हिंदूंना दिशादर्शन करणारा दीपस्तंभ ‘सनातन प्रभात’ !

विशेष संपादकीय

सध्या हिंदूंचे खच्चीकरण करण्याचे उद्योग कथित पुरोगामी, सुधारणावादी, बुद्धीवादी, साम्यवादी यांनी चालवले आहेत. अशा स्थितीत ‘सनातन प्रभात’ एका निर्भीड सैनिकाप्रमाणे या सर्व हिंदुद्वेष्ट्यांवर शाब्दिक प्रहार करत आहे. शब्दांची शक्ती आम्ही जाणतो. ‘शब्दांमध्ये काय किमया आहे’, हे लोकमान्य टिळक यांच्या ‘केसरी’ने दाखवून दिले होते. त्याच ‘केसरी’चा वसा घेऊन ‘सनातन प्रभात’ मार्गक्रमण करत आहे. हिंदु राष्ट्राच्या दिशेने होत असलेले मार्गक्रमण सोपे-सुलभ नक्कीच नाही. आतापर्यंत अनंत अडचणी आणि संकटे आली. बंदीचे संकट आले, संपादकांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला, माजी संपादक पू. पृथ्वीराज हजारे यांना अटकही झाली; मात्र या अडचणींवर मात करून ‘सनातन प्रभात’ या उदात्त ध्येयाच्या दिशेने एक एक पाऊल जोरकसपणे टाकत आहे. राष्ट्ररक्षण आणि धर्मकार्य यांसाठी ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूह गेली २० वर्षे अविरतपणे झटत आहे. कोणत्याही प्रकारचे राजकीय आणि आर्थिक पाठबळ नसतांना एखादे नियतकालिक चालवणे, हा चमत्कार आहे. ईश्‍वराचे पाठबळ आणि संतांचे आशीर्वाद यांमुळेच हे शक्य झाले आहे.

हिंदुत्वनिष्ठांच्या विश्‍वासास पात्र !

हिंदु राष्ट्र-जागृती सभेत हिंदुत्वनिष्ठ वक्ते नेहमीच उपस्थित हिंदूंना ‘सनातन प्रभात’ वाचण्याचे आवाहन करतात. अन्य संघटनांच्या हिंदुत्वनिष्ठांना ‘समस्त हिंदूंनी अन्य दैनिक नव्हे, तर ‘सनातन प्रभात’ वाचावे’, असे का वाटते ? त्यांनी सांगितल्यानुसार केवळ ‘सनातन प्रभात’मध्येच हिंदूंची सद्य आणि वस्तूनिष्ठ स्थिती कळते. प्रसारमाध्यमांमध्ये हिंदु धर्मावर होणारे आघात हे एक तर प्रसारित केले जात नाहीत अथवा त्याविषयी एकांगी वृत्तांकन केले जाते. याउलट ‘सनातन प्रभात’मध्ये बंगाल, काश्मीर, केरळ आदी राज्यांमध्ये हिंदूंची होत असलेली परवड, ‘लव्ह जिहाद’मुळे हिंदु युवतींचे धर्मांतर करून त्यांच्यावर धर्मांधांकडून केले जाणारे अत्याचार, धर्मांधांकडून हिंदुत्वनिष्ठांच्या होत असलेल्या हत्या या वृत्तांना प्रसिद्धी दिली जाते. ‘हिंदूंवरील आघाताची वृत्ते अन्य कोणत्याही वृत्तपत्रांमध्ये येणार नाहीत; पण ती ‘सनातन प्रभात’मधून नक्कीच कळणार’, याची हिंदूंना निश्‍चिती आहे.

‘केवळ आघातांचे वृत्तांकन केले; म्हणजे आपले दायित्व संपले’, असा संकुचित दृष्टीकोन न ठेवता ‘हे आघात थांबण्यासाठी हिंदूंनी कृतीशील व्हायला हवे’, हा ‘सनातन प्रभात’चा उद्देश आहे. गोव्यात, तसेच महाराष्ट्रातही ‘सनबर्न’सारखे संस्कृतीविघातक कार्यक्रम आयोजित करून विकृती पसरवण्याचे काम सरकारी पातळीवर करण्यात आले. ‘सनबर्न’मुळे होणारी हानी, त्या वेळी होणारी अमली पदार्थांची विक्री आणि त्यामुळे तरुणांचा गेलेला बळी याविषयी ‘सनातन प्रभात’ने वाचा फोडली. याचा परिणाम म्हणजे समाजातही ‘सनबर्न’च्या विरोधात वातावरण निर्माण झाले. काही ठिकाणी त्याच्या विरोधात नागरिक, तसेच संघटना यांनी वैध मार्गाने आंदोलने केली. त्याला ‘सनातन प्रभात’ने मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिली. ‘सनबर्न’सारख्या विकृतींना आळा घालण्यासाठी सरकार, प्रशासन आणि पोलीस यांचा कुठल्याच पातळीवर सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. अशा वेळी या विकृतींना आळा घालण्यासाठी समाजानेच पुढाकार घेणे अपरिहार्य ठरते. ‘समाजालाही या विरोधात आपण काहीतरी करावे’, असे वाटत असते; मात्र त्यांना दिशा देणारे कोणी नसते. ही उणीव ‘सनातन प्रभात’ भरून काढत आहे. संयत मार्गाने आंदोलन कसे करायचे, प्रशासकीय अधिकारी तक्रारींना जुमानत नसतील, तर पुढे काय करावे, याविषयी ‘सनातन प्रभात’मधून मार्गदर्शन केले जाते.

वैचारिक आतंकवाद्यांचा समाचार !

वैचारिक आतंकवाद हा जिहादी आतंकवादाएवढाच भयंकर आहे. सातत्याने वैचारिक आघात करून हिंदूंमध्ये त्यांच्याच गौरवशाली परंपरेविषयी नकारात्मक भावना निर्माण करून त्यांना तेजोहीन करण्याचा वैचारिक आतंकवाद्यांचा डाव आहे. ‘एकदा का हिंदु स्वधर्माविषयी अस्मिताहीन, उदासीन आणि नकारार्थी झाले की, हिंदु धर्म संपवण्यास सोपे जाईल’, असे वैचारिक आतंकवाद्यांना वाटते. हा वैचारिक आतंकवाद निपटायचा असेल, तर त्याचे तितक्याच तोडीने वैचारिक खंडण करणे आवश्यक आहे. त्यामुळे कुठेही हिंदु धर्मावर आघात झाल्यास ‘सनातन प्रभात’ने याचे कशा प्रकारे खंडण केले आहे ?’, याची हिंदूंना उत्सूकता असते. तसेच या खंडणांचा अभ्यास करून हिंदूही त्यांच्या स्तरावर हिंदुद्वेष्ट्यांना संयत मार्गाने प्रतिवाद करू लागले आहेत.

आत्मचैतन्य जागृत करणारे दैनिक !

पनवेल येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्य करणारे आणि नुकताच देहत्याग केलेले परात्पर गुरु परशराम पांडे महाराज यांचे अमूल्य मार्गदर्शन सनातन प्रभातला नेहमीच मिळाले. त्यांच्याच मार्गदर्शनानुसार ‘सनातन प्रभात’चे ‘आत्मचैतन्याचा स्रोत जागृत करणारे दैनिक’ हे ब्रीदवाक्य २५ मार्च २०१८ या दिवसापासून अंतर्भूत करण्यात आले. त्यानंतर १० एप्रिलला त्यामध्ये पालट करून ‘आत्मचैतन्यावरील अज्ञानाचे आवरण दूर करणारे दैनिक’ असे करण्यात आले. वास्तविक हे शिवधनुष्य आहे; कारण व्यक्तीच्या आत्मचैतन्यावरील आवरण दूर करून तिच्यातील आत्मचैतन्य संतच जागृत करू शकतात. त्यामुळे त्यांच्याच आशीर्वादाने हे ध्येय साध्य होणार आहे ! राष्ट्रहित आणि धर्महित साधण्यासाठी ‘आत्मचैतन्य जागृत करण्याचे महत्त्व काय ?’, असा प्रश्‍न येथे पडू शकतो. तसे पाहिले, तर मागील काही वर्षांपासून हिंदु राष्ट्राची मागणी जोर पकडू लागली आहे. यासाठी हिंदुत्वनिष्ठही प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत; मात्र त्यांनी केलेल्या प्रयत्नांना म्हणावे तसे यश मिळतांना दिसत नाही. याविषयी व्यापक चिंतन केल्यास आपल्या लक्षात येते की, हिंदूंमध्ये आत्मबल नाही. म्हणजे काय, तर त्यांचा साधनेचा पाया कमकुवत आहे. हिंदूंचे आत्मबल वाढवण्यासाठी त्यांच्यात आत्मचैतन्य जागृत होणे आवश्यक आहे. ‘सध्याच्या आपत्काळात काय साधना करावी ?’, ‘भावभक्ती कशी वाढवावी ?’, याविषयी ‘सनातन प्रभात’मधून मार्गदर्शन केले जाते. इतिहासात ‘समाजाचा आध्यात्मिक स्तरावर उत्कर्ष व्हावा’, यासाठी झटणारी नियतकालिके विरळाच आहेत. त्यांतील ‘सनातन प्रभात’ हे एक आहे.

सध्याचा काळ मोठ्या संक्रमणाचा आहे. आध्यात्मिक परिभाषेत याला संधीकाल असे म्हणतात. ‘येणार्‍या काळात नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींचे प्रमाण वाढून आपत्कालीन स्थिती उद्भवून सर्व स्तरांवर मोठी हानी होणार आहे’, असे भाकित अनेक संतांनी केले आहे. दैनिक सनातन प्रभातमधून येणार्‍या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी काय पूर्वसिद्धता करायला हवी, साधना कशी वाढवायला हवी याविषयी व्यापक समाजहिताचा दृष्टीकोन समोर ठेवून मार्गदर्शन केले जाते. येणार्‍या काळातही दैनिकातील मार्गदर्शनानुसार आचरण केल्यास आपत्काळात तरून जाण्यासाठी साहाय्य होणार आहे. सनातन प्रभातचे लक्ष्य असलेले हिंदु राष्ट्र स्थापन होईपर्यंत संघर्ष अपरिहार्य आहे. सनातन प्रभात या संघर्षाचा साक्षीदार बनून त्याचा खारीचा वाटा उचलणारच आहे. आमचे वाचकही यात आम्हाला आतापर्यंत दिली, तशीच साथ देतील, यात शंका नाही. हे भगवंता, आता केवळ ‘एकच लक्ष्य हिंदु राष्ट्र’ या दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी आम्हाला शक्ती, बुद्धी आणि भरभरून चैतन्य दे, अशी तुझ्या चरणी तळमळीने प्रार्थना करतो !


Multi Language |Offline reading | PDF