राष्ट्रीय भाववृद्धी सत्संगात सांगितलेल्या सूत्रांच्या तुलनेत भक्तीगीताने साधकांचा भाव लवकर जागृत होण्यामागील कारणे

कु. तेजल पात्रीकर

‘१७.५.२०१८ या दिवशी राष्ट्रीय भाववृद्धी सत्संगात परात्पर गुरु डॉक्टरांची गुणवैशिष्ट्ये सांगण्यात आली आणि त्यानंतर ‘श्रीमन्नारायण नारायण, हरि हरि’ ही नामधून लावण्यात आली. त्या वेळी ही धून ऐकून अनेक साधकांचा भाव जागृत झाला. त्या वेळी लक्षात आले की, सत्संगातील शब्दांपेक्षा भगवंताचे गुणवर्णन सुरांमध्ये म्हटल्यावर किंवा ऐकल्यावर साधकांचा भाव लवकर जागृत होतो. त्यामागील कारण काय ? शब्द आणि सूर दोन्ही आकाशतत्त्वाशी निगडित असतांना असा भेद का आहे ?

श्री. राम होनप

श्री. राम होनप

१. सत्संगातील सूत्रे बुद्धीने समजून घेण्याकडे साधकाचा कल अधिक असून भक्तीगीतातून अनुभूती घेण्याचा प्रयत्न असल्याने त्यातून साधकाचा भाव लवकर जागृत होत असणे

सत्संगात सांगितलेली सूत्रे साधक मन आणि बुद्धी यांद्वारे समजून घेतात. तेव्हा साधकाला भगवंताची अनुभूती येण्यास विलंब लागतो. साधक जेव्हा भक्तीगीत ऐकतो, तेव्हा त्याला मन आणि बुद्धी यांचा वापर न करता थेट भगवंताची अनुभूती येते. अशा वेळी जिवात्मा थेट भगवंताशी जोडला जातो. त्यामुळे सत्संगाच्या तुलनेत भक्तीगीतामुळे साधकाचा भाव लवकर जागृत होतो.

२. संगीताचे आध्यात्मिक महत्त्व

२ अ. संगीतात ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांच्याशी संबंधित शक्तींचा समावेश असणे : संगीतात स्वर, ताल आणि लय आहे. यांत अनुक्रमे ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांची शक्ती अप्रकट स्वरूपात असते. गायक जेव्हा स्वर, ताल आणि लय यांच्या आधारे गुरु अथवा भगवंत यांचे गुणवर्णन करतो, तेव्हा या त्रिशक्ती प्रकट होतात. संगीतात ईश्‍वरी सामर्थ्य अधिक असल्यामुळे साधकाचा भाव लवकर जागृत होतो.

२ आ. स्वर, ताल आणि लय अन् ब्रह्मा, विष्णु, महेश यांचा परस्परांशी संबंध

१. गायनाला स्वरूप आणि आकार स्वरांमुळे प्राप्त होतात, म्हणजे गायनाच्या पद्धतीची निर्मिती होते. ब्रह्मा हा उत्पत्तीशी संबंधित आहे. त्यामुळे स्वर ब्रह्माशी संबंधित आहे.

२. गायनात दोन शब्दांतील अंतर तालामुळे निश्‍चित होते. तालामुळे गायनाला पाया आणि स्थिरता प्राप्त होते. श्रीविष्णु सृष्टीला स्थिरता प्रदान करतो. त्यामुळे ताल हा श्रीविष्णूशी संबंधित आहे.

३. लयीमुळे गायनाला गती प्राप्त होते. गतीमुळे गायनाचा शेवट, म्हणजे ‘लय’ निश्‍चित होतो. त्यामुळे लय भगवान शिवाशी संबंधित आहे.

३. सत्संगातील विषयांत सगुण शक्ती असून भक्तीगीतात सगुण-निर्गुण शक्ती अधिक प्रमाणात असणे

सत्संगातील विविध विषयांतील शब्दांत गुरु अथवा भगवंत यांचे कार्य अथवा गुणवर्णन असते. या शब्दसमुहांमध्ये सगुण शक्ती अधिक प्रमाणात असते.

स्वर, ताल आणि लय हे निर्गुण शक्तीशी संबंधित आहे. भक्तीगीतात गुरु अथवा भगवंत यांच्या गुणांशी स्वर, ताल आणि लय जोडलेले असतात. त्यामुळे त्यात सगुण-निर्गुण शक्ती अधिक प्रमाणात असते. ही शक्ती सगुण शक्तीच्या तुलनेत अधिक सूक्ष्म आहे.

४. आध्यात्मिक पातळी ६१ टक्क्यांच्या पुढे असलेल्या साधकांची भाव जागृत होण्यासाठीची संगीताची आवश्यकता न्यून होत जाणे

आध्यात्मिक पातळी ६१ टक्के असलेले साधक सतत देवाच्या स्मरणात असतात. त्यामुळे त्यांचे मन मुळातच एकाग्र असते. सत्संग चालू होताच तेथील सात्त्विकतेमुळे अशा साधकांचे मन आणखी एकाग्र होते. त्यामुळे त्यांचे अंतःकरण भगवंताच्या स्मरणाने द्रवीभूत होते, म्हणजे त्यांचा भाव जागृत होतो. तसेच ६१ टक्के आध्यात्मिक पातळीला ‘आत्मसंगीत’, म्हणजे आंतरिक संगीत (भगवंताशी अनुसंधान) चालूच असते. त्यामुळे अशा साधकांची साधनेसाठीची बाह्य संगीताची आवश्यकता न्यून होत जाते.

त्याखालील आध्यात्मिक पातळी असलेल्या साधकांना अनेक विचारांतून एका भगवंताकडे येण्यास विलंब लागतो. अशा वेळी भक्तीगीताचा आधार घेतल्यास सत्संगाच्या तुलनेत अशा साधकांचे मन लवकर एकाग्र होऊन त्यांचा भाव जागृत होतो.

५. आध्यात्मिक पातळी ६१ टक्क्यांच्या पुढे असलेल्या; परंतु आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांना भाव जागृत होण्यासाठी संगीताची आवश्यकता असणे

आध्यात्मिक पातळी ६१ टक्क्यांच्या पुढे असलेल्या; परंतु आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांना वाईट शक्तींच्या आक्रमणामुळे सतत देवाच्या स्मरणात रहाणे किंवा स्वतःची भावस्थिती टिकवून ठेवणे कठीण जाते. अशा वेळी संगीताचा आधार घेतल्यास अशा साधकांना देवाच्या स्मरणात रहाणे सुलभ जाते.’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.६.२०१८)

‘संगीत आकाशतत्त्वाशी संबंधित आहे; म्हणून पृथ्वी, आप, तेज आणि वायू या तत्त्वांशी संबंधित असलेल्या कलांपेक्षा संगीताशी संबंधित अनुभूती वरच्या स्तराच्या असतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

 


Multi Language |Offline reading | PDF