गर्दीच्या वेळी अपंगांच्या डब्यात रेल्वे सुरक्षा दलाचे सैनिक तैनात करण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय !

  • मुंबईतील प्रचंड लोकसंख्यावाढीचे दुष्परिणाम !
  • किती किती नियम पाळले जात नाहीत म्हणून पोलिसांना नेमणार ? जनतेला स्वयंशिस्त लावण्यासाठी कठोर शासन करायला हवे ! आतापर्यंतच्या सरकारांनी जनतेत राष्ट्रप्रेम निर्माण केले असते, तर अशी वेळच आली नसती !

मुंबई – अपंगांसाठी राखीव असलेल्या रेल्वे गाड्यांमधील डब्यांतून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करण्यास बंदी आहे; मात्र या डब्यांतून प्रवास करणार्‍या प्रवाशांना रोखण्याकरिता गर्दीच्या वेळी अपंगांच्या डब्यात रेल्वे सुरक्षा दलाचे सैनिक तैनात करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. आरंभी प्रायोगिक तत्त्वावर कल्याणच्या, पनवेलच्या दिशेने धावणार्‍या आणि सीएसएमटीकडे येणार्‍या २० लोकल फेर्‍यांमध्येच ही कार्यवाही करण्यात येईल. यामध्ये कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, कर्जत, खोपोली, पनवेल यांसह अन्य लोकलगाड्यांच्या फेर्‍यांचा समावेश आहे. अपंगांच्या डब्याला जोडूनच महिलांचे डबेही आहेत. त्यामुळे अपंगांच्या डब्यात राहूनही रेल्वे पोलीस महिलांच्या डब्यातील सुरक्षेवरही लक्ष ठेवू शकणार आहेत.

गेल्या २ वर्षांत पश्‍चिम रेल्वेवर ३४ सहस्र ३३८ आणि मध्य रेल्वेवर ३१ सहस्र घुसखोर प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. मध्य रेल्वेच्या अधिकार्‍यांनी विविध मार्गावरील लोकल फेर्‍यांचा आढावा घेतला असता गर्दीच्या वेळेतील ८७ लोकल फेर्‍यांत सर्वाधिक घुसखोरी होत असल्याचे आढळून आले. मध्य रेल्वेने अपंगांचा डबा ओळखता यावा यासाठी त्या डब्याला बाहेरील बाजूने पिवळा रंग देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सध्या १० लोकलगाड्यांमधील अपंगांच्या डब्यांना रंग देण्यात आला असून सप्टेंबर २०१९ पर्यंत अपंगांच्या सर्व डब्यांना रंग देण्याचे उद्दिष्ट आहे.


Multi Language |Offline reading | PDF