बालाकोटमधील मृतांच्या आकड्यापेक्षाही भारताने दिलेला संदेश महत्त्वाचा ! – एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले

पुणे येथे वीरमाता आणि वीरपत्नी यांचा सन्मान

डावीकडून वासवी मुळे, सौ. सुमेधा चिथडे, अनुराधा गोरे, अश्‍विनी पाटील, भूषण गोखले, मेधा कुलकर्णी, समीर बेलवलकर, राजेश दामले

पुणे, १३ मार्च (वार्ता.) – पाकिस्तानातील बालाकोट येथील आतंकवाद्यांच्या अड्डयांवर भारताने हवाई आक्रमण करून आतंकवाद्यांना यमसदनी धाडले; पण आपल्याकडील काही प्रसारमाध्यमे याचे पुरावे मागत होती. त्यांना पाकिस्तानला दोषी ठरवू पहायचे आहे कि भारतियांना ? बालाकोटमधील मृतांच्या आकड्यापेक्षाही या निमित्ताने भारताने जो संदेश दिला, तो महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांनी केले. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ९ मार्च या दिवशी कर्वेनगर येथील कर्नाटक शाळेत वीरमाता आणि वीरपत्नी यांच्या सन्मानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी वीरमाता अनुराधा गोरे, सैनिकांसाठी काम करणार्‍या सौ. सुमेधा चिथडे आणि वीरपत्नी अश्‍विनी पाटील यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी आमदार सौ. मेधा कुलकर्णी, बेलवलकर हाऊसिंगचे संचालक श्री. समीर बेलवलकर, श्री. राजेश दामले, रोटरी क्लबच्या वासवी मुळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात श्री. राजेश दामले यांनी सत्कारमूर्तींची मुलाखत घेतली.

नेमलेले काम व्यवस्थित करणे, ही देशसेवाच ! – आमदार (सौ.) मेधा कुलकर्णी

प्रत्येक जण सीमेवर जाऊन लढू शकत नाही; पण आपल्याला नेमून दिलेले काम, आपला व्यवसाय व्यवस्थितपणे आणि प्रामाणिकपणे करणे, ही देशसेवाच आहे. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी देशभक्तीपर संदेश मोठ्या प्रमाणात प्रसारित होतात; पण नंतर काहीच भरीव होत नाही. प्रत्येकाने देशप्रेमाच्या भावनेशी चिकटून रहावे.

क्षणचित्र – वीरमाता आणि वीरपत्नी यांचे अनुभव ऐकतांना श्रोते पूर्णपणे समरस झाले होते. सैनिकांच्या कर्तव्यनिष्ठतेचे काही प्रसंग ऐकून उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी तरळले.

सैनिकांसाठी कार्य करणार्‍या रणरागिणींचा परिचय !

तरुण मुलाला वीरमरण आल्यानंतर अनुराधा गोरे या वीरमाता, वीरपत्नी आणि अपंग सैनिक यांच्यासाठी कार्य करत आहेत. व्याख्यानांच्या माध्यमातून त्या तरुणांमध्ये देशभक्तीचे बीज रुजवतात. अश्‍विनी पाटील यांनी त्यांच्या पतीला वीरमरण आल्यानंतर निपाणी येथे मुलांसाठी शाळा चालू केली. सौ. सुमेधा चिथडे या सियाचीन येथे सैनिकांना पुरेसा प्राणवायू मिळावा; म्हणून ‘ऑक्सिजन प्रकल्पा’वर कार्यरत आहेत. त्यासाठी त्यांनी स्वतःचे स्त्रीधन विकून पैसे उभे केले. हा प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.

ध्येयनिष्ठा आणि समर्पण यांचा अनुभव देणारी रणरागिणींच्या मुलाखतीतील काही सूत्रे

१. सियाचिन प्रकल्पाविषयी सौ. सुमेधा चिथडे यांनी त्यांचे अलंकार देऊन पैसे उभे केले. त्याविषयी विचारले असता, त्या म्हणाल्या, ‘‘राष्ट्रकार्य करण्याची प्रेरणा मला आईने दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे साहित्य वाचल्यानंतर मला माझ्या जगण्याची लाज वाटू लागली. जन्म-मृत्यू यांच्या मधल्या काळात आपण राष्ट्राला काय दिले, हे महत्त्वाचे आहे. हातून कार्य घडणे, हे परमेश्‍वराचे नियोजन आहे. ज्या गोष्टी परमेश्‍वरानेच दिल्या आहेत, त्या त्यालाच परत देण्यात काय विशेष ? मी हे समाजासाठी नाही, तर माझ्या समाधानासाठी करत होते. वर्दीने (युनिफॉर्म) मला कायमच उन्नत केले. ‘जर प्रकल्पासाठी काही करायचे असेल, तर प्रारंभ स्वतःपासून करायचा’, या भावनेतून मी अलंकार विकले.

२. अनुराधा गोरे म्हणाल्या, ‘‘सैनिकांविषयीच्या अभ्यास अहवालाच्या माध्यमातून आम्ही अनेक सुधारणा सुचवल्या आहेत. जर काही कायदे सैनिकांचे हात बांधून ठेवत असतील, तर ते पालटायला हवेत. युद्धातील प्रत्येक सैनिकाचे शौर्य, चकमक या घटनांविषयी लिखाण व्हायला हवे.

३. लग्नानंतर अवघ्या दीड वर्षांतच पतीला वीरमरण आल्याचा प्रसंग सांगून अश्‍विनी पाटील यांनी ‘सैनिक हेच खरे ‘हिरो’ असून पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे’, असे मत व्यक्त केले.


Multi Language |Offline reading | PDF