खारघर (नवी मुंबई) येथे ‘इटर्नल हिंदू फाऊंडेशन’च्या वतीने ‘शाश्‍वत देवालय’ या मोहिमेचा शुभारंभ !

खारघर (नवी मुंबई) – येथील शिवमंदिराच्या प्रांगणात १० मार्च या दिवशी ‘शाश्‍वत देवालय’ या मोहिमेचा शुभारंभ ‘इटर्नल हिंदू फाऊंडेशन’चे संरक्षक के.एन्. गोविंदाचार्य यांच्या हस्ते करण्यात आला. प्रारंभी भारतमातेला पुष्पार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर श्रीफळ वाढवून ‘शाश्‍वत देवालय’ या नोंदणी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी व्यासपिठावर ‘इटर्नल हिंदू फाऊंडेशन’चे सहसंयोजक श्री. विशाल दत्त, संयोजक श्री. संजय शर्मा, संरक्षक श्री. के.एन्. गोविंदाचार्य, हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे, तसेच श्री. महेंद्र पल आर्या आणि पू. सोमलिंग स्वामी हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

राष्ट्रनिर्मितीसाठी प्रत्येकाने २ घंटे योगदान द्यावे ! – संजय शर्मा, संयोजक इटर्नल हिंदू फाऊंडेशन

‘इटर्नल हिंदू फाऊंडेशन’कडून ‘शाश्‍वत भारतम्’,‘इतिहास’, ‘शाश्‍वत देवालय’ या ३ मोहिमा राबवल्या जात आहेत. ‘शाश्‍वत देवालय’ या मोहिमेच्या अंतर्गत सेवा, शिक्षण, स्वयंरोजगार आणि संस्कार हे ४ उपक्रम राबवण्यात येणार आहेत. या मोहिमेसाठी ‘२ घंटे मंदिरासाठी, राष्ट्रनिर्मितीत आपले योगदान’ हे घोषवाक्य बनवण्यात आले असून या मोहिमेतील ४ उपक्रमांसाठी प्रत्येक भारतियाने त्याच्याकडील ज्ञान आणि कौशल्य हे सेवा म्हणून दिवसातील, सप्ताहातील, मासातील २ घंटे द्यावेत, जेणेकरून राष्ट्रनिर्मितीत त्याचा हातभार लागेल. इतिहासातील महापुरुष, संत यांची माहिती आजच्या पिढीला ‘शाश्‍वत भारतम्’ या उपक्रमाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. आपल्याकडे खोटा इतिहास शिकवला जातो. खरा इतिहास मांडला जात नाही. सत्य इतिहास भारतीय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘इतिहास’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

देवभक्ती आणि देशभक्ती या एकाच नाण्याच्या २ बाजू आहेत ! – के.एन्. गोविंदाचार्य, संरक्षक, इटर्नल हिंदू फाऊंडेशन

हिंदु धर्मात प्रत्येक देव आणि देवी यांच्या मंदिराची निर्मिती कशी करावी, या पाठीमागचे शास्त्र सांगितले आहे. त्यानुसार मंदिराची उभारणी केल्यास त्यातील कंपनांचा (स्पंदनांचा) भाविकाला साधनेसाठी लाभ होतो. देवभक्ती आणि देशभक्ती या एकाच नाण्याच्या २ बाजू आहेत. भारताचे मूळ धर्म आहे. नैतिकतेच्या आधारावर धर्माची रचना झाली आहे. प्रत्येकाने आपल्याकडील शक्ती, बुद्धी आणि कुवत यांनुसार ‘शाश्‍वत देवालय’ या उपक्रमासाठी योगदान द्यावे.

नि:स्वार्थ भावाने सेवा करणे, हे हिंदु धर्माचे मोठे वैशिष्ट्य आहे ! – विशाल दत्त, सहसंयोजक इटर्नल हिंदू फाऊंडेशन

नि:स्वार्थ भावाने सेवा करणे, हे हिंदु धर्माचे मोठे वैशिष्ट्य आहे. मनुष्यजन्म आणि पशू योनी यांमध्ये भेद आहे. मनुष्यजन्माला येऊन आपण चांगले कर्म केले नाही, तर मनुष्यजन्माचा काही उपयोग नाही. यासाठी सेवाभावाने चांगले कर्म करणे महत्त्वाचे आहे.

जे सनातन धर्माचे ज्ञान देतात त्यांना गुरु म्हणावे ! – सोमलिंग स्वामी

जिजाऊंनी बालशिवबावर संस्कार केले, तसेच संस्कार मुलांवर करा. त्यामुळे सनातन धर्म टिकणार आहे. सर्वांनी सनातन धर्मानुसार आचरण करायचे आहे. जे सनातन धर्माचे ज्ञान देतात, त्यांना गुरु म्हणावे. मंदिर जसे आपण स्वच्छ ठेवतो, तसेच मनही स्वच्छ ठेवावे.

आपल्यासमवेत साक्षात भगवान श्रीकृष्ण असल्यामुळे हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे ! – नरेंद्र सुर्वे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

इंग्रजांमुळे विखुरलेला भारत आता सर्व संतांच्या प्रयत्नांमुळे एकत्र येत आहे. हिंदु धर्मात मंदिरांना महत्त्व असल्यामुळे आक्रमकांनी ती तोडली. स्त्री-पुरुष समानता आणि जातीयवाद यांच्या माध्यमातून मंदिरातील प्रथा-परंपरा यांचे भंजन करण्याचा प्रयत्न चालू आहे. शनिशिंगणापूर येथील शनि मंदिर आणि केरळ येथील शबरीमला मंदिर येथे स्त्रियांना प्रवेश देऊन मंदिर संस्कृतीवर घाला घालण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. हे सर्वच रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे. प्रत्येकाने तन-मनाने आपापले योगदान दिल्यास हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे; कारण आपल्यासमवेत साक्षात भगवान श्रीकृष्ण आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now