भाजप किंवा शिवसेना काँग्रेसवाल्यांसाठी हक्काचे पाळणाघर होऊ नये ! – उद्धव ठाकरे

हिंदुत्वनिष्ठ पक्षांनी याविषयी ठोस भूमिका घेणे, धर्मप्रेमी हिंदूंना अपेक्षित आहे.

मुंबई, १५ मार्च (वार्ता.) – काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांतील असंतोषी लोकांना घेऊनच हिंदुत्वनिष्ठ पक्षांना पुढे जायचे असेल, तर ज्यांनी वर्षानुवर्षे विचारांचा भगवा झेंडा हाती घेतला त्यांनी काय करायचे ?, हा प्रश्‍न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे भाजप किंवा शिवसेना काँग्रेसवाल्यांसाठी हक्काचे पाळणाघर होऊ नये, असे मत शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी १४ मार्चच्या ‘दैनिक सामना’मधील अग्रलेखातून व्यक्त केले आहे.

या अग्रलेखात श्री. उद्धव ठाकरे यांनी पुढे म्हटले आहे की,

१. विखे-पाटील घराण्याप्रमाणे मोठी राजकीय घराणी भाजपच्या गळाला लागतील आणि भाजप हा काँग्रेस विचारधारेच्या पायावर उभा राहिलेला एक मोठा पक्ष होईल. त्या दिशेने हिंदुत्वनिष्ठ विचाराचे धुरीण कामास लागले आहेत.

२. महाराष्ट्रातील काँग्रेसी घराण्यांच्या विरोधात शिवसेना-भाजप यांचा संघर्ष होता. काँग्रेस संस्कृतीवर पंतप्रधान मोदी यांनी टीका केली आहे. काँग्रेस आणि भ्रष्टाचार हे एकमेकांना पर्यायी शब्द असल्याचे मोदी यांचे म्हणणे आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांनी भाजप-शिवसेना या पक्षांत येथे आज लाभदायक वाटत असले, तरी नंतर ते तापदायक ठरू शकते, याचा अनुभव आम्ही घेतला आहे.

३. सत्ता आहे म्हणून आज लोक येतात आणि सत्ता जाताच अन्य घरोबा शोधतात. आज शिवसेनेवर टीका करणारे राधाकृष्ण विखे-पाटील कधीकाळी शिवसेनेत होते. या पिता-पुत्रांना एकाच वेळी केंद्र आणि राज्य यांमध्ये मंत्रीपदे केवळ शिवसेनेनेच दिली होती; मात्र युतीची सत्ता जाताच त्यांनी पलटी मारली.

४. शिवसेनेने जेवढा ताठ बाणा सत्तेत राहूनही दाखवला त्याच्या कणभरही राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विरोधी पक्षनेते असतांना दाखवला नाही. सत्तेत राहून विरोध करता म्हणून शिवसेनेकडे त्यागपत्र मागणारे विखे-पाटील यांच्यावर आता नैतिकतेच्या सूत्रांवर त्यागपत्र देण्याचा दबाव वाढला आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now