जोतिबा यात्रेत खोबरेवाटी उधळण्यावरील बंदी प्रशासनाकडून यंदाही कायम

प्रशासन नेहमी हिंदूंच्या धर्म-परंपरांच्या संदर्भातच मनमानी निर्णय घेते, याउलट अन्य धर्मियांच्या घातक प्रथांविषयी मूग गिळून गप्प बसते !

कोल्हापूर, १५ मार्च (वार्ता.) – लक्षावधी भाविकांचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी तथा जोतिबा डोंगर येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा यात्रेत प्रशासनाने खोबरेवाटी उधळण्यास बंदी घातली आहे. खोबरेवाटी फेकल्यामुळे अनेक भाविक घायाळ होतात. त्यामुळे गेल्या २ वर्षांपासून प्रशासनाने घातलेली बंदी यंदाही कायम ठेवण्यात आली आहे. ‘भाविकांनी अखंड खोबरे न उधळता त्याचे तुकडे करून घ्यावेत’, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. पन्हाळ्याचे तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्थ, व्यापारी, सासनकाठीचालक आणि पुजारी यांच्यात बैठक झाली. त्या वेळी प्रशासनाने वरील निर्णय घोषित केला.

व्यापारी आणि दुकानदार हे खोबरेवाटी विक्री करतांना आढळल्यास त्यांच्यावर गुन्हे नोंद करण्यात येणार असून ग्रामस्थ अन् पुजारी यांच्या घरी येणार्‍या भाविकांना पुजार्‍यांनी खोबर्‍याचे तुकडे करून द्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रशासनाने घेतलेले निर्णय आणि त्याची कार्यवाही यांची सक्ती केवळ हिंदूंच्या परंपरांविषयीच केली जाते. रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत ध्वनीप्रदूषण करायचे नाही, या नियमाचे पालन न करणार्‍या अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर पोलीस कधीही गुन्हे नोंद करत नाहीत ! कायदा जर सर्वांना समान आहे, तर हिंदूंना एक न्याय आणि दुसर्‍या धर्मियांना दुसरा, असे का ? – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF