सध्याची समाजाची दयनीय स्थिती आणि त्यावर ‘साधना’ हाच एकमेव उपाय !

परात्पर गुरु पांडे महाराज

१. कार्य करण्यासाठी जगभर सहस्रो सज्जन लोक असले, तरी ते संघटित नसणे, त्यांच्यात रज-तमात्मक अनिष्ट शक्तींचे निर्मूलन करण्याचे सामर्थ्य नसणे आणि त्यामुळे आजची जगाची परिस्थिती अनिष्ट शक्तींच्या रज-तमाच्या आधिक्यामुळे भयावह झालेली असणे

‘कार्य करण्यासाठी आज जगभर सहस्रो सज्जन लोक आहेत; पण ते संघटित नसल्याचे, तसेच त्यांच्यात वातावरणात निर्माण झालेले रज-तमात्मक अनिष्ट शक्तींचे निर्मूलन करण्याचे सामर्थ्य नसल्याचे दिसून येते. त्यामुळे आजची जगाची परिस्थिती अनिष्ट शक्तींच्या रज-तमाच्या आधिक्यामुळे अतिशय भयावह झाली आहे, ‘मनुष्याचे अस्तित्वच रहाते कि नाही ?’, अशी स्थिती निर्माण झाली आहे. भारतासारख्या पुण्यभूमीतसुद्धा अनेक सज्जन असूनही ते संघटित नाहीत, म्हणजेच ‘सत्त्वगुणाचे आधिक्य उणावले आहे’, हे भगवंत दाखवून देत आहे.

२. साधनेमुळे चैतन्यमय असणारे पूर्वीचे वातावरण आणि साधनेच्या अभावामुळे अन् आधुनिक विज्ञानामुळे झालेले सध्याचे विनाशकारी भौगोलिक वातावरण

पूर्वीच्या काळी चैतन्य विलसित होते. प्रत्येक जण साधक होता. सर्व जण आनंदी होते. त्यामुळे वेळच्या वेळी पाऊस पडत असे. विपुल धन-धान्य पिकत असे. सर्व दृष्टींनी वातावरण समृद्ध होते. वातावरण चैतन्याने भारित होते. शुद्ध हवा, पाणी आणि अन्न मिळत असे. पृथ्वी शुद्ध होती; म्हणून यजुर्वेदात सांगितल्याप्रमाणे पुढीलप्रमाणे प्रार्थना केली जात होती.

‘हे शक्तीमान परमेश्‍वरा, आमच्या राष्ट्रात ब्रह्मतेजयुक्त ब्राह्मण उत्पन्न होवोत. शूर, लक्ष्यवेध करण्यात कुशल, शत्रूंना पराभूत करणारे महारथी क्षत्रिय उत्पन्न होवोत. गायी पुष्कळ दूध देणार्‍या असोत. बैल पुष्ट, पुष्कळ भार वहन करणारे असोत. घोडे वायूपेक्षाही अधिक वेगवान असोत. स्त्रिया सर्वगुणसंपन्न, बुद्धीमान आणि नगरांचे नेतृत्व करणार्‍या असोत. युवक रथी, महावीर, जयशाली पराक्रम करणारे आणि सभेसाठी उपयुक्त सभासद सिद्ध होवोत.

आमच्या राष्ट्रात प्रत्येक योग्य वेळी; पण जेव्हा जेव्हा आम्हाला आवश्यकता वाटेल, त्या त्या वेळी मेघ वर्षा करोत. वनस्पती (वृक्ष) पूर्ण वाढ झालेल्या आणि फलयुक्त असोत (अन्न आणि फळे विपुल प्रमाणात उपलब्ध असोत) आमचा योगक्षेम उत्तम रितीने चालत राहो.’ (संदर्भ : यजुर्वेद, अध्याय २२, कंडिका २२)

मात्र सध्या पृथ्वी अशुद्ध झाल्याने अन्न, पाणी आणि फळे विकारयुक्त अन् अशुद्ध झाली आहेत. सर्वत्र प्रदूषणकारी कारखाने आहेत आणि पिकांवर विषयुक्त फवारणी केली जाते. याला आधुनिक विज्ञान कारणीभूत आहे.

सध्याचा पुरो(अधो)गामी मानवतावादी समाज हा प्रदूषण वाढण्याला कारणीभूत आहे. कारखान्यांद्वारे बाहेर पडणारे अशुद्ध जल नदीच्या प्रवाहात सोडले जाते. त्याला विरोध न करता हा समाज जलाशयात गणेशविसर्जनाच्या वेळी मोठ्या प्रमाणात विरोध करतांना आढळतो.

३. चैतन्यविरहित, म्हणजेच आनंद नसलेली सध्याची परिस्थिती !

अ. वास्तविक मानवाचे अंतिम ध्येय ‘भगवत्प्राप्ती करणे’, हे आहे. भगवत्प्राप्ती म्हणजे सत्-चित्-आनंद अवस्था प्राप्त करणे होय. वास्तविक भगवंत आणि सत्-चित्-आनंद एकच आहेत. ते म्हणजे सत्य उघड करणारे चैतन्य. त्याचे फळ म्हणजे आनंद आहे. ‘जेथे आनंद नाही, तेथे चैतन्य नाही’, हे भगवंत सध्याच्या परिस्थितीवरून दाखवत आहे.

आ. आज भारताला स्वातंत्र्य मिळून ७१ वर्षे झाली आहेत; परंतु निधर्मी लोकशाही राज्यामुळे आणि अधमार्र्चरणामुळे देशाची स्थिती खालावली आहे. त्यामुळे पाकिस्तानसारखा लहान देशसुद्धा उन्मत्त होऊन भारताला त्रासदायक झालेला आहे, तरी आपण त्याला सडेतोड उत्तर देण्यास असमर्थ झालेलो आहोत. भारत देशाच्या असमर्थतेचा अपलाभ घेऊन चीनसारखा देश भारतावर अतिक्रमण करत राहून भारताला सारखा धाक दाखवत असतो.

इ. लोकसभा आणि विधानसभा यांमध्ये निवडून आलेल्या सभासदांकडून योग्य ते लोकसेवेचेे कार्य (लोकांसाठी सुविधाजनक प्रस्ताव मांडून त्यांवर चर्चा करून ते संमत करून घेणे) होतांना दिसत नाही. उलट त्यांच्यातील विकृत वृत्तीमुळे त्यांच्याकडून होणारे स्वार्थाचे आणि उद्दामपणाचे कृत्य पहायला मिळते. त्यामुळे त्याचा लाभ जनतेला होतांना दिसत नाही.

ई. एखाद्याने कितीही दिखाऊपणा केला आणि तेथे आनंद नसेल, तर तेथे चैतन्य नसते. यावरून ‘ते खोटे आहे’, हे सिद्ध होते. यामुळे सध्याचे वातावरण बिघडून वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वत्र भ्रष्टाचार, अत्याचार, पृथ्वीचे तापमान वाढणे (ग्लोबल वार्मिंग), प्रदूषण, वैमनस्य, आतंकवाद, महागाई, अशी भयावह परिस्थिती झाली आहे; मात्र जेथे चैतन्य आहे, तेथे आनंदच असतो. त्यालाच ‘रामराज्य’ म्हणतात.

४. राष्ट्र आणि हिंदु धर्म सामर्थ्यहीन होण्याचे कारण म्हणजे रज-तमाचा वाढलेला प्रभाव अन् सर्वत्र धर्माचरणाद्वारे सत्त्वगुण वाढवून चैतन्याचा प्रभाव वाढवणे अगत्याचे असणे

सत्त्वगुणहीनतेमुळे समाज सामर्थ्यहीन, दिशाहीन आणि बलहीन झाला आहे. राष्ट्र आणि हिंदु धर्म सामर्थ्यहीन होण्याचे कारण म्हणजे चैतन्याचा अभाव. आज धर्माचरणाच्या अभावी रज-तमाचा प्रभाव वाढलेला आहे.

मासिक धर्माच्या वेळी महिलांवर रज-तमाचे आवरण येत असल्याने १० ते ५५ वर्षे या वयोगटापर्यंतच्या महिलांना शबरीमला मंदिरात दर्शन घेण्यास मनाई केली जाते; परंतु सद्य परिस्थितीत हे न जाणता न्यायालयाने त्या सर्वांना अनुमती देऊन एक प्रकारे अधर्मच केला असल्याचे दिसून येते. यामुळे चैतन्यमय ठिकाणी प्रदूषण करून ते रसातळाला नेण्याचे अघोरी कृत्य घडत असल्याने मंदिरांचे पावित्र्य धोक्यात येत आहे. ही ‘विनाशकाले विपरीतबुद्धिः।’ (म्हणजे  ‘विनाशकाळ जवळ आल्यावर बुद्धी भ्रष्ट होते.)’, अशी स्थिती झाली आहे.

यासाठी सर्वत्र धर्माचरणाद्वारे सत्त्वगुण वाढवून चैतन्याचा प्रभाव वाढवणे अगत्याचे आहे. तुमच्यात चैतन्य असेल, तर तुमचा तुलनात्मक प्रभाव पडेल; कारण चैतन्य हे सत्य, शाश्‍वत आणि प्रभावशील आहे. ते वाढल्यास त्याच्या प्रभावाने अनिष्ट शक्तींचे निर्मूलन होते.

५. सध्या सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामुळे वातावरणातील सात्त्विकतेचा प्रभाव वाढतांना दिसणे आणि संत अन् साधक यांच्याद्वारे वर्ष २०२३ मध्ये सनातन धर्म राज्याची स्थापना होणार असणे

१०.५.२०१५ या दिवशी महर्षींनी जीवनाडीपट्टीद्वारे सांगितले, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे विष्णूचा अवतार आहेत.’ आजची भयावह परिस्थिती पालटण्याचे कार्य अवताराविना होऊ शकत नाही.

सध्या सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामुळे वातावरणातील सात्त्विकतेचा प्रभाव वाढतांना दिसून येत आहे. त्यांच्या एका साधकाचा किंवा एका संतांचासुद्धा मोठ्या प्रमाणात प्रभाव पडलेला दिसतो (वर त्रिसुपर्ण सूक्तामध्ये वर्णन केल्याप्रमाणे साधक घडत आहेत.); म्हणूनच परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितलेल्या गुरुकृपायोगानुसार अष्टांग साधनेेद्वारे सिद्ध झालेले १०० संत आणि १ सहस्रांहून अधिक उन्नत साधक त्यांच्याद्वारे वर्ष २०२३ मध्ये सनातन धर्म राज्याची स्थापना होणार आहे. सध्या १५ सद्गुरु, ७० संत आणि ६० टक्के अन् त्याहून अधिक आध्यात्मिक पातळीचे १ सहस्र १८७ उन्नत (संतपदाकडे वाटचाल करणारे) साधक सिद्ध झाले आहेत. (२८.२.२०१९ पर्यंत १ सहस्र २०६ साधक) अशा प्रकारे हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य मोठ्या प्रमाणात चालू आहे.

६. ‘ईश्‍वरप्राप्ती’ हे मानवी जीवनाचे ध्येय असणे आणि धर्माचरण न केल्यास तो जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांत अडकून रहाणे

‘ईश्‍वरप्राप्ती’ हे जीवनाचे लक्ष्य असून त्यासाठी गुरुकृपायोगानुसार साधना करणे आवश्यक आहे. त्यामुळे आत्म्यावरील आवरण नाहीसे होऊन आत्मचैतन्याचा प्रभाव दिसून येतो. यासाठी मायेच्या आवरणापासून मुक्त होणे, म्हणजेच संन्यस्थ होणे आवश्यक आहे. मानवाच्या शरिरात आत्मा हा प्रधान असून त्याच्यातील चैतन्याद्वारेच कार्य होत असते. यासाठी त्याला संरक्षण म्हणून शरीर दिले आहे. ‘त्याचे रक्षण करणे’, हेच मानवाचे कार्य आहे. यासाठी अन्न, वस्त्र आणि निवारा यांची आवश्यकता भासते. जो गुरुकृपायोगानुसार सांगितल्याप्रमाणे धर्माचरण करत नाही, त्याचे जीवन धर्माचरणाच्या अभावी केवळ अन्न, वस्त्र आणि निवारा या आवश्यकतांच्या पूर्ततेपुरतेच मर्यादित रहाते आणि त्यातच त्याचे आयुष्य संपते. त्यामुळे तो जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांत अडकून रहातो.

७. गुरुकृपायोगानुसार अष्टांग साधनेसारख्या अतिशय सहज-सुलभ पद्धतीच्या अवलंबनाने होणारी साधकांची आध्यात्मिक उन्नती

यासाठी पूर्वीच्या काळी संन्यस्त होऊन साधना करण्याची पद्धत अवलंबली जात होती; परंतु परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सनातन संस्थेच्या माध्यमातून आश्रमजीवन पद्धतीद्वारे साधकांना अन्न, वस्त्र आणि निवारा यांची सुलभता करून दिली आहे. हे कार्यही साधक निष्काम कर्म भावनेने ईश्‍वरी सेवा म्हणून करत आहेत. त्यांच्यातील स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रक्रिया राबवल्या जातात. वेळोवेळी सेवेत होणार्‍या चुकांविषयी सत्संग घेतले जाऊन त्यांना त्या चुकांच्या मुळाशी जाण्यास शिकवले जाते. त्यांना त्यांच्यातील स्वभावदोष आणि अहं यांची तीव्रतेने जाणीव करून देऊन त्यासाठी स्वयंसूचना देण्यास सांगितल्या जातात, तसेच चुकांसाठी प्रायश्‍चित्तही घेण्यास सांगितले जाते. ‘साधकांची आत्मोन्नती व्हावी’, हा त्यामागील उद्देश असतो. त्यामुळे साहजिकच त्यांचे आचरण धर्माचरणात सांगितल्याप्रमाणे होते. ते संन्यस्त वृत्तीनेच राहून निष्काम कर्म म्हणून कार्य करत असल्याचे दिसून येते. गुरुकृपायोगानुसार अष्टांग साधनेची ही अतिशय सहज-सुलभ पद्धत परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शोधून काढली आहे आणि त्याप्रमाणे बर्‍याच साधकांची आध्यात्मिक उन्नती झाली असल्याचे दिसून येते.

जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।’

– (परात्पर गुरु) परशराम पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३.१.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF