मसूद अझहरला ‘जागतिक आतंकवादी’ घोषित करण्याचा प्रस्ताव चीनने फेटाळल्याच्या निषेधार्थ जळगाव येथे आंदोलन

आंदोलनप्रसंगी चीनचा राष्ट्रध्वज जाळतांना श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळाचे कार्यकर्ते आणि देशप्रेमी नागरिक

जळगाव, १५ मार्च (वार्ता.) – पाकिस्तानी सैन्याच्या संरक्षणात असलेला जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याला गेल्या १० वर्षांत चौथ्यांदा वाचवणार्‍या चीनला त्याच्या भारतात विकल्या जाणार्‍या मालावर बहिष्कार टाकून धडा शिकवा, असे आवाहन श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष श्री. कैलास सोनवणे यांनी केले. चीनच्या या कृत्याचा निषेध म्हणून १४ मार्चला सायंकाळी शहराच्या महाराणा प्रताप चौकात आंदोलन करून चीनचा राष्ट्रध्वज जाळण्यात आला.

या प्रसंगी श्री. सोनवणे पुढे म्हणाले, ‘‘मसूद अझहरला वाचवून आतंकवाद्यांचे समर्थन करणार्‍या चीनने त्याची भारतविरोधी वृत्ती पुन्हा एकदा दाखवून दिली.

भारताच्या आतंकवादविरोधी लढ्यात चिनी ड्रॅगनने पुन्हा एकदा गरळ ओकली असून संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत आतंकवादी मसूद अझहरला जागतिक आतंकवाद्यांच्या सूचीत समाविष्ट करण्याच्या अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स यांनी मांडलेल्या प्रस्तावावर चीनने ‘व्हेटो’ (नकाराधिकाराचा) वापरला. बुधवारी जर्मनीनेही असाच प्रस्ताव मांडला होता; मात्र मसूदला आतंकवादी घोषित करण्याच्या एक घंट्यापूर्वी चीनने तांत्रिक कारण पुढे करत आडकाठी आणली. पुराव्याविना कारवाईस आपला विरोध असल्याचे चीनने स्पष्ट केले. ३ दिवसांपूर्वीही चीनने हीच भूमिका मांडली होती. चीनने वर्ष २००९, २०१६ आणि २०१७ मध्येही मसूदला जागतिक आतंकवादी घोषित करण्याच्या विरोधात ‘व्हेटो’चा (नकाराधिकार) वापर केला होता.

या वेळी ‘भारतमाता की जय’, ‘वन्दे मातरम्’, ‘बॉयकॉट चायना’, ‘चिनी ड्रॅगन मुर्दाबाद’, ‘हिंदुस्थान झिंदाबाद’, ‘पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘पाकिस्तान मिटाओ, चिनी हटाओ’, अशा घोषणा देण्यात आल्या. मंडळाचे अध्यक्ष तथा नगरसेवक श्री. कैलास सोनवणे, मंडळाचे कार्यकर्ते आदींसह शेकडो देशभक्त नागरिक आंदोलनाला उपस्थित होते.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now