कलाकारांच्या फसव्या ‘पोस्ट’ !

नोंद

‘कोब्रा पोस्ट’ या ‘वेब पोर्टल’ला वर्ष २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत राजकीय पक्षांना अनुकूल ‘पोस्ट’ टाकण्यासाठी वलयांकित व्यक्तींना पैसे देण्यात येत आहेत, हे समजल्यावर त्यांनी ‘स्टिंग ऑपरेशन’ केले. त्यानंतर सामाजिक माध्यमांवर वाटेल ती पोस्ट टाकण्यास सिद्ध असलेल्या हिंदी चित्रपट सृष्टीतील ३ डझनहून अधिक कलाकारांना पकडण्यात आले आहे. यामध्ये जॅकी श्रॉफ, श्रेयस तळपदे यांचाही समावेश आहे. ही बातमी नेहमीप्रमाणे दाबली गेली. त्यामुळे सामाजिक माध्यमांवरील पोस्ट, संदेश यांवर किती विश्‍वास ठेवायचा, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. भ्रष्टाचार किती खोलवर मुरलेला आहे, हे या निमित्ताने दिसून येते.

सामान्य माणसे चित्रपट कलाकारांकडे आदर्श म्हणून पहातात. त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. दक्षिणेकडील राज्यांत तर काही जणांची मंदिरेही बांधली आहेत. वास्तवात या लोकांचा नैतिक स्तर किती खालच्या स्तरावर गेलेला आहे, हे त्यांना कळून येत नाही. अनेक कलाकारांचे व्यक्तिगत जीवन चांगले नसते. मद्य आणि अनैतिकतेच्या आहारी कित्येक जण गेलेले असतात. दुबई येथे दाऊद इब्राहीम सारख्या कुख्यात गुन्हेगाराच्या मेजवानीत कित्येक कलाकार नाचत असल्याचा ‘व्हिडिओ’ काही वर्षांपूर्वी प्रसारित झाला होता. चित्रपटात देशप्रेम दाखवणारे कलाकार पैशांसाठी देशद्रोही कारवाया करतात. संजय दत्त, सलमान खान यांच्यावरील गुन्ह्यात त्यांना काय शिक्षा झाली हे भारतियांनी पाहिले आहे. तरीसुद्धा भारतीय हे भोळसट असल्याने त्याकडे दुर्लक्ष करतात. कलाकारांमध्ये संबंधित कलेचा गुण असतो. त्या गुणात तो श्रेष्ठ असला, तरी त्याच्यामध्ये सामान्य माणसासारखे विकार, दोष असतात, हे त्यांच्या चाहत्यांना लक्षात येत नाही. ते चित्रपटाप्रमाणे त्यांना वास्तविक जीवनातील नायक म्हणून पहातात.

एखाद्या विषयातील तज्ञाने त्या विषयावर भाष्य करावे, अशी अपेक्षा असते. तो त्याचा अधिकार असतो; परंतु सध्या सध्याच्या राजकीय, सामाजिक गुंतागुंतीच्या स्थितीत कलाकार पैसे घेऊन काहीही भाष्य करून मोकळे होतात. सामान्य माणसाला योग्य- अयोग्य काय, याची परिपक्व जाण नसल्याने तो या मतांना योग्य ठरवून तशी धारणा बनवतो. ‘कोब्रा पोस्ट’मुळे कलाकार आपली कलाच नव्हे, तर बुद्धी, नैतिकता हे सर्व पैशांसाठी विकतात, हे जनतेच्या लक्षात आले आहे. एरव्ही ‘स्टिंग ऑपरेशन’ झाल्यावर त्याचे वारंवार वृत्त देणारी माध्यमेही या वेळी गप्प बसली. सरकारी कर्मचार्‍यांना भ्रष्टाचार करतांना पकडल्यावर निलंबित करून शिक्षा देण्यात येते. तसेच अशा कलाकारांनाही पुढील कामे करण्यास प्रतिबंध करून आणि कायद्यानुसार गुन्हा नोंदवून योग्य ती शिक्षा द्यावी, ही रास्त अपेक्षा आहे.

– श्री. सुनील लोंढे, ऐरोली, नवी मुंबई

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now