न्यूझीलंडमध्ये २ मशिदींमधील गोळीबारात ४९ जण ठार

  • शरणार्थींनी युरोपिय लोकांना ठार केल्याचा सूड उगवण्यासाठी केले आक्रमण

  • पोलिसांकडून ४ जण कह्यात

ख्रिस्टचर्च (न्यूझीलंड) – येथील २ मशिदींमध्ये करण्यात आलेल्या गोळीबारात ४९ जण ठार झाले, तर २० जण गंभीररित्या घायाळ झाल्याची घटना १५ मार्च या दिवशी घडली. स्थानिक वेळेनुसार सायंकाळी नमाजानंतर मशिदीत गर्दी असतांना सैनिकी गणवेश परिधान करणार्‍याकडून हा गोळीबार करण्यात आला. यानंतर गोळीबार करणार्‍याने तेथून पलायन केले. या आक्रमणकर्त्याने या गोळीबाराचे फेसबूकवरून थेट प्रक्षेपण केले. या प्रकरणी पोलिसांनी ४ जणांना कह्यात घेतले आहे. यात एका महिलेचा समावेश आहे. तसेच पोलिसांना शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये चारचाकी वाहनांमध्ये स्फोटके सापडली, अशी माहिती पोलीसप्रमुख माईक बुश यांनी दिली. गोळीबार करण्यात आलेल्या २ मशिदींमधील ‘अल नूर’ या मशिदीमध्ये बांगलादेश क्रिकेट संघातील खेळाडूही त्याच वेळेस नमाजपठणासाठी आले होते; मात्र त्यांच्यावर गोळीबार झाला नाही. या घटनेनंतर परिसरातील सर्व शाळा आणि मशिदी बंद करण्यात आल्या. तसेच लोकांना घराबाहेर न येण्याची सूचना करण्यात आली.

गोळीबार करणारा ऑस्ट्रेलियाचा नागरिक

या दोन्ही मशिदींमध्ये गोळीबार करणार्‍यांपैकी एकाची ओळख पटली आहे. त्याचे नाव ब्रेनटॉन टॅरॅन्ट (वय २८ वर्षे) असून तो मूळचा ब्रिटीश वंशीय ऑस्ट्रेलियाचा नागरिक आहे. त्याने जिहादी आतंकवाद्यांच्या विरोधात सूड घेण्यासाठी ही कृती केल्याचे सांगण्यात येत आहे.

त्याची ओळख समोर आल्यावर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरीसन यांनी, ‘आम्ही कट्टरवादी उजव्या विचारसरणीच्या आतंकवाद्याने केलेल्या या आक्रमणाचा निषेध करतो. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड केवळ सहकारी किंवा भागीदार नाहीत, तर आम्ही एक कुटुंब आहोत’, असे म्हटले आहे. ऑस्ट्रेलियाचे पोलीसही या गोळीबाराचे अन्वेषण करत आहेत. मॉरीसन यांनी टॅरॅन्ट याच्याविषयी अधिक माहिती देण्यास नकार दिला.

न्यूझीलंडसाठी काळा दिवस ! – न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न

गोळीबारानंतर न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी म्हटले की, हा न्यूझीलंडसाठी काळा दिवस असून अशा हिंसाचाराला न्यूझीलंडमध्ये मुळीच स्थान नाही. जे काही आज न्यूझीलंडमध्ये घडले ते असाधारण होते. या गोळीबारात स्थलांतरित आणि शरणार्थी यांची अधिक हानी झाली असल्याची शक्यता आहे. स्थलांतरित आणि शरणार्थी यांनी न्यूझीलंडला त्यांचे घर म्हणून निवडले आणि हे त्यांचे घर आहे.

गोळीबारानंतर बांगलादेश क्रिकेट संघाचा उर्वरित न्यूझीलंड दौरा रहित

पोलीस आयुक्त माईक बुश यांनी दिलेल्या माहितीनुसार या आक्रमणाचे सामाजिक प्रसारमाध्यमातून करण्यात आलेल्या थेट प्रक्षेपणाचे चित्रीकरण अजूनही त्यावर दाखवले जात आहे. हे चित्रीकरण अधिक प्रमाणात प्रसारित होऊ नये आणि ते तेथून काढून टाकण्यात यावे, यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. या गोळीबारानंतर बांगलादेश क्रिकेट संघाने त्याचा येथील उर्वरित दौरा रहित केला आहे. हा संघ लवकरच मायदेशी परतणार आहे.

मध्य-पूर्वेतील शरणार्थींनी सहस्रो युरोपिय नागरिकांची हत्या केल्याचा सूड घेतला !

गोळीबार करणारा तरुण टॅरॅन्ट याने आक्रमणाच्या पूर्वीच एक घोषणापत्र लिहिले आहे. ‘द ग्रेट रिप्लेसमेंट’ (महान पालट) या नावाने ३७ पानांचे हे घोषणापत्र त्याने लिहिले आहे. त्यात त्याने म्हटले आहे की, मध्य-पूर्वेतून युरोपमध्ये आलेल्या शरणार्थींच्या आतंकवादी आक्रमणात सहस्रो युरोपिय लोकांचा मृत्यू झाला. त्याचा सूड घेणे, तसेच वर्ण वर्चस्व ठेवण्यासाठी स्थलांतरित (अन्य देशातून आलेले लोक) लोकांना बाहेर काढण्यासाठी आक्रमण केले.

ब्रिटनमधील दैनिक ‘दी सन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार टॅरॅन्ट याने डोनाल्ड ट्रम्प यांना श्‍वेत व्यक्तीचे प्रतीक म्हटले आहे. या आक्रमणाच्या उद्देशाविषयी त्याने म्हटले आहे, ‘आक्रमणकर्त्यांना दाखवायचे आहे की, आमची भूमी ही कधीही ‘त्यांची’ भूमी होऊ शकत नाही. आमचे घर हे आमचे घर आहे. जोपर्यंत एक श्‍वेत व्यक्ती येथे असेल, तोपर्यंत ते कधीही ही भूमी जिंकू शकत नाहीत. लोक माझ्या गोळीबाराला ‘आतंकवादी आक्रमण’ म्हणतील; मात्र माझे सांगणे आहे की, ही एक विरोधाची कारवाई आहे. सर्व अश्‍वेतांना आणि स्थलांतरितांना (अन्य देशांतून आलेल्या लोकांना) येथून बाहेर काढले, तरी श्‍वेत लोक येथे वाचू शकत नाहीत; कारण आमचा जन्मदर स्थलांतरितांच्या जन्मदरापेक्षा अल्प आहे. वृद्ध आणि अशक्त लोकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे एक दिवस स्थलांतरित आमची भूमी कह्यात घेतील आणि त्या वेळी युरोपिय लोकांचा नाश निश्‍चित आहे. युरोपमध्ये होत असलेले श्‍वेत लोकांवरील आक्रमण पहाता त्यावर लोकशाही मार्गाने उपाय होणार नाही, तर क्रांतीच करणे एकमेव पर्याय आहे. हे लक्षात आल्यानेच ते करण्याचा प्रयत्न केला.’

आक्रमणापूर्वीच फेसबूकवरून माहिती प्रसारित केली

टॅरॅन्टने आक्रमण करण्यापूर्वीच फेसबूकवर त्याची माहिती दिली होती. त्यात त्याने, ‘मी अप्रवासी आक्रमणकर्त्यांच्या विरोधात आक्रमण करणार आहे आणि त्याचे फेसबूकवरून प्रक्षेपण करणार आहे’, असे लिहिले होते. त्याने २ वर्षांपासून या आक्रमणाची सिद्धता चालू केली होती. तसेच ३ मासांपूर्वी आक्रमण करण्याचे ठिकाण निश्‍चित केले होते. तो पूर्वी कम्युनिस्ट होता आणि नंतर अराजकवादी झाला. त्याने उजव्या विचारसरणीच्या एंडर्स ब्रीविक याच्याशीही संपर्क केला होता. ब्रीविक याने वर्ष २०११ मध्ये नार्वेच्या उटोया बेटावर ६९ लोकांना ठार केेले होते. तसेच ऑस्लोमध्ये कारबॉम्बद्वारे ८ जणांना ठार केले होते.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now