’ परीक्षण करतांना महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे श्री. रूपेश रेडकर

४ आ २ अ. थ्रिसूर जिल्ह्यातील केरळ कलामंडलम् येथील कथकली नृत्य विभागातील ३ नृत्य-शिक्षकांचे ‘वेशभूषा-रंगभूषा करण्यापूर्वी’ आणि ‘हे करून नृत्य केल्यानंतर’ ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे परीक्षण करण्यात आले. तेव्हा नृत्यानंतर त्या सर्वांच्या सकारात्मक ऊर्जेत वाढ झाल्याचे आढळले.

४ आ २ आ. मोहिनीअट्टम नृत्याचा कलाकार, वाद्य आणि घुंगरू यांवर सकारात्मक परिणाम होणे : ‘केरळ कलामंडलम्’च्या मोहिनीअट्टम विभागातील २ नृत्यांगना, १ गायिका, ३ वादक (नट्टूवांगम् (झांजेसारखे वाद्य), व्हायोलिन आणि मृदंग या वाद्यांवर वादन केलेले वादक), तसेच व्हायोलिन अन् नृत्यांगनांचे घुंगरू यांचे ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे परीक्षण करण्यात आले. तेव्हा नृत्यानंतर त्या सर्व घटकांच्या सकारात्मक ऊर्जेत वाढ झाल्याचे दिसून आले.

वरील नृत्य प्रयोगांतून भारतीय शास्त्रीय नृत्याचे आध्यात्मिक स्तरावरील महत्त्व लक्षात येते.

(वर्ष २०१७ मध्ये रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पाश्‍चात्त्य आणि कथक नृत्यांचा नृत्यांगनेवर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी एक प्रयोग करण्यात आला. आरंभी नृत्यांगनेमध्ये नकारात्मक ऊर्जा नव्हती. तिच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा होती. तिने पाश्‍चात्त्य नृत्य केल्यावर तिच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली अन् तिच्यातील सकारात्मक ऊर्जा न्यून झाली. याउलट तिने कथक नृत्य केल्यावर तिच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली.)

५. फेब्रुवारी २०१९ मध्ये २ वैज्ञानिक परिषदांमध्ये सहभाग

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने करण्यात आलेल्या आध्यात्मिक संशोधनावर आधारित परात्पर गुरु डॉ. आठवले लिखित शोधनिबंध पुढील परिषदांमध्ये मांडण्यात आले.

५ अ. ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने वाराणसी येथे सादर करण्यात आलेल्या शोधनिबंधाचे वृत्त ‘दैनिक पुणे प्रहार’, ‘दैनिक बदलापूर विकास’ आणि ‘साप्ताहिक कोकण संध्या’ या ३ मराठी नियतकालिकांत अन् ‘मुंबई आस पास’ या हिंदी नियतकालिकात प्रसिद्ध झाले.

६. ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने आध्यात्मिक संशोधनावर पाठवण्यात आलेल्या ६ प्रबंधांचा पुढे होणार्‍या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदांकडून स्वीकार

– कु. प्रियांका लोटलीकर आणि श्री. शॉन क्लार्क, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (२.३.२०१९)

ई-मेल : mav.research२०१४@gmail.com

‘गाढवाला गुळाची चव काय ?’, ही म्हण सार्थ करणारे तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी !

पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने जुलै २०१६ पासून २८.२.२०१९ पर्यंत ४३ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांत शोधनिबंध सादर करण्यात आले. नुकतेच अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिना येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर केलेल्या ‘समाजसेवेमुळे आध्यात्मिक उन्नती होते का ?’, तसेच पुरी, ओडिशा येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर केलेल्या ‘खरे नेतृत्व उच्च आध्यात्मिक स्तर असलेली व्यक्तीच करू शकते !’ या शोधनिबंधांना ‘सर्वोत्कृष्ट शोधनिबंध’, म्हणून घोषित करण्यात आले. सर्व शोधनिबंधांचे संशोधनकर्ते आणि लेखक परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत. त्यांच्या हिंदु धर्म, संस्कृती इत्यादी विषयांवरील संशोधनकार्याच्या एक लक्षांश तरी कार्य तथाकथित बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी केले आहे का ? ‘गाढवाला गुळाची चव काय ?’, अशा वृत्तीच्या बुद्धीप्रामाण्यवाद्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये काय कळणार !’ – (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.३.२०१९)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.


Multi Language |Offline reading | PDF