जगभरातील साम्यवादी राष्ट्रांतील साम्यवाद्यांच्या क्रौर्याचे भीषण वास्तव !

विवेकवाद, पुरोगामीवाद आणि सुधारणावाद यांच्या बुरख्याआडून हिंदुत्वनिष्ठांवर वार करणार्‍या साम्यवाद्यांचे खरे स्वरूप उघड करणारी लेखमालिका : साम्यवाद्यांचा रक्तरंजित इतिहास !

१०.३.२०१९ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या या लेखमालिकेतील दुसर्‍या भागात आपण ‘साम्यवादाच्या नावाखाली स्टॅलिनने केलेली हिंसक आक्रमणे आणि त्याचे अमानुष क्रौर्य’ याविषयी जाणून घेतले. याअंतर्गत जर्मनीमध्ये साम्यवाद्यांचा विरोधक असलेल्या हिटलरच्या नेतृत्वाचा उदय, अनाक्रमणाच्या तहाचा लाभ घेऊन रशियाने फिनलंडवर केलेली स्वारी, जर्मनी-रशिया युद्धात स्टॅलिनने दाखवलेले अमानवी क्रौर्य आणि सैन्याने महिलांवर केलेल्या बलात्कारांचे स्टॅलिनने केलेले अत्यंत अश्‍लाघ्य समर्थन आदी सूत्रे पाहिली. आज त्यापुढील सूत्रे पाहूया.

भाग ३

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

संकलक : अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

१. विरोधक आणि सर्वसामान्य नागरिक यांची छळवणूक करण्यासाठी श्रमछावण्या उभारणारा आणि महिलांवर अत्याचार करणारा क्रूरकर्मा स्टॅलिन !

‘दुसर्‍या महायुद्धात कपटीपणा आणि क्रूरपणा करणार्‍या स्टॅलिनने स्वत:च्या देशात काय कमी हैदोस घातला ? फितुरीच्या संशयाने सहस्रोंना गोळ्या घालून ठार मारण्यात आले. कारागृहांऐवजी तेथे श्रमछावण्या बनत होत्या. त्यांना ‘गुलाग’ म्हटले जात होते. आज नाझींनी ज्यूंच्या केलेल्या हत्याकांडाची संग्रहालये बनली, त्याप्रमाणे या ‘गुलाग’ची संग्रहालये बनली आहेत. त्यात किरकोळ गुन्ह्यांत शिक्षा झालेल्यांसह राजकीय कैदीही ठेवण्यात येत होते. तेथून सुटण्याचे प्रमाण कमी होते. तेथेच झिजून मरण्याचे प्रमाण अधिक होते. या गुलागांच्या करुण कहाण्या वेगवेगळ्या आहेत. ‘शत्रूंच्या नातेवाईक’ या आरोपाखालीही स्त्रियांना या छावण्यांत ठेवले जात असे. त्यांना तेथे वेगळा नवरा करायला लागत असे. लैंगिक छळ, बलात्कार यांच्यासह रात्री-अपरात्री होणार्‍या अचानक तपासण्यांना नग्न होऊन सामोरे जावे लागत असे. आपली नवजात अर्भके, दूधपिती मुले यांना पुन्हा कधीही न पहाण्यासाठी आपल्याच ‘भाई’ साम्यवाद्यांच्या हवाली करावे लागत असे.

कधी कोणाला कोणत्या आरोपाखाली अटक केले जाईल आणि या छावण्यांमध्ये पाठवले जाईल, हे सांगता येत नसे. येथे केवळ आणि केवळ काम करायला लागत होते. त्यातून सुट्टी नव्हती. या श्रमछावण्या होत्या. तेथे पुरेसे अन्न दिले जात नव्हते. त्यामुळे त्यांच्यातच अन्न, कपडे, बूट इत्यादींसाठी भांडणे लागत. रशिया हा अत्यंत थंड प्रदेश आहे, हे लक्षात घ्यायला हवे. स्टॅलिनला त्याच्या सरकारच्या आणि देशाच्या विकासासाठी कालवे बांधायचे होते. रात्रंदिवस या कालव्यांच्या खोदकामात त्याच्याच देशाचे नागरिक लावले गेले. पांढरा समुद्र ते बाल्टीक समुद्र यांमधील कालव्याच्या खोदकामांमध्ये गुलागमधले किमान १२ सहस्र नागरिक बळी गेले. स्टॅलिनच्या संशयास्पद मृत्यूनंतर हे गुलाग हळूहळू बंद करण्यात आले.

१ अ. ‘मृत्यू हेच सर्व समस्यांचे उत्तर आहे’, अशी विचारसरणी असलेला स्टॅलिन ! : ‘मृत्यू हा सर्व समस्यांचे उत्तर आहे. माणूस मेला की, समस्या संपते. एखादा मृत्यू ही शोकांतिका असते; परंतु लाखो मृत्यू म्हणजे केवळ आकडेवारी असते. केवळ ‘निवडणूक झाली’, एवढे लोकांना कळले, तरी पुरे ! कारण मत टाकणारे लोक काहीच ठरवत नसतात. जे लोक मते मोजतात, ते सर्वकाही ठरवतात. कृतज्ञता हा कुत्र्यांना होणारा आजार आहे. रायफलीच्या नळीतून खरी शक्ती येते’, असे म्हणणारा स्टॅलिन आणि ज्याला जुने भांडवलवादी जग संपवून नवे समाजवादी जग आणायचे होते, तसेच जर्मन राज्य प्रस्थापित करायचे होते तो हिटलर, यांच्या क्रूरपणात तसा फारसा भेद नाही. केवळ ‘जो जिंकला त्याच्या बाजूने इतिहास लिहिला गेला’, असे म्हणावेसे वाटते.

१ आ. संशयी वृत्तीच्या स्टॅलिनचा गूढ मृत्यू ! : जेता असूनही स्टॅलिनचा शेवटही त्याच्या संशयी वृत्तीला साजेसाच झाला. त्याच्या महालात झोपण्याच्या अनेक जागा होत्या. स्वतःच्या हत्येचा प्रयत्न होईल म्हणून स्टॅलिन प्रतिदिन झोपण्याची जागा पालटत असे. त्याच्या अनुमतीशिवाय कोणालाही आत जाता येत नसे. रात्री उशिरा झोपून उशिरा उठणारा स्टॅलिन नेहमीच्या वेळेला उठला नाही. पुढे पाच-सहा घंटे असेच गेले. रक्षकांना आत जाण्याची अनुमती नव्हती. शेवटी ‘पॉलिट ब्युरो’ची बैठक झाली आणि त्यांनी अनुमती दिल्यावर रक्षक आत गेले, तेव्हा स्टॅलिन त्यांना दरवाजात मरून पडलेला आढळला. त्याचे गूढ अजून उकललेले नाही.

२. कंबोडियातील पॉल पॉट याच्या नेतृत्वाखाली साम्यवाद्यांनी केलेली क्रूर कृत्ये !

जगाच्या पाठीवर साम्यवादाने भारून गेलेली अनेक राष्ट्रे आणि त्या ठिकाणचे महा(खल)पुरुष होऊन गेले. कंबोडिया देशात जगातील सर्वांत मोठे हिंदू मंदिर आहे. याच कंबोडियात क्रांती घडवून राज्य करणार्‍या साम्यवाद्यांनी कंबोडियात जवळजवळ २५ टक्के म्हणजे किमान ३० लाख कंबोडियन लोक मारले. कंबोडियन लोकसंख्येचा पॉल पॉट हा कंबोडियन साम्यवादी जागतिक खलनायकांपैकी एक मानला जातो. या सत्ताधार्‍यांना ‘खामेर रुज’ राजवट म्हणून ओळखले जाते. त्यांनी स्टॅलिनकडूनच प्रेरणा घेतली होती. यांच्या छळकेंद्रांमध्ये सहस्रो आत गेले आणि हाताच्या बोटावर मोजण्याइतके जिवंत बाहेर आले. माणसे पुरण्यासाठी जागा नव्हती. मग माणसांना छळकेंद्रापासून लांबच्या ठिकाणी डोळे आणि हात बांधलेल्या स्थितीत नेले जात असे. एकेकाला नावाने हाक मारून बोलावले जात असे. त्याच स्थितीत उपाशी, अर्धमेल्या स्थितीत आलेल्या त्या व्यक्तीला खाली गुडघ्यावर एका मोठ्या खड्ड्याच्या कडेला बसवले जात असे. त्याच्या डोक्याच्या मागच्या भागावर लोखंडी गजाने प्रहार करून मग त्याचा गळा चिरून त्याला त्या खड्ड्यात ढकलून दिले जात असे आणि पुढच्याला बोलावले जात असे.  कंबोडियात जे कोणी पाश्‍चिमात्य नागरिक मिळाले, त्या सर्वांना ठार केले गेले. यासंदर्भात माहितीजालावर बरीच माहिती उपलब्ध आहे; परंतु आपल्या फार कमी नागरिकांना याविषयी माहिती आहे.

३. अल्बानियामधील साम्यवाद्यांचा रक्तरंजित इतिहास !

अल्बानिया या छोट्याशा देशाचा साम्यवादी इतिहासही असाच आहे. त्यांच्या साम्यवादी नेत्याने, म्हणजेच एन्वर होक्साने स्वतःच्याच देशातील एक लाखहून अधिक माणसे अशाच पद्धतीने मारली. एके काळी या अल्बानियन साम्यवादी राजवटीने देशाला जगातील एकमेव असा ‘संपूर्ण नास्तिक देश’ म्हणून घोषित केले होते. केवळ आर्थिक सुधारणांच्या मागे लागलेल्या या देशाने शेवटी साम्यवाद झिडकारला, देवाला जवळ केले. असे म्हणतात की, पॉलिट ब्युरोच्या एका बैठकीत वादावादी झाली, तेव्हा या एन्वर होक्साने वाद घालणार्‍या अल्बानियाच्या पंतप्रधानालाच गोळी घालून ठार केले. त्याचे प्रेत वीस वर्षांनंतर सापडले.

४. दुसर्‍या महायुद्धाच्या निमित्ताने कोरियाचे दोन तुकडे करणारा रशिया !

उत्तर कोरियाचा नेता किम जोंग उन आणि अमेरिका यांच्यातील सध्याचा तणाव जगजाहीर आहे. दुसर्‍या महायुद्धाचे निमित्त साधून कोरियाचे दोन तुकडे रशियानेच केले. दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया अशी भांडणे तेव्हापासून लागली. उत्तर कोरिया साम्यवादी आहे, क्रूर आणि निष्ठूर आहे. पुन्हा सगळे तेच आणि तसेच आहे.

५. शेजारच्या देशांना विळख्यात घेण्याचा प्रयत्न करणारा साम्यवादी चीनचा साम्राज्यवाद !

चीनची वेगळी गत नाही. चीनमध्येही रक्तरंजित क्रांती झाली. लाखो लोक मारले गेले. माओने ‘पीपल्स आर्मी’ची स्थापना केली आणि राजधानीवर चाल करून सत्ता कह्यात घेतली. आजही चीनचा माओ नक्षलवाद्यांचा आदर्श आहे. चीनने तिबेटवर केलेली स्वारी आणि तिबेटींचे केलेले हत्याकांड कुठल्या नियमात बसणारे होते ? तिबेटींच्या आकडेवारीनुसार चिन्यांनी मारलेल्या तिबेटींची संख्या साडेचार लाखांवर जाते. तिबेटचे धर्मगुरु दलाई लामा भारताच्या आश्रयाला आले. चीनने केलेला पराभव आपण सहजतेने विसरून गेलो आहोत. चीन जागतिक सत्तेच्या मापदंडात पहिल्या पाचात आज येत असेल; परंतु चिनी जनतेला व्यक्तीस्वातंत्र्य नाही. रशियाचा पोलादी पडदा एकेकाळी प्रसिद्ध होता. आता तो विरला असला, तरी चीनमध्ये अजूनही तीच स्थिती आहे. याच माओचे छायाचित्र नक्षलवादी मोठ्या श्रद्धेने लावतात.

‘हिंदी-चिनी भाई भाई’ या नार्‍याला नेहरू फसले आणि आपल्या माथ्यावर एक पराभव आला आणि आपली जमीन लुटली गेली. अजूनही चिनी कुरापती चालूच आहेत. चीनने त्याच्या शेजारच्या राष्ट्रांना विळखा घातला आहे. त्यात पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ असे अनेक छोटे देश आहेत. हा चीनचा साम्राज्यवाद आपण कसा विसरतो ?’


Multi Language |Offline reading | PDF