मान्यवरांनी वाखाणलेले राष्ट्र अन् धर्म हितार्थ दैनिक सनातन प्रभात !

दैनिक सनातन प्रभातची मुंबई, ठाणे, रायगड, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ आवृत्ती २० व्या वर्षात पदार्पण करत असल्याच्या निमित्ताने हा वर्धापनदिनाचा अंक आपल्या हाती देतांना आम्हाला विशेष आनंद होत आहे ! ईश्‍वराच्या कृपेने आणि संतांच्या संकल्पाने अव्याहत चालू असलेल्या दैनिक सनातन प्रभातचे आयाम गेल्या १९ वर्षांत विविधांगाने विस्तारत गेले. सध्या ‘एकच लक्ष्य – हिंदु राष्ट्र’ या उदात्त उद्देशाने प्रकाशित होत असलेल्या दैनिकाला समविचारी मान्यवरांचे नेहमीच सर्वार्थाने साहाय्य लाभत आले आहे. त्यांचा अनुभव आणि वैचारिक पाठिंबा आम्हाला नेहमीच साहाय्यभूत ठरून प्रेरणादायी ठरत असतो. दैनिक सनातन प्रभातच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आमचा उत्साह वाढवून या राष्ट्र-धर्म कार्यात सम्मिलित झालेल्या सर्वच मान्यवरांचे आम्ही मनापासून आभारी आहोत !

‘सनातन प्रभात’ हा हिंदुत्वाचा विचार आहे !  खासदार संजय राऊत, कार्यकारी संपादक, दैनिक सामना

सनातन प्रभात या दैनिकाला १९ वर्षे पूर्ण होत आहेत. अनेक अडचणी, अडथळे आणि संकटे पार करून १९ वर्षे पूर्ण करणे हे काय असते, हा किती आनंद असतो, याचा अनुभव सामनाचा संपादक म्हणून मी स्वत: घेतला आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये वृत्तपत्र काढता येते; मात्र ‘एक विचार’ घेऊन ते चालवणे आणि टिकवणे दिव्य आहे. सनातन प्रभातने नियमित एक महत्त्वाची भूमिका घेऊन स्वत:चा ठसा उमटवला आहे. सनातन प्रभात हा हिंदुत्वाचा विचार आहे. धर्मरक्षण, विकृतींच्या विरोधात लढा देऊन संस्कृती टिकवण्याचे काम सनातन प्रभातने सातत्याने केले आहे. टीकेची पर्वा न करता वृत्तपत्र स्वत:चे विचार घेऊन जेव्हा पुढे जाते तेव्हा त्याला नेहमीच भविष्य असते. सनातन प्रभातला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !

दैनिक सनातन प्रभातमधील ज्ञान गावागावांपर्यंत पोहोचायला हवे ! – संतोष वर्तक, संस्थापक, सह्याद्री शैक्षणिक, सामाजिक संस्था, कळंबोली

सनातन प्रभात हे केवळ वृत्तपत्र नसून भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यांची माहिती देणारा एक उत्तम स्रोत आहे. हे वृतपत्र तरुण आणि लहान मुले यांच्यासाठी ज्ञानाचे भांडार आहे. आजच्या पिढीला संस्कार, देव-देवता, सण, उत्सव या सर्व गोष्टींचे ज्ञान सनातन प्रभातमधून उत्तमरित्या दिले जाते. राष्ट्रप्रेम, धर्मप्रेम, धर्मस्थळे या सर्वच गोष्टींचा आदर आणि ‘मान कसा राखावा’ याचे ज्ञान केवळ सनातन प्रभातमधूनच मिळत आहे; म्हणून हे वृत्तपत्र नसून एक महत्त्वाचे माहिती अंग आहे. हे ज्ञान शहरांपासून ते खेड्यांपर्यंत म्हणजेच प्रत्येक गावापर्यंत पोहोचायला हवे, अशी माझी इच्छा आणि विनंती आहे.

हिंदूंना जागे करणारे एकमेव वृत्तपत्र सनातन प्रभात ! – रामदास शेवाळे, पनवेल महानगर प्रमुख, शिवसेना

हिंदुस्थानामध्ये हिंदूंच्या जनजागृतीसाठी सनातन प्रभात हे एकमेव वृत्तपत्र आहे. या वर्तमानपत्रातून हिंदू जागे होण्यासाठी प्रयत्न केला जातो. सनातन प्रभात हिंदूंवरील अन्यायाला वाचा फोडत आहे. हिंदु संस्कृती काय आहे, हे यातून दाखवले जात आहे. हिंदूंच्या देवतांचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न या वर्तमानपत्राच्या माध्यमातून सातत्याने होत असतो. हिंदु देवतांची पूजा-अर्चा कशी करावी, आई-वडिलांशी कसे वागावे, गुरूंच्या विषयी कसे वागावे याविषयी वारंवार या वर्तमानपत्रातून माहिती येत असते. खर्‍या अर्थाने जनजागृती करणारे एकमेव वर्तमानपत्र दैनिक सनातन प्रभात आहे. यापुढेही अशीच माहिती रोखठोकपणे आपल्या माध्यमातून हिंदूंच्या समोर येत रहावी, हीच परमेश्‍वरचरणी प्रार्थना करतो आणि या वर्तमानपत्राला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !

आत्मकल्याणप्राप्तीचा मार्ग दाखवणारे सनातन प्रभात हे एकमेव वृत्तपत्र ! – आंतरराष्ट्रीय प्रवचनकार भारताचार्य सु.ग. शेवडे

शास्त्रशुद्ध विवेचन आणि अध्यात्ममार्गाने आत्मकल्याणप्राप्तीचा मार्ग दाखवणारे मराठीतील सनातन प्रभात हे एकमेव वृत्तपत्र आहे.

‘शास्त्र म्हणेल जें सांडावें । तें राज्यही तृण मानावें ।
जें घेेववी तें न म्हणावें । विषही विरु ॥’

या संत ज्ञानेश्‍वर यांच्या उक्तीनुसार कालमानानुसार विपरित वाटणारा; पण शाश्‍वत कल्याण करणारा मार्ग वाचकांपुढे ठेवण्याचे उत्तम कार्य या दैनिकाने चालवले आहे. अशा प्रकारचे कार्य महाराष्ट्रात अन्य कोणतेही नियतकालिक करत नाही; किंबहुना बहुतेक नियतकालिके पुरोगामित्वाच्या नावाखाली समाजाला धर्मभ्रष्ट करत आहेत. स्वत:वर येणारे खोटे आळ आणि न केलेल्या कृत्याविषयी दुष्ट आरोपांचे वार सनातन प्रभातने आजवर झेलले आहेत. तसेच निर्भयपणे आपले विचार मांडण्याचे पुण्यकार्य चालवून सहस्रावधी व्यक्तींना रज-तमापासून दूर करून साधनेद्वारा आत्मकल्याणाकडे वळवण्याचे महत्कार्य या संस्थेने परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा आशीर्वाद, प्रेरणा आणि मार्गदर्शन यांमुळे यशस्वीपणे चालवले आहे. दाभोलकर आणि कलबुर्गी यांच्या हत्यांविषयी द्वेषपूर्वक आणि खोटेनाटे आरोप करणार्‍या व्यक्ती आणि नियतकालिके यांचा समाचार सनातन प्रभातने निर्भयपणे घेतला आहे. या नियतकालिकाला माझ्या कोटी कोटी शुभेच्छा !

आर्थिक लाभ न पहाता सनातन प्रभात धर्मरक्षण करते ! – ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल, राष्ट्रीय अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद

दैनिक सनातन प्रभात एक वृत्तपत्रच नाही, तर आध्यात्मिक चैतन्याचा स्रोत आहे. आदरणीय नित्यपूजनीय परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या आशीर्वादाने मागील अनेक वर्षांपासून सनातन प्रभात निरंतरपणे देशवासियांमध्ये आध्यात्मिक चेतना जागृत करत आहे. तसेच विश्‍वकल्याणासाठी भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी प्रयत्नरत आहे. सनातन प्रभातची सर्वांत मोठी फलश्रुती ही आहे की, आर्थिक नफा-तोटा यांचा विचार न करता विज्ञापने नसतांनाही नियमित प्रकाशित करून सनातन प्रभातद्वारे धर्मरक्षणाचे कार्य चालू आहे. दैनिक सनातन प्रभातचे संपादक, प्रकाशक, वितरक आणि सनातन प्रभातच्या संपूर्ण परिवाराला माझ्या संघटनेकडून वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! जय हिंदु राष्ट्र !

सनातन प्रभातचे प्रकाशन हा भारतीय पत्रकारितेतील मोठा आणि निर्णायक प्रयत्न आहे ! – प्रा. रामेश्‍वर मिश्र, भारत शासनाचे माजी सांस्कृतिक सल्लागार तथा संस्थापक, धर्मपाल शोधपीठ, भोपाळ.

‘भारतीय पत्रकारितेत ‘सनातन प्रभात’चे प्रकाशन हा एक महत्त्वपूर्ण आणि दिशादर्शक प्रयत्न आहे. अशा प्रकारचा प्रयत्न यापूर्वी ‘कल्याण’सारखे अद्वितीय मासिक काढून केला होता. प्रारंभी ‘कल्याण’ हे समस्त हिंदु समाजाच्या राष्ट्रीय, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक भावना सक्षमपणे मांडणारे देशातील अग्रगण्य लोकप्रिय मासिक बनले होते; मात्र नंतर ते राज्यकर्त्यांच्या दबावामुळे आध्यात्मिक क्षेत्रापुरते सीमित झाले.

सनातन प्रभात याच शृंखलेतील एक नवीन आणि थोर प्रयत्न आहे. सनातन प्रभात हिंदु समाजाच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय आणि सामाजिक दृष्टीने समस्त राष्ट्रीय भावना व्यक्त करते. त्या समस्यांना आध्यात्मिक स्तरावरील उपायही सुचवते. त्यामुळे समस्त हिंदु समाजात एक अभूतपूर्व तेज आणि ज्ञान यांचा प्रकाश पसरत आहे. अशा प्रकारे सनातन प्रभातचे प्रकाशन भारतीय पत्रकारितेतील एक फार मोठा आणि निर्णायक प्रयत्न आहे. हे नियतकालिक चालवणारे सर्व जण धन्यवादास पात्र आहेत. त्यांनी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या प्रेरणेने अखंड साधनारत राहून असे श्रेष्ठ नियतकालिक प्रसिद्ध करण्याचा पुरुषार्थ केला असून त्याला यशस्वीपणे ध्येयाकडे घेऊन जात आहेत. शुभम् अस्तु !’

हिंदुत्वाच्या वाटचालीतील सनातन प्रभात अग्रगण्य वृत्तपत्र ! – संदीप आचार्य, सहसंपादक, दैनिक लोकसत्ता

प्रखर हिंदुत्वाच्या विचाराने वाटचाल करणार्‍या सनातन प्रभातला माझ्या शुभेच्छा ! सनातन प्रभात मांडत असलेले हिंदुत्व लोकांना भावणारे आहे. या देशामध्ये हिंदुत्वाचा विचार घेऊन वाटचाल करणारी फार थोडी वर्तमानपत्रे आहेत. त्यातील सनातन प्रभात हे अग्रगण्य वृत्तपत्र आहे. प्रखर हिंदुत्वाचा विचार घेऊन चालणार्‍या सनातन प्रभातची भविष्यातील वाटचाल अशीच चालू रहावी, यासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा !

भाषाशुद्धी, हिंदु धर्म आणि पत्रकारिता यांचे ध्येय ठेवून काम करणारे सनातन प्रभात माझ्यासाठी प्रेरणादायी ! – सुरेश चव्हाणके, प्रमुख संपादक, सुदर्शन वाहिनी

दैनिक सनातन प्रभात चालू झाल्यापासून मी दैनिक पहात आलो आहे. अध्यात्म आणि धर्म हे सामान्य माणसापासून ते सर्व स्तरांतील व्यक्तींना समजेल, अशा वैज्ञानिक परिभाषेत सनातन प्रभात मांडते. त्यामुळे सनातन प्रभातमुळे सर्व जण प्रभावित होतात. सनातन प्रभातमध्ये शब्दाची योग्यता आणि व्याकरणशुद्धता यांचा अत्यंत सूक्ष्म अभ्यास केला जातो. कोणत्याही भाषेत चालणारे जगातील कोणतेही दैनिक इतक्या बारकाईने अभ्यास करून प्रकाशित केले जात नाही, इतके भाषाशुद्धीचे काम करून सनातन प्रभात प्रकाशित केले जाते. काही लोकांना प्रारंभी सनातन प्रभातमधील भाषा क्लिष्ट आणि अवघड वाटते; मात्र जेव्हा अशुद्ध भाषेचे दुष्परिणाम पुढे येतात; त्या वेळी सनातन प्रभातमधील भाषाशुद्धतेचे महत्त्व लक्षात येते. सनातन प्रभात आध्यात्मिक सुचिता, भाषेची शुद्धता, हिंदु धर्माची महानता आणि पत्रकारितेचे ध्येय ठेवून काम करत आहे, ते माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. देशात क्रमांक १ ची वृत्तवाहिनी करण्याच्या घोषणेने जेव्हा मी सुदर्शन वृत्तवाहिनी चालवतो, त्या वेळी सनातन प्रभात माझ्यासाठी प्रेरणादायी आणि आदर्श राहिले आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने जेव्हा कोणते ध्येय डोळ्यांपुढे ठेवतो, कोणते कार्य हातात घेतो, त्या वेळी हिंदु धर्माविषयी काम करणार्‍या संस्था किंवा प्रकाशने आठवतात, त्यामध्ये सनातन प्रभात हे महत्त्वाचे प्रकाशन आहे, असे मी मानतो.

दैनिकाने अथकपणे प्रबोधनाचे काम चालू ठेवल्याने त्याचे कौतुक आहे ! – दुर्गेश जयवंत परूळकर, व्याख्याते आणि लेखक

दैनिक सनातन प्रभात गेली दोन दशके नियमितपणे प्रकाशित होणारे दैनिक आहे. देवभक्ती, देशभक्ती, संस्कृती, उपासना आणि धर्मशिक्षणाचे संस्कार करणारे हे दैनिक आहे. समाजातील घडामोडींचा वेध घेऊन त्या लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्यावर आपले परखड मत व्यक्त करणारे हे दैनिक आहे.

देशभक्त क्रांतीकारकांची स्मृती आपल्या देशबांधवांमध्ये सदैव जागृत रहावी म्हणून प्रांजळ प्रयत्न प्रारंभापासून हे दैनिक करत आहे. राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये, यासाठी सातत्याने सक्रीय प्रयत्न करणे, हे या दैनिकाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

आपले सण आणि उत्सव संयमाने आणि श्रद्धेने कसे साजरे करावेत, याचे धर्मशास्त्रानुसार मार्गदर्शन वेळोवेळी करणारे हे एकमेव दैनिक आहे. पाश्‍चात्त्य विचारांना आणि परंपरांना आपले बांधव बळी पडू नयेत, यासाठी त्यांचे प्रबोधन करण्याचे काम अथकपणे चालू आहे. याविषयी दैनिकाचे कौतुक करायला हवे.

अशा या दैनिकाला पुढच्या दमदार वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !

हिंदुत्वाचा विचार हिंदूंच्या मनात खोलवर रुजवणार्‍या सनातन प्रभातच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा ! – प्रवीण कानविंदे, विश्‍वस्त, गौड सारस्वत ब्राह्मण मंदिर ट्रस्ट, मुंबई

हिंदु धर्माचा प्रचार करणारे दैनिक सनातन प्रभात हे अतिशय प्रभावी माध्यम आहे. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी स्थापन केलेली सनातन संस्था आणि चालू केलेले दैनिक सनातन प्रभात हिंदु धर्माचा प्रचार उत्तमरित्या करत आहेत. आनंदाची गोष्ट म्हणजे तरुण, महिला, सुशिक्षित आदी सर्व जण सनातन प्रभातच्या माध्यमातून धर्मकार्याशी जोडले जात आहेत. चांगल्या कार्याला विरोध हा होतोच. जे सनातन प्रभातला वाईट म्हणतात त्यांनी सनातन प्रभातचा उद्देश जाणून घ्यावा. छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्‍वर, समर्थ रामदासस्वामी यांचे विचार दैनिक सनातन प्रभात हिंदूंपर्यंत पोहोचवत आहे. सनातन प्रभात हिंदूंच्या मनामध्ये हिंदुत्वाचा विचार खोलवर रुजवत आहे. अन्य धर्मीय चहूबाजूंनी हिंदु धर्माला दाबण्याचा प्रयत्न करत असतांना सनातन प्रभात हिंदूंची बाजू प्रभावीपणे मांडण्याचे महत्कार्य करत आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंना एकत्र करत आहे. यासाठी सर्वांनी सनातन प्रभातच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहायला हवे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now