भारताचे डोळे कधी उघडणार ?

संपादकीय

पाकमधील जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझहर हा पुलवामा येथील आतंकवादी आक्रमणासाठी उत्तरदायी असल्याने जागतिक आतंकवादी ठरवण्याच्या संयुक्त राष्ट्रातील प्रस्तावाला चीनने पुन्हा एकदा नकाराधिकाराचा वापर करून विरोध केला. याही आधी वर्ष २००९, २०१६, २०१७ मध्ये मांडण्यात आलेला हाच प्रस्ताव नकाराधिकाराद्वारे फेटाळला. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत फ्रान्स, अमेरिका आणि ब्रिटन यांनी भारताची बाजू घेतलेली असली, तरी चीनकडून वारंवार होणारी पाकची पाठराखण नक्कीच दुर्लक्षून चालणार नाही. ‘नकाराधिकार वापरल्याने या प्रकरणाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी आम्हाला वेळ मिळेल आणि सर्वमान्य असणारा दीर्घकालीन टिकणारा उपाय काढण्यासाठी चर्चाही करता येईल’, असे सांगत चीनने स्वतःच्याच भूमिकेचे समर्थन केले आहे. इतकी वर्षे चर्चा करणे, यात काहीतरी गौडबंगालच आहे. असे असतांना भारताने चीनला अजूनही पुरते न ओळखणे अतर्क्यच आहे. मसूद अझहरला चीनने ४ वेळा पाठीशी घालून संयुक्त राष्ट्रांना धुडकावून लावले. आता निदान ५ व्या वेळी तरी असे घडू नये; म्हणून भारताने ठोस आणि कठोर पावले उचलावीत; कारण मसूदची डोकेदुखी भारतालाच अधिक सतावत आहे. ती लवकरात लवकर दूर करणे, हेच एकमेव लक्ष्य समोर ठेवायला हवे. अन्यथा चीन मसूदला वाचवत राहील आणि भारत मसूदप्रणीत आतंकवादाची झळ सोसत बसेल. हे कुठवर चालणार आहे ? सापाला कितीही दूध पाजले, तरी तो विषच ओकणार, हे लक्षात घेऊन चीनशी सामोपचाराने वागणे आता सोडून द्यायला हवे.

धूर्त आणि कपटी चीन !

चीन पाकिस्तानला आणि पर्यायाने मसूदला पाठीशी घालत असण्यामागील कारणांचा विचार केल्यास चीनने पाकमध्ये केलेली आर्थिक गुंतवणूक लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. त्याच जोडीला संरक्षणात्मक गोष्टींमध्येही चीन पाकिस्तानचा भागीदार आहे. अमेरिकेवर लक्ष ठेवण्यासाठीही चीन पाकचे साहाय्य घेत असतो. चीन मसूदला संरक्षणही पुरवत आहे. अशा अनेक कारणांत पाकिस्तानला साहाय्य करून चीन भारतावर दबाव निर्माण करत आहे. चीनचे हे धूर्त डावपेच भारत ओळखत का नाही ? चीनचे आणखी एक कपटी रूप म्हणजे त्याच्याकडून साहाय्य किंवा भेट स्वीकारणार्‍या देशांना चीनच्या खासगी गुंतवणूकदारांनाही प्रवेश खुला करावा लागतो; मात्र त्या बदल्यात तितक्या प्रमाणात महसूल मिळतोच, असे नाही. चीनने गुंतवणूक केलेल्या श्रीलंकेच्या हंबनतोता बंदरातून श्रीलंकेला मिळणारा महसूल अगदी नगण्य आहे; पण त्यावरचा खर्च मात्र पुष्कळ आहे. चीनच्या कर्जाची परतफेड करण्यास एखादा देश अपयशी ठरलाच, तर त्याच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण होतो. त्यामुळे चीनचे साहाय्य घेणे म्हणजे एक प्रकारे खड्ड्यात पडल्यासारखेच आहे. कूटनीती वापरून अन्य देशांना त्यात अडकवण्यात चीन तरबेज आहे. सत्तेच्या महत्त्वाकांक्षेपोटी काय वाटेल ते करणे, असेच सध्या चीनकडून चालू आहे. चीनकडून व्यापार क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात केल्या जाणार्‍या निर्यातीमुळे सर्व राष्ट्रांमध्ये त्याचा दबदबा निर्माण झाला आहे. चीनच्या या बेबंदशाहीला आळा घालणार कोण ? चीनचे भारताविषयीचे शत्रुत्व आणि पाकविषयीचे मित्रत्व दिवसेंदिवस वाढत आहे. आतंकवाद्यांचा कारखाना असणार्‍या पाकिस्तानची आणि मसूद अझहरची बाजू घेऊन स्वतःचे सैन्य पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसवण्याची सिद्धता चीनने केली आहे. शत्रूराष्ट्राविषयी वेळोवेळी मानवतावादी भूमिका घेणारे भारतातील नेते आतातरी यातून काही शिकतील का ?

चीनची आर्थिक कोंडी हाच उपाय !

मसूदला पाठीशी घालून ४ वेळा भारताच्या पाठीत खंजीर खुपसणार्‍या चीनची दादागिरी रोखण्यासाठी त्याच्या मालावर भारताने बहिष्कार घालणे हा एकमेव मार्ग आपल्यासमोर आहे. जर देशातील आतंकवाद समूळ नष्ट करायचा असेल, तर अशी पावले उचलावीच लागतील. अशानेच चीनचे डोके ठिकाणावर येईल; मात्र यासाठी तीव्र राजकीय इच्छाशक्ती असणे महत्त्वाचे आहे. याच्या जोडीला सर्वच भारतियांनी चीनला धडा शिकवण्यासाठी कृतीशील होणे अपरिहार्य आहे. त्याअंतर्गत चिनी वस्तूंचा वापर टाळणे महत्त्वाचे आहे. चिनी वस्तूंचा मोह न बाळगता भारतीय वस्तूच खरेदी करण्यास प्राधान्य द्यायला हवे. व्यापार्‍यांनीही चिनी बनावटीच्या वस्तू आणि उत्पादने भारतात न आणता त्यांसाठी पर्याय शोधावा. भारतीय बाजारपेठ ही केवळ भारतीय वस्तूंचीच असायला हवी, यासाठी प्रत्येकाने आग्रही रहायला हवे. चीनला मोठा धक्का बसण्यासाठी आणि भारतही आपले वाकडे करू शकतो, हे लक्षात येण्यासाठी प्रतिदिन कृतीशील धोरणे अवलंबावी लागतील. प्रत्येक टप्प्यावर शत्रूला शह द्यावा लागेल. शत्रूंना आणि शत्रूराष्ट्रांनाही धडा शिकवण्यासाठी स्वतःचा दबाव निर्माण करावा लागेल. तसे झाल्यासच संयुक्त राष्ट्र संघात भारताचा टिकाव लागेल. याही आधी भारताने चीनचे कारस्थान जाणून त्याला काही प्रमाणात धडा शिकवला आहेच; पण डोक्यावर बसलेला आतंकवाद पहाता ते तितकेसे पुरेसे नाही. वर्ष २००१ मधील भारताच्या संसदेवरील आक्रमण, मध्यंतरी झालेले उरी येथील आणि आताचे पुलवामा येथील आक्रमण या सगळ्यांतच मसूद अझहर, पाकिस्तान आणि पर्यायाने चीन यांचाच हात होता. हा काळा इतिहास लक्षात घेता आतंकवादाच्या सर्वंकष बीमोडासाठी भारताने सज्ज व्हावे !

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now