देहत्याग केलेल्या परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या नावापूर्वी ‘परात्पर गुरु’ हीच उपाधी लावण्याविषयी देवाने सुचवणे !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘परात्पर गुरु पांडे महाराज यांनी देहत्याग केल्यानंतर ‘त्यांना आता कसे संबोधन करायचे ?’, असा प्रश्‍न काही साधकांनी विचारला. तेव्हा मी त्यांना विचारले, ‘‘तुम्हाला कोणते संबोधन सुचते ?’’ तेव्हा काही जणांनी पुढील संबोधने सुचवली.

१. चिद्र्त्नसिंधू, तपोनिधी, निर्गुणस्वरूप, मंत्रमहर्षि

२. धर्मभास्कर, धर्मभूषण, धर्ममार्तंड, धर्मशिरोमणी

३. परमहंस, परमज्ञानभूत, परमज्ञानलीन, परमज्ञानस्वरूप

४. ब्रह्मचैतन्यस्वरूप, ब्रह्मज्योतीस्वरूप, ब्रह्मानंदस्वरूप, ब्रह्मीभूत, ब्रह्मलीन, ब्रह्मविलीन, ब्रह्मलोकवासी, ब्रह्मज्ञानस्वरूप

५. शांतीब्रह्म, शांतीस्वरूप, सच्चिदानंदस्वरूप, संतशिरोमणी

६. ज्ञाननिधीस्वरूप, ज्ञानशिरोमणी, ज्ञानसवितृस्वरूप

‘परात्पर गुरु पांडे महाराज यांना एवढ्या संबोधनांतील कोणते संबोधन वापरायचे ?’, हे माझ्या लक्षात येत नव्हते. तेव्हा देवाने मला पुढील विचार सुचवले.

१. काही संतांना वर लिहिलेली नावे शोभतात; कारण त्यांची त्यांच्या नावाच्या अर्थाप्रमाणे स्थिती असते आणि ती पुढील जन्मी तशीच टिकणारी असते. याउलट परात्पर गुरु पांडे महाराज अवतारी संत असल्यामुळे त्यांची स्थिती त्या त्या जन्माच्या कार्यानुसार सातत्याने पालटत असणार आहे. त्यामुळे त्यांना देहत्यागानंतर एखाद्या नावाने संबोधित करणे अयोग्य ठरेल.

२. परात्पर गुरु पांडे महाराज यांचे व्यक्तीमत्त्व हे अनेक दैवी गुणांनी सुशोभित असलेले असे होते. त्यामुळे त्यांच्या देहत्यागानंतर त्यांच्या नावाआधी ‘ज्ञानशिरोमणी’ अशासारखे केवळ एकाच दैवी गुणाने युक्त असलेले संबोधन लावणे, म्हणजे त्यांच्या व्यक्तीमत्त्वाच्या व्यापकतेला सीमित करणे होय. असे करणे अयोग्य ठरेल.

३. ज्योतिषशास्त्र, नाडीपट्टी इत्यादी माध्यमांतूनही व्यक्तीच्या भविष्यकाळाची माहिती सांगणारे व्यक्तीचा गेल्या जन्मातील उल्लेख ‘कैलासवासी’ असा करत नाहीत.

४. पांडव, संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज इत्यादींना कोणी ‘कैलासवासी’ अशासारखे संबोधन लावत नाही. त्यांच्या आहे त्याच नावाने त्यांना शेकडो, सहस्रो वर्षे संबोधित केले जात आहे. असे असतांना परात्पर गुरु पांडे महाराजांना ‘परात्पर गुरु’ सोडून निराळे काय संबोधायचे ?

‘ईश्‍वर प्रत्येक छोट्या छोट्या प्रश्‍नाचे उत्तर तात्काळ कसे देतो’, हेही या उदाहरणावरून लक्षात येते. यासाठी ईश्‍वराच्या चरणी कृतज्ञ आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे देहत्यागानंतरचे संबोधन आणि आध्यात्मिक उत्तराधिकारी !

१. ‘मृत्यूनंतर संबोधण्यामागचे हे शास्त्र कळल्यामुळे पुढे माझ्या मृत्यूनंतरही ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आता काय संबोधायचे ?’, असा प्रश्‍न साधकांना पडणार नाही ! ‘साधकांना त्यांच्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे आधीच मिळतात’, याचे हे आणखीन एक उदाहरण आहे.

२. १९.२.२०१९ (माघ पौर्णिमा) या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना माझे आध्यात्मिक उत्तराधिकारी नेमून भृगु महर्षींनी मी देह सोडण्याआधीच साधकांच्या मनाची त्यासंदर्भात सिद्धता करून घेतली.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले


Multi Language |Offline reading | PDF