परात्पर गुरु परशराम पांडे महाराज यांच्या उत्तरक्रियेचे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘५.३.२०१९ या दिवशी परात्पर गुरु परशराम पांडे महाराज यांच्या अंत्यसंस्कार विधीचे सविस्तर वृत्त दैनिक सनातन प्रभातमध्ये वाचल्यावर देवाच्या कृपेने त्यांच्या मृत्यूत्तर विधींचे माझ्याकडून सूक्ष्म परीक्षण झाले. या लेखामध्ये परात्पर गुरु परशराम पांडे महाराज यांच्या उत्तरक्रियेचे सूक्ष्म परीक्षण दिले आहे. पुढील लेखांमध्ये त्यांची अंत्ययात्रा (महानिर्वाण यात्रा), अंत्यसंस्कार आणि दहनविधी यांचे सविस्तर सूक्ष्म परीक्षण पुढील लेखांमध्ये प्रसिद्ध करणार आहोत.

परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या महानिर्वाण यात्रेच्या वेळी रथात उपस्थित त्यांचे नातेवाईक आणि रथामागून मार्गस्थ होतांना आश्रमातील साधक

१. परात्पर गुरु परशराम पांडे महाराज यांच्या उत्तरक्रियेतील कृती आणि त्यांचे सूक्ष्म परीक्षण

१ अ. परात्पर गुरु परशराम पांडे महाराज यांच्या डोक्याजवळ लावलेल्या दिव्याचे सूक्ष्म परीक्षण : ‘दिव्यामुळे परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या देहाचे संरक्षण न होता त्यांच्यातील तेज दिव्यामध्ये संक्रमित होऊन तो दिवा अधिक तेजस्वी आणि प्रकाशमान झाल्याचे जाणवले. दिव्यातून एक देव प्रकट झाला आणि त्याने परात्पर गुरु पांडे महाराज यांच्याभोवती ३ वेळा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने प्रदक्षिणा घातल्या आणि ‘मला परात्पर गुरु पांडे महाराज यांच्याकडून प्रक्षेपित होणारे निर्गुण स्तरावरील चैतन्य ग्रहण करता येऊ दे’, अशी त्याने प्रार्थना केली. दीपदेवाने परात्पर गुरु पांडे महाराज यांना शरणागतभावाने केलेली प्रार्थना पाहून माझ्या मनामध्ये परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या प्रतीचा शरणागतभाव जागृत झाला. दिव्यामध्ये परात्पर गुरु पांडे महाराज यांच्यातील निर्गुण तेज संक्रमित झाल्यावर त्याची आध्यात्मिक कार्यक्षमता वाढली आणि तो वातावरणातील रज-तम लहरी अन् त्रासदायक शक्ती यांच्याशी सूक्ष्मातून लढू लागला. त्याचे कार्यक्षेत्र १ किमी परिघापर्यंत होते. दिव्यातील निर्गुण तेजामुळे तो अधिक काळ तेवत राहिला.

कु. मधुरा भोसले

१ आ. परात्पर गुरु पांडे महाराजांचा देह पाण्याने पुसणे : पाण्याला परात्पर गुरु पांडे महाराजांच्या देहाचा दैवी स्पर्श झाल्यामुळे पाण्यातील सूक्ष्म स्तरावरील अशुद्धता न्यून होऊन त्याची निर्मळता वाढली आणि पाण्यातून वरुणदेव प्रकट झाला. त्याने परात्पर गुरु पांडे महाराजांना साष्टांग दंडवत घातले आणि ‘मला परात्पर गुरु पांडे महाराजांच्या पार्थिवातून प्रक्षेपित होणारी दैवी शक्ती आणि निर्गुण चैतन्य अधिकाधिक प्रमाणात ग्रहण करता येऊ दे’, अशी प्रार्थना केली. त्यानंतर परात्पर गुरु पांडे महाराजांच्या पार्थिवातून दैवी शक्तीचा तांबूस आणि निर्गुण चैतन्याचा पांढरा या रंगांचे प्रकाशझोत वरुणदेवाकडे आकृष्ट झाले. त्यानंतर परात्पर गुरु पांडे महाराजांच्या पार्थिवातून ग्रहण झालेली दैवी शक्ती आणि निर्गुण चैतन्य यांचा लाभ समस्त जलस्रोतांना होण्यासाठी वरुणदेवाने संकल्प केला आणि त्यानंतर वरुणदेवाने ग्रहण केलेली शक्ती आणि चैतन्य यांचे असंख्य प्रवाह विविध समुद्र, नद्या, सरोवरे, धबधबे, अशा जलस्रोतांकडे सूक्ष्मातून वहातांना दिसले. परात्पर गुरु पांडे महाराजांच्या पार्थिवातून प्रक्षेपित झालेली दैवी शक्ती आणि निर्गुण चैतन्य ग्रहण केल्यामुळे वरुणदेवेतील मालिन्य नष्ट होऊन त्याचे तेज वाढले आणि पृथ्वीवरील विविध समुद्र, नद्या, सरोवरे आणि धबधबे अशा जलस्रोतांची शुद्धी होऊन त्यांची सात्त्विकता वाढली. अशा प्रकारे परात्पर गुरु पांडे महाराजांचे पार्थिव पाण्याने पुसल्यामुळे वरुणदेवता आणि समस्त जलस्रोत यांना आध्यात्मिक स्तरावर लाभ झाला.

१ इ. परात्पर गुरु पांडे महाराजांच्या पार्थिवाला सदरा आणि धोतर ही त्यांची नेहमीची वस्त्रे घालणे : परात्पर गुरु पांडे महाराजांचे पार्थिव पाण्याने पुसल्यानंतर त्यांच्या सप्तचक्रांतून संपूर्ण वातावरणात प्रचंड प्रमाणात दैवी शक्ती आणि निर्गुण चैतन्य यांचे प्रक्षेपण चालू झाले. हे प्रक्षेपण सामान्य मनुष्य, आजूबाजूचे पशू-पक्षी आणि वातावरणातील सूक्ष्म जीव यांना पेलवणे कठीण झाले होते. त्यामुळे त्यांच्या पार्थिवाला सदरा आणि धोतर ही त्यांची नेहमीची वस्त्रे घातल्यावर, सप्तचक्रांवर सुताचे सात्त्विक आवरण निर्माण झाले आणि त्यांच्याकडून होणारे प्रक्षेपण उणावले. पार्थिवाला सदरा आणि धोतर ही वस्त्रे घातल्यावर त्यांच्या देहातून प्रक्षेपित होणारी दैवी शक्ती आणि निर्गुण चैतन्य यांच्या लहरी त्यांच्या देहामध्ये बद्ध झाल्या अन् त्या देहमंडलाभोवती फिरू लागल्या.

१ ई. परात्पर गुरु पांडे महाराजांचे पार्थिव उचलून बाहेर आणणेे : श्री गणपतीच्या मूर्तीचे पूजन केल्यावर जेव्हा मूर्तीची उत्तरपूजा होते, तेव्हा मूर्तीला जागच्या जागी हलवतात, त्याप्रमाणे परात्पर गुरु पांडे महाराजांचा पार्थिव उचलून बाहेर आणतांना त्यांच्या पार्थिवामध्ये विविध अवयव आणि इंद्रिये यांच्यामध्ये साठलेली दैवी शक्ती अन् निर्गुण चैतन्य यांचे स्थान हलले आणि त्यांचे वातावरणात प्रक्षेपण चालू झाले. ‘ज्याप्रमाणे उत्तरपूजेनंतर श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी सिद्ध करण्यात येते, त्याप्रमाणे श्रीगणेशाशी एकरूप झालेला परात्पर गुरु पांडे महाराजांचे पार्थिव सिद्ध होत आहे’, असे जाणवले.

१ उ. परात्पर गुरु पांडे महाराजांचे पार्थिव बांबूच्या तिरडीवर ठेवणे : बांबू मुळातच सात्त्विक असतो. बांबूमध्ये पोकळी असल्यामुळे त्याच्याकडे वातावरणातील सात्त्विक लहरी लवकर आकृष्ट होतात. ‘परात्पर गुरु पांडे महाराजांचे पार्थिव ठेवण्यासाठी तिरडीमध्ये सिद्ध करण्यात आलेल्या बांबूंमध्ये अनेक लिंगदेह दाटी करून बसले आहेत’, असे मला जाणवले. जेव्हा परात्पर गुरु पांडे महाराजांचे पार्थिव बांबूच्या तिरडीवर ठेवण्यात आले, तेव्हा त्यांच्या पार्थिवातून प्रक्षेपित होणारी दैवी शक्ती तिरडीवर पसरली आणि तिने तिरडीभोवती अन् पार्थिवाभोवती संरक्षककवच निर्माण केले. पार्थिवातून प्रक्षेपित होणार्‍या निर्गुण चैतन्याच्या लहरी बांबूच्या पोकळीकडे आकृष्ट झाल्या आणि त्या जशा पोकळीमध्ये भरू लागल्या, तसे पोकळीमध्ये बसलेले लिंगदेह पुढे पुढे ढकलले जाऊ लागले अन् त्यांना चैतन्यलहरींद्वारे गती मिळाल्याने ते पुढच्या योनीमध्ये ढकलले गेले.

१ ऊ. मुलगा श्री. अमोल पांडे यांनी परात्पर गुरु पांडे महाराजांची उत्तरक्रिया करण्याचा संकल्प करणे : श्री. अमोल पांडे यांनी उत्तरक्रियेचा संकल्प केल्यावर त्यांच्याकडे श्री गणेशाचे तत्त्व आकृष्ट झाले आणि हे तत्त्व त्यांच्या हृदयात गेले. या तत्त्वामुळे त्यांच्या पिंडाची आंतरिक शुद्धी झाली आणि परात्पर गुरु पांडे महाराज या ऋषितुल्य महान विभूतीचे अंत्यसंस्कार विधी करण्यासाठी ते पात्र झाले. अशा प्रकारे उत्तरक्रियेचा संकल्प केल्यावर श्री. अमोल पांडे यांना धर्माचरणांतर्गत परात्पर गुरूंचे अंत्यसंस्कार विधी करण्याचा आध्यात्मिक अधिकार प्राप्त झाला.

१ ए. श्री. अमोल पांडे यांनी परात्पर गुरु पांडे महाराजांच्या पार्थिवावर दर्भाने तिलोदक प्रोक्षण करणे : दर्भामध्ये तेजतत्त्वाच्या स्तरावर सात्त्विक लहरी धारण आणि प्रक्षेपित करण्याची क्षमता असते अन् तिळाकडे पितृलहरी आकृष्ट होतात. श्री. अमोल पांडे यांनी परात्पर गुरु पांडे महाराजांच्या पार्थिवावर दर्भाने तीलोदक प्रोक्षण केल्यावर परात्पर गुरु पांडे महाराजांच्या पार्थिवातून चैतन्याच्या लहरी तेज आणि वायू या तत्त्वांच्या स्तरावर वातावरणात प्रक्षेपित झाल्या अन् वातावरणाची शुद्धी झाली. त्यानंतर या तेजोमय चैतन्य लहरींचा एक प्रवाह भुवलोकाकडे गेला आणि तेथील साधकांना त्रास देणार्‍या अतृप्त लिंगदेहांना सद्गती मिळाल्याचे जाणवले अन् दुसरा प्रवाह पितृलोकाकडे गेला आणि तेथील साधकांच्या अतृप्त पूर्वजांना सद्गती मिळाल्याचे जाणवले.

१ ऐ. उत्तरक्रियेच्या अंतर्गत परात्पर गुरु पांडे महाराजांच्या पार्थिवाला भस्मलेपन करणे : परात्पर गुरु पांडे महाराजांच्या उत्तरक्रियेच्या वेळी त्यांचे कपाळ, हात इत्यादी भागांवर भस्माचे पट्टे लावून भस्मलेपन केले होते. भस्मामध्ये शिवाची तारक-मारक शक्ती, वैराग्यदायीनी शक्ती आणि निर्गुण चैतन्य कार्यरत असल्यामुळे परात्पर गुरु पांडे महाराजांच्या पार्थिवामध्ये शिवतत्त्वाच्या लहरी कार्यरत झाल्या अन् त्यांच्या पार्थिवातून वातावरणात प्रक्षेपित झाल्या. त्यामुळे परात्पर गुरु पांडे महारांच्या पार्थिवाभोवती शिवाच्या तारक-मारक शक्तीचे वलय कार्यरत झाले. त्यांच्या पार्थिवातील भस्मातून प्रक्षेपित होणार्‍या वैराग्यदायीनी शक्तीमुळे त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेणार्‍यांच्या मनामध्ये वैराग्यभाव जागृत होऊन त्यांना शोक आवरता आला. त्यांच्या पार्थिवातील भस्मातून प्रक्षेपित होणार्‍या निर्गुण चैतन्यलहरींमुळे वातावरणातील वाईट शक्ती दूर पळून गेल्या आणि सात्त्विक जीव अन् पुण्यात्म्ये परात्पर गुरु पांडे महाराजांच्या पार्थिवाकडे आकृष्ट झाले.

१. ओ. श्री. अमोल पांडे यांनी (मुलाने) परात्पर गुरु पांडे महाराजांच्या पार्थिवाला पांघरलेल्या पांढर्‍या वस्त्राचा उर्वरित भाग कापून उपरणे म्हणून अंगावर घेणे : परात्पर गुरु पांडे महाराजांच्या पार्थिवाला पांघरलेल्या पांढर्‍या वस्त्रामध्ये त्यांच्या शुद्ध पिंडाची स्पंदने कार्यरत झाली होती. श्री. अमोल पांडे यांनी (मुलाने) या पांढर्‍या वस्त्राचा उर्वरित भाग कापून उपरणे म्हणून अंगावर घेतल्यावर परात्पर गुरु पांडे महाराजांच्या पिंडातील स्पंदने त्यांच्या मुलामध्ये संक्रमित झाली आणि मुलाचा लिंगदेह आणि पित्याचा सूक्ष्म देह या दोघांमध्ये अनुसंधान निर्माण झाले. पुढील अंत्यसंस्कार विधी करण्यासाठी पिता-पुत्र यांच्यामध्ये सुसंवाद असणे आणि त्यांचे एकमेकांशी तादात्म्य असणे आवश्यक असते, तरच पुत्राने केलेल्या धार्मिक कर्माचा परिणाम पित्याच्या लिंगदेहापर्यंत पोहोचून त्याला गती मिळते. यासाठी पार्थिवाला पांघरलेल्या वस्त्राचा एक तुकडा कापून उत्तरक्रिया करणार्‍या यजमानाने तो उपरण्याप्रमाणे घ्यायचा असतो. श्री. अमोल पांडे यांनी (मुलाने) या पांढर्‍या वस्त्राचा उर्वरित भाग कापून उपरणे म्हणून अंगावर घेतल्यावर वस्त्रामध्ये आकृष्ट झालेल्या परात्पर गुरु पांडे महाराजांच्या पिंडातील लहरींतून शक्ती आणि चैतन्य मुलाला मिळाल्याने त्यांच्याकडून परात्पर गुरु पांडे महाराजांच्या संदर्भातील उत्तरक्रिया, अंत्यसंस्कार आणि दहनविधी, तसेच पुढील मृत्यूत्तर क्रियाकर्म निर्विघ्नपणे पूर्ण होणार आहेत.

श्री. अमोल पांडे यांनी उपरणे डाव्या खांद्यावर घेतल्यावर त्यांची चंद्रनाडी आणि उजव्या खांद्यावर घेतल्यावर त्यांची सूर्यनाडी चालू होत होती. त्यामुळे मृत्यूत्तर धार्मिक कर्मे करण्यासाठी आवश्यक असणारी शक्ती आणि चैतन्य श्री. अमोल पांडे यांना प्राप्त झाले.

१ औ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा शुभ हस्तस्पर्श झालेला फुलांचा हार सनातनचे पू. रमेश गडकरी यांनी परात्पर गुरु पांडे महाराजांना अर्पण करणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा शुभ हस्तस्पर्श झालेल्या फुलांच्या हारामध्ये समर्पणभाव, कृतज्ञताभाव, शरणागतभाव, प्रीती, आनंद आणि शांती यांची स्पंदने एकवटली होती अन् ती फुलांच्या दैवी सुगंधातून वातावरणात दरवळत होती. फुलांच्या हाराच्या रूपाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेऊन त्यांचे चरणस्पर्श केल्याचे जाणवले. फुलाच्या हाराच्या रूपाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मनातील परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या प्रतीचा अत्युच्च भाव फुलाचे रूप धारण करून परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या चरणी समर्पित झाला. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा शुभ हस्तस्पर्श झालेला फुलांचा हार सनातनचे संत पू. रमेश गडकरी यांनी परात्पर गुरु पांडे महाराजांना अर्पण केल्यावर सूक्ष्मातून तो हार परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या पार्थिवाला वाहिल्याचे जाणवले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी फुलाच्या हारातून व्यक्त केलेला अत्युच्च कोटीचा कृतज्ञताभाव पाहून परात्पर गुरु पांडे महाराजांच्या सूक्ष्म रूपाला कृतज्ञतेने अश्रू अनावर झाले आणि त्यांनी श्रीगुरुचरणी कृतज्ञता व्यक्त केली. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा शुभ हस्तस्पर्श झालेला फुलांचा हार परात्पर गुरु पांडे महाराजांच्या पार्थिवाला अर्पण केल्यामुळे परात्पर गुरु पांडे महाराजांच्या सूक्ष्म रूपाला ‘कैवल्य’ अवस्था (सायुज्य मुक्ती) तात्काळ मिळाल्याचे जाणवले. या पुष्पहारातून प्रक्षेपित होणारी अवतारी शक्ती आणि अवतारी चैतन्य यांचे बळ परात्पर गुरु पांडे महाराजांच्या सूक्ष्म रूपाला प्राप्त झाल्यामुळे त्यांचे मोक्षप्राप्तीच्या दिशेने महानिर्वाण (सूक्ष्मातील दिव्य प्रवास) चालू झाल्याचे जाणवले.

१ अं. परात्पर गुरु पांडे महाराजांचे नातलग श्री. देवीदास देवगडे यांनी महाराजांच्या पार्थिवाला तुळशीहार घालून नमस्कार करणे : परात्पर गुरु पांडे महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्यामध्ये पुष्कळ प्रमाणात चैतन्य कार्यरत असले, तरी त्यांनी परात्पर गुरु डॉक्टर आठवले, सद्गुरु, संत, साधक आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्यावरील सूक्ष्मातील वाईट शक्तींची आक्रमणे स्वत: झेलली होती. त्यामुळे त्यांचा स्थूल देह, सूक्ष्म देह आणि सूक्ष्म कोश यांमध्ये रजोगुणी धनंजय वायू कार्यरत झाला. त्यामुळे त्यांचा पार्थिव स्थुलातून फुगू लागला. परात्पर गुरु पांडे महाराजांचे नातलग श्री. देवीदास देवगडे यांनी महाराजांच्या पार्थिवाला तुळशीहार घातल्यामुळे तुळशीहारामध्ये कार्यरत असणार्‍या विष्णुतत्त्वाच्या गंधलहरींचा स्पर्श त्यांचा स्थूल देहासह सूक्ष्म देह आणि सूक्ष्म कोश यांना झाल्यामुळे त्यांच्यामध्ये कार्यरत असणार्‍या धनंजय वायूतील रजोगुण न्यून होऊन त्याची सात्त्विकता वाढू लागली. त्यामुळे त्यांचा स्थूल देह, सूक्ष्म देह आणि सूक्ष्म कोश विष्णुतत्त्वाने भारित झाले अन् त्यांचा पार्थिव फुगण्याचे प्रमाण न्यून झाले.

१ क. परात्पर गुरु पांडे महाराजांचे पुत्र श्री. अमोल पांडे आणि स्नुषा सौ. देवयानी पांडे यांनी पार्थिवाला पुष्पहार घालून त्यांच्या चरणांवर डोके ठेवून त्यांचे भावपूर्ण अंत्यदर्शन घेणे : मुलगा आणि सून यांनी तसेच सूक्ष्मातून अनेक पितरांनी परात्पर गुरु पांडे महाराज यांचे भावपूर्ण अंत्यदर्शन घेतल्यामुळे परात्पर गुरु पांडे महाराज यांच्यातील वात्सल्यभाव जागृत झाला आणि त्यांना ‘सर्वांना चांगली साधना करून आध्यात्मिक उन्नती करून घ्या’, असा आशीर्वाद दिल्याचे जाणवले.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.३.२०१९)

(क्रमश:)


Multi Language |Offline reading | PDF