५७ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पेण (रायगड) येथील चि. वेदश्री दिवेकर (वय ५ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. वेदश्री दिवेकर ही एक आहे !

चि. वेदश्री दिवेकर हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने शुभाशीर्वाद !

(वर्ष २०१७ मध्ये चि. वेदश्री हिची आध्यात्मिक पातळी ५३ टक्के होती.’ – संकलक)

फाल्गुन शुक्ल पक्ष अष्टमी (१४.३.२०१९) या दिवशी चि. वेदश्री दिवेकर हिचा पाचवा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या कुटुंबियांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

चि. वेदश्री दिवेकर

१. प्रेमभाव

‘चि. वेदश्री हिच्यातील प्रेमभावामुळे ती सगळ्यांना सहजतेने आपलेसे करून घेते. त्यामुळे तिची सगळ्यांशी लगेच जवळीक होते. घरात कुणी आजारी असल्यास ती त्यांची विचारपूस करते. एकदा तिची मोठी बहीण आजारी होती. तेव्हा वेदश्रीने तिची सेवा केली. तिला खायला आणून देणे, औषधे देणे, पाणी देणे, ‘काही दुखते का ?’, हे विचारणे, अशा सर्वच कृती ती करत होती.

२. निरीक्षणक्षमता

तिच्या शाळेच्या मार्गावर गणपतीचे मंदिर आहे. तेथील गणपतीचे एक चित्र खराब झाले होते. ती प्रतिदिन शाळेत जातांना मला म्हणायची, ‘‘मंदिरातील लोक हे चित्र का पालटत नाहीत ? ते चित्र किती खराब झाले आहे !’’ काही दिवसांनी ते चित्र पालटून तेथे गणपतीचे नवीन चित्र लावल्याचे आम्हाला दिसले. तेव्हा ती म्हणाली, ‘‘आता हा गणपतिबाप्पा किती छान दिसत आहे !’’ नवीन चित्र पाहून तिला पुष्कळ आनंद झाला.

३. ती कुठलीही गोष्ट मनात ठेवत नाही. ती मनमोकळेपणाने सर्वकाही सांगते. त्यात तिची चूक असेल, तर ती प्रांजळपणे सांगून क्षमाही मागते.

४. एखादी गोष्ट तिला करायची असेल किंवा अभ्यास पूर्ण करायचा असेल, तर त्यासाठी ती माझा पाठपुरावा घेते.

५. घरात पसारा झाल्यास किंवा तिने स्वतः पसारा केल्यास ते तिच्या लक्षात येते आणि ती मला म्हणते, ‘‘आपण घर आवरून ठेवूया.’’

– सौ. दीपाली दिवेकर (आई), पेण, रायगड.

६. नेतृत्वगुण

‘वेदश्रीमध्ये नेतृत्वगुण आहे. शाळेतही वर्गातील मुला-मुलींना एकत्र करून ती खेळ खेळते.’ – श्री. राजेंद्र दिवेकर आणि सौ. नम्रता दिवेकर (काका-काकू), सनातन आश्रम, देवद, पनवेल.

७. सात्त्विक गोष्टींची आवड

७ अ. मंदिरात जाऊन दर्शन घेण्यास आवडणे : ‘वेदश्रीला मंदिरात दर्शन घ्यायला आणि प्रदक्षिणा घालायला आवडते. शाळेत येता-जातांना ती मंदिरात जाण्यासाठीच हट्ट करते. मंदिरात गेल्यावर ती ‘आध्यात्मिकदृष्ट्या दर्शन कसे घ्यायचे ?’, याविषयी मला विचारून त्याप्रमाणे कृती करते. तिला प्रत्येक देवतेविषयी जाणून घेण्याविषयी उत्सुकता असते.

७ आ. कुंकू लावायला आवडणे : ती कपाळावर नेहमी कुंकूच लावते. टिकली लावल्यास ती म्हणते, ‘‘अगं आई, कुंकू सात्त्विक आहे ना ! मग मला कुंकूच लाव. मी माझ्या मैत्रिणींनाही कुंकू लावायला सांगते.’’

७ इ. वेदश्रीला रांगोळी काढायला आवडते.’

– सौ. दीपाली दिवेकर (आई), पेण, रायगड.

७ ई. मैत्रिणींना समवेत घेऊन सार्वजनिक गणेशोत्सवाचा खेळ खेळणे : ‘एकदा गावातील तिच्या वयाच्या मुलींना समवेत घेऊन ती सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत होती. यात तिने सगळ्यांना एकत्र करून ‘तो कसा साजरा करायचा ?’, हे सांगितले. दगड एकत्र करून तिने खोटी-खोटी गणेशमूर्ती सिद्ध केली आणि फुले घेऊन मूर्तीची पूजा केली. त्यानंतर तिने सगळ्यांची एकत्र पंगत बसवून खोटे-खोटे जेवण वाढले. त्यानंतर गणपतिबाप्पाची वाजत-गाजत मिरवणूक काढली आणि दगड म्हणून सिद्ध केलेल्या मूर्तीचे विसर्जन केले.

७ उ. दूरचित्रवाणीवरील सात्त्विक कार्यक्रम पहाणे : ती दूरचित्रवाहिनीवरही कार्टून किंवा चित्रपट, गाणी असे न पहाता छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी, तसेच देवता यांच्या संदर्भातील मालिकाच पहाते. ‘हर हर महादेव ।’ म्हणत छत्रपती शिवाजी महाराज म्यानातून तलवार काढतात, ते दृश्य तिला पुष्कळ आवडते. तसे ती कधीतरी करूनही दाखवते. दूरचित्रवाहिनीवर लागणार्‍या ‘विठुमाऊली’ या मालिकेचे शीर्षकगीतही तिला पाठ आहे.’

– श्री. राजेंद्र दिवेकर आणि सौ. नम्रता दिवेकर

८. ‘वेदश्री मीठ-पाण्याचे, अत्तर, कापूर, उदबत्ती आणि मोरपीस यांचे उपाय आनंदाने करते. ती नामजपही मोठ्या आवाजात करते.

९. आश्रमातील बालसाधक आणि साधक यांच्याशी आपुलकीने वागणे

वेदश्रीकडे एक लहान आसंदी आहे. ती त्यावर कुणाला बसू देत नाही; मात्र एकदा आमच्या घरी सेवेनिमित्त आश्रमातून एक साधिका तिच्या लहान मुलीला घेऊन आली होती. तेव्हा वेदश्रीने तिची आसंदी तिला सहजतेने बसायला दिली. ती आश्रमातून घरी येऊन गेलेल्या साधकांची नेहमी विचारपूस करते.’

– सौ. दीपाली दिवेकर

१०. नातेवाइकांची नव्हे, तर आश्रमात सेवा करणार्‍या काकाची विचारपूस करणे

‘वेदश्रीचे एक काका देवद आश्रमात सेवा करतात. एकदा आम्ही तिच्या घरी गेलो असतांना ती आमच्याकडे काकाविषयी विचारपूस करत होती. ‘काका कसा आहे ? तो कोणती सेवाकरतो ?’, असे प्रश्‍न तिने विचारले. त्याचे आम्हालाही आश्‍चर्य वाटले. ती नातेवाइकांच्या संदर्भात असे प्रश्‍न विचारत नाही; पण साधकांची विचारपूस करते.’ – श्री. राजेंद्र दिवेकर आणि सौ. नम्रता दिवेकर

११. राधेची वेशभूषा करतांना राधा ही देवी असल्याने ती लिपस्टिक लावत नसल्याने ‘मला लिपस्टिक लावू नकोस’, असे सांगणे

‘एकदा तिच्या शाळेत गोकुळाष्टमीनिमित्त ती राधेची वेशभूषा करणार होती. तिला नटवतांना आमच्यात झालेले संभाषण पुढे दिले आहे.

वेदश्री : आई, मला खूप नटवू नको हं !

मी : का गं ? तुला चांगले दिसायचे नाही का ?

वेदश्री : अगं, मी अल्प नटले, तरी सुंदरच दिसणार आहे.

(मी तिला थोडी लिपस्टिक (ओष्ठशलाका) लावत होते.)

वेदश्री : मला लिपस्टिक लावू नकोस. राधा ही देवी आहे ना ! मग ती तेव्हा लिपस्टिक लावत नव्हती. त्यामुळे मलापण लावू नकोस.

(‘राधा देवीप्रमाणे आहे’, याविषयी आम्ही तिला काहीही सांगितले नाही.)

१२. प.पू. आजोबांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) प्रार्थना केल्याने व्यासपिठावर जाऊन बोलण्यास भीती न वाटल्याचे सांगणारी चि. वेदश्री !

एकदा तिच्या शाळेत वेशभूषा स्पर्धा होती. तिच्या वर्गातील अन्य मुले घाबरून रडत होती; पण वेदश्रीने न घाबरता व्यासपिठावर जाऊन विषय मांडला. मी तिला विचारले, ‘‘तुला भीती नाही का वाटली ?’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘मी प.पू. आजोबांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) प्रार्थना केली होती ना ! मग कशाला भीती वाटेल ?’’

१३. स्वभावदोष : हट्टीपणा, मोठ्याने बोलणे आणि स्वतःच्या मतावर ठाम असणे

‘हे गुरुदेवा, मला या जिवाचा सांभाळ करण्याची संधी दिली, यासाठी कोटी कोटी कृतज्ञता ! हे गुरुमाऊली, ‘तुम्हीच वेदश्रीवर योग्य ते संस्कार करवून घ्या. तिची साधनेतील प्रगती तुम्हीच करवून घ्या’, अशी तुमच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना !’

– सौ. दीपाली दिवेकर (९.३.२०१९)

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले


Multi Language |Offline reading | PDF