स्त्रियांचे व्यक्तिमत्त्व जर आदर्श असेल, तर पुढील पिढीही आदर्श घडेल ! – सौ. प्रगती मामीडवार, हिंदु जनजागृती समिती

गडचिरोली येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘महिला सक्षमीकरण’ या विषयावर व्याख्यान !

गडचिरोली, १५ मार्च (वार्ता.) – स्त्री ही ईश्‍वराने समाजाला दिलेली अनमोल देणगी आहे. तिचे अंगभूत सद्गुण आणि कौशल्य यांमुळे ती विविध भूमिका योग्य प्रकारे पार पाडत असते. ‘आई’ या भूमिकेमुळे तिला सर्वोच्च स्थान प्राप्त झाले आहे. हे दायित्व पार पाडत असतांना एक चांगली आणि सुसंस्कारित पिढी निर्माण करण्याची सुसंधी लाभत असते. स्त्रियांचे व्यक्तिमत्त्व जर आदर्श असेल, तर पुढील पिढीही आदर्श घडेल. त्यासाठी आदर्श व्यक्तिमत्त्व असलेल्या राणी लक्ष्मीबाई, राष्ट्रमाता जिजाऊ यांसारख्या भारतीय ऐतिहासिक स्त्रियांविषयी, तसेच सध्याच्या आधुनिक कर्तृत्ववान स्त्रियांचे अनुकरण केले पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. प्रगती मामीडवार यांनी येथे केले.

येथील सावित्रीबाई फुले नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळेत महिला दिनाच्या निमित्ताने पालक आणि महिला यांच्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘महिला सक्षमीकरण’ या विषयावर त्या बोलत होत्या. या मार्गदर्शनाचा २५ महिलांनी लाभ घेतला. मार्गदर्शनानंतर सर्व महिलांनी मार्गदर्शन आवडल्याचे आवर्जून सांगितले.


Multi Language |Offline reading | PDF