परात्पर गुरु परशराम पांडे महाराज यांच्या महानिर्वाणयात्रेचे (अंत्ययात्रेचे) ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘५.३.२०१९ या दिवशी परात्पर गुरु परशराम पांडे महाराज यांच्या अंत्यसंस्कार विधीचे सविस्तर वृत्त दैनिक सनातन प्रभातमध्ये वाचल्यावर देवाच्या कृपेने त्यांच्या मृत्यूत्तर विधींचे माझ्याकडून सूक्ष्म परीक्षण झाले. या लेखामध्ये परात्पर गुरु परशराम पांडे महाराज यांच्या अंत्ययात्रेचे माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण दिले आहे.

उत्तरक्रियेच्या सूक्ष्म परीक्षणाचा पहिला भाग १४ मार्चला पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया.

२. परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या महानिर्वाणयात्रेचे (अंत्ययात्रेचे) सूक्ष्म परीक्षण

कु. मधुरा भोसले

२ अ. परात्पर गुरु पांडे महाराजांच्या पार्थिव देहाला नेणार्‍या वाहनाला फुलांनी सात्त्विक पद्धतीने सजवलेले असणे : परात्पर गुरु पांडे महाराजांच्या पार्थिव देहाला नेणार्‍या वाहनाला फुलांची सात्त्विक रचना करून सजवलेले होते. फुलांमध्ये मुळातच सात्त्विकता असल्यामुळे त्यांना वस्तू, व्यक्ती किंवा वातावरण यांतील चांगली शक्ती, सात्त्विकता आणि चैतन्य यांच्या लहरी सहजतेने ग्रहण करता येतात आणि या लहरी तितक्याच सहजतेने फुलांच्या पाकळ्यांतून अन् सुगंधातून वायूमंडलात प्रक्षेपित होतात. परात्पर गुरु पांडे महाराजांच्या पार्थिव देहाला नेणार्‍या वाहनाला सात्त्विक पद्धतीने फुलांनी सजवल्यामुळे परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या पार्थिव देहातून प्रक्षेपित होणारी सात्त्विकता आणि चैतन्य यांच्या लहरी फुलांनी ग्रहण केल्या अन् त्यांचे मुक्तहस्ते वायूमंडलात प्रक्षेपण चालू केले. ही सूक्ष्मातील प्रक्रिया चालू असतांना ‘वाहनातील प्रत्येक फूल सूक्ष्मातून परात्पर गुरु पांडे महाराज यांच्याप्रती प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करत आहे’, असे जाणवले.  त्यांनी त्यांची सेवा म्हणून पार्थिव देहातील अधिकाधिक चैतन्य ग्रहण करून ते वायूमंडलात प्रक्षेपित केले. फुलांची सात्त्विकता आणि निर्मळ सौंदर्य यांमुळे फुलांनी सजवलेले वाहन पुष्परथाप्रमाणे दिसत होते. हा पुष्परथ वैकुंठातून श्रीविष्णूने पाठवला होता आणि त्याला स्वर्गलोकातील ‘वसंतऋतु’ या ऋतुदेवतेने त्याच्या जवळील फुलांनी सजवले होते. त्यामुळे फुलांनी सजवलेले वाहन सामान्य वाहन नसून दैवी वाहन होते. या पुष्परथावर पिवळी झालर असलेला मंडप उभारला होता. या मंडपाकडे वायूमंडलातील तेज, वायू आणि आकाश या स्तरांवरील चैतन्यलहरी आकृष्ट होऊन सूक्ष्मातून पिवळ्या रंगाचा चैतन्यदायी मंडपच निर्माण झाला होता.

२ आ. पुष्परथामध्ये फुलांनी सुशोभित केलेल्या दिवाणावर परात्पर गुरु पांडे महाराजांचे पार्थिव उचलून ठेवल्यावर त्यांचा दिवाण आणि वाहन यांच्यावर झालेला सूक्ष्म परिणाम

२ आ १. परात्पर गुरु पांडे महाराजांचे पार्थिव ठेवलेल्या आणि फुलांनी सजवलेल्या दिवाणावर झालेला सूक्ष्म परिणाम : पुष्परथामध्ये फुलांनी सुशोभित केलेल्या दिवाणावर परात्पर गुरु पांडे महाराज यांचे पार्थिव उचलून ठेवण्यात आले. परात्पर गुरु पांडे महाराज यांचे पार्थिव ज्या दिवाणावर ठेवले होते, ते आसन ‘योगीपुरुषांचे सिद्धासन’ असल्याचे जाणवले. ‘परात्पर गुरु पांडे महाराज योगपुरुषाप्रमाणे सिद्धासनावर आरूढ होऊन अंत्यसंस्कार विधी करून घेण्यासाठी सिद्ध झाले आहेत’, असे जाणवले. परात्पर गुरु पांडे महाराजांंचे पार्थिव ठेवलेल्या दिवाणाचे रूपांतर प्रथम सिद्धासनात झाले. त्यानंतर परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या पार्थिवातून धर्मशक्ती प्रक्षेपित झाल्यावर सिद्धासनाचे रूपांतर धर्मपिठात झाले. थोड्या वेळाने जेव्हा परात्पर गुरु पांडे महाराज यांचे पार्थिवातून ज्ञानलहरींचे वायूमंडलात प्रक्षेपण चालू झाले, तेव्हा त्या आसनाचे रूपांतर ज्ञानपिठात झाले. शेवटी जेव्हा परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या पार्थिवातून निर्गुण चैतन्य लहरींचे प्रक्षेपण चालू झाले, तेव्हा त्याचे रूपांतर मोक्षपिठात झाले.

२ आ २. परात्पर गुरु पांडे महाराजांचे पार्थिव ठेवलेल्या वाहनावर झालेला सूक्ष्म परिणाम : परात्पर गुरु पांडे महाराजांचे पार्थिव ठेवलेले वाहन आधी पुष्परथाप्रमाणे कार्यरत होते. त्यानंतर परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या पार्थिवातून वातावरणात धर्मशक्तीचे प्रक्षेपण झाल्यावर पुष्परथाचे रूपांतर धर्मरथामध्ये झाले. त्यानंतर काही काळानंतर परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या पार्थिवातून वातावरणात निर्गुण चैतन्यलहरींचे प्रक्षेपण झाल्यावर धर्मरथाचे रूपांतर मोक्षरथामध्ये झाले.

२ इ. वाहनामध्ये दिवाणाच्या मागे मोगर्‍याचा हार घातलेले परात्पर गुरु पांडे महाराजांचे छायाचित्र ठेवलेले असणेे : परात्पर गुरु पांडे महाराजांचेे पार्थिवाच्या तुलनेत त्यांच्या छायाचित्रामध्ये अधिक प्रमाणात निर्गुण तत्त्व जाणवत होते आणि त्यांतून संपूर्ण वातावरणात निर्गुण शक्ती, तेज आणि चैतन्य प्रक्षेपित होत होते. या छायाचित्राला वाहिलेल्या मोगर्‍याच्या फुलांचा हार हा पांढर्‍या रंगाचा असल्यामुळे त्याने छायाचित्रातून प्रक्षेपित होणारे निर्गुण चैतन्य पुष्कळ प्रमाणात ग्रहण केले होते. मोगर्‍याच्या फुलांतून प्रक्षेपित होणार्‍या दैवी सुगंधामुळे साधकांची भावजागृती होऊन त्यांना छायाचित्रातून प्रक्षेपित होणारे निर्गुण चैतन्य ग्रहण करता आले.

२ ई. रथावर ‘परात्पर गुरु पांडे महाराज यांची महानिर्वाण यात्रा’ असा फलक लावलेला असणे : परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या आत्म्याचा प्रवास हा पृथ्वीकडून सत्यलोकाच्या दिशेने चालू झाल्यामुळे या दैवी आणि आध्यात्मिक प्रवासाला आध्यात्मिक परिभाषेत ‘महानिर्वाण यात्रा’, असे संबोधण्यात आले. सामान्य मनुष्य गेल्यावर त्याच्या अंत्ययात्रेला असे संबोधले जात नाही. यावरून परात्पर गुरु पांडे महाराज यांचा आध्यात्मिक क्षेत्रातील अधिकार लक्षात येतो. हा फलक वाचल्यामुळे त्यांची अंत्ययात्रा पहाणार्‍या व्यक्तींच्या मनातील दु:ख आणि विरह यांचे विचार न्यून होऊन आध्यात्मिक स्तरावरील विचार वाढून मन स्थिर होण्यास साहाय्य झाले. ‘परात्पर गुरु पांडे महाराज सत्यलोकात गेल्यावर लगेच मोक्षाला न जाता सूक्ष्मातून पृथ्वी आणि भुवलोक येथील साधक अन् हिंदुत्वनिष्ठ यांना कलियुगातील प्रतिकूल वातावरणात साधना करून आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी अन् हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी काही काळ सत्यलोकात सूक्ष्म रूपाने राहून साहाय्य करणार आहेत’, असे जाणवले.

२ उ. महानिर्वाण यात्रेच्या वेळी ‘चला जाऊ नाथ सदनाला । साई सदनाला । सर्व सौख्याचा लाभ होई आपणाला’, ‘मंगलात झाले मंगल । नाथ गेले सदन सोडून ।’ आणि ‘शेवटी तुम्हा दीन विनवणी । आश्रय द्या हो तुमचे चरणी ।’ ही संतांच्या आवाजातील भजने लावलेली असणे : संतांच्या आवाजातील भजने लावल्यामुळे भजनातील सात्त्विकता आणि चैतन्य यांच्या लहरींचे वायूमंडलात प्रक्षेपण होऊन वायूमंडलाची शुद्धी होत होती. त्याचप्रमाणे ही भजने ऐकणार्‍या साधकांचे सूक्ष्म देह आणि सूक्ष्म कोश यांची शुद्धी झाली. त्यामुळे त्यांना परात्पर गुरु पांडे महाराज यांचे पार्थिवातून प्रक्षेपित होणारी निर्गुण शक्ती आणि निर्गुण चैतन्य ग्रहण करता आले.

२ ऊ. परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या महानिर्वाणयात्रेला (अंत्ययात्रेला) आरंभ होणे

२ ऊ १. परात्पर गुरु पांडे महाराजांची महानिर्वाणयात्रा मार्गस्थ होतांना आश्रमाच्या परिसरातील काळ्या रंगाच्या श्‍वानाने रथाकडे काही क्षण एकटक पहाणे आणि त्यानंतर तो काही पावले साधकांसमवेत अंत्ययात्रेत चालू लागणे : आश्रमाच्या परिसरातील काळ्या रंगाचा श्‍वान हा श्रीकालभैरवाचेच प्रतीक होता. परात्पर गुरु पांडे महाराज हे शिवात्मादशेत गेल्यामुळे, म्हणजे शिवस्वरूप झाल्यामुळे त्यांचे दर्शन घेण्यासाठी श्रीकालभैरवदेवच काळ्या श्‍वानाच्या रूपाने आला. त्याने पुष्परथाकडे एकटक पाहून परात्पर गुरु पांडे महाराज यांचे पार्थिवातून प्रक्षेपित होणारी तारक-मारक शक्ती आणि निर्गुण चैतन्य ग्रहण केले. परात्पर गुरु पांडे महाराज यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तो साधकांसमवेत अंत्ययात्रेत चालू लागला. काळ्या श्‍वानाच्या रूपाने अंत्ययात्रेत चालणार्‍या श्रीकालभैरवदेवाच्या सूक्ष्म रूपामुळे अंत्ययात्रेमध्ये विघ्न आणण्याचे वाईट शक्तींचे नियोजन उधळले गेले.

२ ऊ २. आश्रमाच्या परिसरात नेहमी वावरणारी खार आश्रमामध्ये मृत स्थितीत आढळणे : आश्रमाच्या परिसरात वावरणारी खार ही सात्त्विक जीव होती. परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या पार्थिवातून प्रक्षेपित होणारी सात्त्विक शक्ती आणि चैतन्य या खारीने ग्रहण केले. त्यामुळे तिचे प्रारब्ध संपताच तिचा मृत्यू झाला. खारीच्या जन्मातील उरले-सुरले भोग संपले आणि खारीने चैतन्य ग्रहण केल्यामुळे तिला सद्गती मिळाली. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. (उच्च कोटीच्या संतांच्या सहवासातील पशू-पक्षांना कशा प्रकारे चैतन्य मिळते आणि त्यामुळे त्यांना कशी सद्गती लाभते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. – संकलक)

२ ऊ ३. परात्पर गुरु पांडे महाराजांची महानिर्वाणयात्रा मार्गस्थ होतांना इमारतीतील किंवा रस्त्यावरून चालणार्‍या लहान मुलांनी आणि मोठ्या माणसांनी आपसूकच यात्रेला पाहून नमस्कार करणे : ‘दिव्यत्वाची जेथे प्रचीती । तेथे कर माझे जुळती ॥’, या उक्तीप्रमाणे परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या दिव्यत्वाची प्रचीती अनोळखी व्यक्तींनाही आली. परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या पार्थिवातून प्रक्षेपित होणारी सात्त्विकता आणि चैतन्य यांची स्पंदने अनोळखी व्यक्तींच्या मनाला जाणवल्यामुळे त्यांनी महानिर्वाण यात्रेला पाहून नमस्कार केला. त्यामुळे त्यांनीही परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या पार्थिवातून प्रक्षेपित होणारी तारक-मारक शक्ती आणि निर्गुण चैतन्य काही प्रमाणात ग्रहण केले.

२ ऊ ४. परात्पर गुरु पांडे महाराजांची महानिर्वाणयात्रा मार्गस्थ होतांना त्यांच्या पार्थिवातून प्रक्षेपित होणारी सात्त्विक शक्ती आणि चैतन्य निसर्गाने ग्रहण करणे : ‘परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या पार्थिवातून प्रक्षेपित होणारी तारक-मारक शक्ती आणि निर्गुण चैतन्य यांचे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचतत्त्वांच्या स्तरावर वातावरणात प्रक्षेपण झाले. त्यामुळे भूमी, जल, सूर्य, पवन आणि आकाश या पंचमहाभुतांची शुद्धी झाली. परात्पर गुरु पांडे महाराज यांचे पार्थिवातून प्रक्षेपित होणारी दैवी स्पंदने ग्रहण करण्यासाठी आजूबाजूचा निसर्गही आतूर झाला होता आणि तो महानिर्वाणयात्रेला सकारात्मक प्रतिसाद देऊ लागला. धरणीमातेने महानिर्वाणयात्रेच्या मार्गावर सूक्ष्मातून फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. आश्रमाच्या शेजारील गाढी नदीतून महानिर्वाण यात्रेकडे शीतल लहरी प्रक्षेपित होऊन सर्वत्र गारवा पसरला होता. महानिर्वाणयात्रा दुपारी असूनही सूर्याचा ताप जाणवत नव्हता; कारण सूर्याने त्याचा ताप न्यून केला होता. गार वारे वाहू लागले आणि आकाश निरभ्र होते. पृथ्वीदेवी, नदीदेवी, सूर्यदेव, पवनदेव आणि आकाशदेव हे परात्पर गुरु पांडे महाराज यांची महानिर्वाणयात्रा अन् त्यांचे अंत्यसंस्कार विधी यांचे साक्षी होते.

२ ऊ ५. परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या महानिर्वाणयात्रेमध्ये (अंत्ययात्रेत) विविध देवता सूक्ष्मातून सहभागी होणे : परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या महानिर्वाणयात्रेमध्ये (अंत्ययात्रेत) देवद आश्रमाची वास्तुदेवता, स्थानदेवता, ग्रामदेवता आणि क्षेत्रपालदेवता सूक्ष्मातून सहभागी झाले होते. त्यामुळे अंत्ययात्रेमध्ये अधून-मधून मोगरा, केवडा, जाई इत्यादी फुलांचे दैवी सुगंध येत होते आणि अंतयात्रेत सहभागी झालेल्या साधकांना त्यांच्या शरिरातील विविध अवयवांना शक्तीच्या लहरींचा शीतल किंवा उष्ण स्पर्श झाल्याचे जाणवले. या देवतांच्या पायांचा स्पर्श भूमीला होत नव्हता; कारण त्या भूमीपासून एक वीत (१० – १२ सें.मी.) उंचीवर चालत होत्या.

२ ऊ ६. स्वर्गलोकातील देवता आणि ऋषिमुनी यांनी वेदमंत्र म्हणून पुष्पवृष्टी करणे : जेव्हा परात्पर गुरु पांडे महाराज यांची महानिर्वाण यात्रा देवद आश्रमातून मार्गस्थ झाली, तेव्हा परात्पर गुरु पांडे महाराजांचा गौरव करण्यासाठी स्वर्गलोकातील देवता आणि ऋषिमुनी यांनी वेदमंत्र म्हणून पुष्पवृष्टी करून त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. त्यामुळे अंत्ययात्रेमध्ये त्रास किंवा दु:ख न जाणवता हलकेपणा, उत्साह आणि आनंद जाणवत होता.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.३.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF