चैतन्याच्या स्तरावर साधक आणि वाचक यांनी दैनिक सनातन प्रभातचा लाभ करून घ्यावा यासाठी सतत धडपडणारे परात्पर गुरु पांडे महाराज !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पाने आणि अनेक संतांच्या आशीर्वादाने दैनिक सनातन प्रभात गेली १९ वर्षे अखंडपणे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कार्यरत आहे. दैनिक सनातन प्रभातच्या विचारांची उंची वाढवण्यासाठी अनेक संतांच्या आशीर्वादासह परात्पर गुरु पांडे महाराज यांचे योगदान मोठ्या प्रमाणात आहे. परात्पर गुरु पांडे महाराज हे जरी देहाने आता नसले, तरी त्यांनी केलेल्या अनमोल मार्गदर्शनामुळे ते कायमच आमच्या समवेत आहेत.

परात्पर गुरु पांडे महाराज

दैनिक सनातन प्रभातमधील चैतन्य न्यून होऊ नये यासाठी ‘दैनिकातील प्रत्येक शब्द अचूक असावा’ यासाठी ते अविरतपणे वयाच्या ९२ व्या वर्षीही तळमळीने प्रयत्नरत होते. प्रतिदिन दैनिकाचा अभ्यास करून त्यातील चुका ते आम्हाला दाखवून देत असत. त्या दुरुस्त होण्यासाठीही जणू दैनिक सनातन प्रभातमध्ये सेवाच करत आहेत, या भावाने ते तळमळीने प्रयत्नरत असत. परात्पर गुरु पांडे महाराज आणि दैनिक सनातन प्रभात यांचे अतूट नाते होते. ईश्‍वराच्या संकल्पामुळे चैतन्याने भारीत झालेल्या दैनिक सनातन प्रभातचा धर्मजागृती, हिंदूसंघटन अन् राष्ट्ररक्षण यांसाठीचा लाभ साधकांसह वाचक, हितचिंतक आणि हिंदुत्वनिष्ठ यांनाही व्हावा यासाठी ते पुष्कळ तळमळीने प्रयत्न करत असत. या प्रयत्नांमधील एक प्रसंग अजूनही स्मरणात आहे.

वैद्या (कु.) माया पाटील

दैनिक सनातन प्रभातमधील चैतन्यामुळे या दैनिकाचे वाचन करणार्‍या प्रत्येक वाचकाला चैतन्य मिळते. या चैतन्याचा परिणाम म्हणून वाचकाचे आत्मचैतन्य जागृत होते आणि त्याचा लाभ वाचकाला होतो. याची जाणीव वाचकाला व्हावी; किंबहुना प्रत्येक वाचकाने याच भावाने दैनिकाचे वाचन करावे यासाठी त्यांनी दैनिक सनातन प्रभातच्या पृष्ठ क्रमांक १ वर ‘आत्मचैतन्याचा स्रोत जागृत करणारे दैनिक’ हे वाक्य ‘सनातन प्रभात’ या नावाच्या वरती ठळक दिसेल असे लिहिण्यास सुचवले. त्याप्रमाणे त्यांनी दिलेल्या सूचनेचे पालन दैनिक सनातन प्रभातने केले. अन्य संतांनी त्यामध्ये अजून पालट सुचवल्यामुळे आता हेच वाक्य ‘आत्मचैतन्यावरील अज्ञानाचे आवरण दूर करणारे दैनिक’ असे प्रसिद्ध करत आहोत.

परात्पर गुरु पांडे महाराज सगुणातून नसले, तरी निर्गुणातून त्यांच्या विचारांच्या माध्यमातून ते सतत आमच्या समवेत आहेत. त्यांची कृपादृष्टी आम्हा सर्व साधकांवर राहो, अशी त्यांच्या चरणी भावपूर्ण प्रार्थना !

परात्पर गुरु पांडे महाराज यांनी वेळोवेळी केलेले अमूल्य मार्गदर्शन आमच्यासाठी आजही प्रेरणादायी आहे, याकरिता आम्ही सर्व जण त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो !

– वैद्या (कु.) माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल


Multi Language |Offline reading | PDF