झोपतांना शरिराची स्थिती कशी असावी ?

१. सामान्य नियम

झोपेचा उद्देश शरिराला विश्रांती मिळावी, हा असतो. या दृष्टीने ‘ज्या स्थितीत शरिराला सर्वांत जास्त आराम मिळेल, ती झोपेची स्थिती चांगली’, हा सामान्य नियम होय. प्रत्येकाची प्रकृती आणि तत्कालीन स्थिती यांनुसार आरामदायी स्थिती वेगवेगळी असू शकते. आपण कोणत्या स्थितीत झोपावे, हे झोप लागेपर्यंतच आपल्या हातात असते. झोप लागल्यावरची शरिराची स्थिती आपल्या नियंत्रणात नसते.

२. झोपण्याच्या विविध स्थितींचे विवेचन

झोपेच्या चार स्थिती असू शकतात. त्यांचा ऊहापोह –

२ अ. पालथे (पोटावर) झोपणे : नवजात बालके आणि लहान मुले यांना या स्थितीत झोपवल्याने त्यांचा श्‍वास कोंडण्याची शक्यता असते. यामुळे त्यांना पालथे झोपवू नये. पालथे झोपल्याने पाठीच्या मणक्यांवर इतर स्थितींच्या तुलनेत जास्त ताण येतो.

२ आ. उताणे (पाठ टेकवून) झोपणे : आपण जेव्हा उभे असतो, तेव्हा आपल्या पाठीच्या मणक्यांवर येणारा दाब १०० टक्के, असे गृहीत धरल्यास उताणे झोपल्यावर हा दाब ७५ टक्के न्यून होऊन २५ टक्के एवढाच राहतो. उताणे झोपल्यावर पाठीच्या मणक्यांवर सर्वांत न्यून दाब येत असल्याने पाठीच्या मणक्यांशी संबंधित विकार असलेल्यांना उताणे झोपल्याने लाभ होतो. उताणे झोपून गुडघ्यांखाली लहानशी उशी घेतल्यास पाठीच्या कण्याला अजून जास्त आराम मिळतो.

२ आ १. उताणे झोपणे आणि घोरणे यांचा संबंध : ज्यांना घोरण्याची सवय आहे, त्यांचे घोरणे उताणे झोपल्याने वाढते. झोपेमध्ये जेव्हा घशाची अंतस्त्वचा (आतील त्वचा) शिथिल होऊन श्‍वसनमार्गात अडथळा निर्माण होतो, तेव्हा घोरणे चालू होते. उताणे झोपल्याने श्‍वसनमार्गात अडथळा निर्माण होण्याचे प्रमाण वाढते. कुशीवर झोपल्याने शिथिल झालेली अंतस्त्वचा श्‍वसनमार्गातून बाजूला झाल्याने घोरणे थांबते. यामुळे कुशीवर वळल्यावर घोरणे न्यून झाल्याचा अनुभव अनेकांना येतो.

२ इ. कुशीवर झोपणे : कुशीवर झोपलेल्या स्थितीत मणक्यांवर उभे राहण्याच्या तुलनेत ७५ टक्के दाब असतो. उजव्या कुशीवर झोपल्याने चंद्रनाडी, तर डाव्या कुशीवर झोपल्याने सूर्यनाडी चालू होण्यास साहाय्य होते.

प्राक्शिरा दक्षिणाननो दक्षिणशिराः प्रागाननो वा स्वपेत् ।
– आचारेन्दु, शयनविधिप्रयोग

अर्थ : पूर्वेकडे वा दक्षिणेकडे डोके करून कुशीवर झोपावे.

कुशीवर झोपावे, असे धर्मशास्त्रात सांगितले असल्याने विशिष्ट कारणासाठी अन्य स्थितींत झोपण्याची आवश्यकता नाही, अशांनी कुशीवर झोपणेच जास्त योग्य आहे.

२ इ १. कुशीवर झोपल्याने होणारी प्रक्रिया : आपण कुशीवर झोपतो तेव्हा खालच्या बाजूला असलेली नाकपुडी हळूहळू चोंदू लागते. ती ठराविक क्षमतेपर्यंत चोंदली की, आपण कूस पालटतो. त्यामुळे हळूहळू ती नाकपुडी उघडून दुसरी, म्हणजे कूस पालटल्याने खाली आलेली नाकपुडी चोंदू लागते. नाकपुड्यांच्या एक-आड-एक चोंदण्याने आपण झोपेत ठराविक काळाने कूस पालटत असतो.

२ ई. झोपेत स्थिती पालटत असल्याने होणारा लाभ : आपण प्रतिदिन दिवसाचा एक चतुर्थांश वेळ झोपेत घालवतो. प्रतिदिन एवढा वेळ एकाच स्थितीत राहिल्यास त्वचेवर दाबजन्य व्रण (बेडसोअर्स) निर्माण होतात. झोपेमध्ये आपली स्थिती मध्ये मध्ये पालटत असल्याने शरिराच्या एकाच भागावर जास्त काळ दाब येत नाही. यामुळे त्वचेवर दाबजन्य व्रण (बेडसोअर्स) होत नाहीत.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.१२.२०१८)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now