लोकसभा निवडणुकीवर ५० सहस्र कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता

यंदाची निवडणूक जगातील सर्वांत महागडी निवडणूक ठरणार

ज्या देशातील प्रत्येक नागरिकावर ६२ सहस्र रुपयांचे कर्ज आहे, त्या देशातील निवडणुकीवर असा खर्च केला जात असेल आणि त्यातून निवडून येणार्‍यांमध्ये अनेक जण हत्या, बलात्कार, फसवणूक, खंडणी आदी गुन्हे करणारे असणार आहेत, तर याला लोकशाही म्हणता येईल का ?

नवी देहली – येथील ‘सेंटर फॉर मीडिया स्टडीज’च्या (‘सीएम्एस्’च्या) अहवालानुसार भारतातील आताची निवडणूक प्रक्रिया जगातील सर्वांत महागडी निवडणूक प्रक्रिया ठरणार आहे. भारतातील निवडणुकीवर यंदा ५० सहस्र कोटी रुपये इतका खर्च होण्याची शक्यता आहे. वर्ष २०१४ च्या निवडणुकीवर सुमारे ३५ सहस्र कोटी रुपयांचा खर्च झाला होता. वर्ष २०१४ मध्ये सामाजिक माध्यमांवर २५० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. या वेळी ५ सहस्र कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे.

१. या अहवालानुसार निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारावर ८ डॉलर (५५६ रुपये) खर्च होणार आहे. भारतातील ६० टक्के जनतेचे दिवसाचे उत्पन्न ३ डॉलर (२०८ रुपये) आहे. त्या तुलनेत निवडणुकीत प्रत्येक मतदारावर होणारा खर्च अधिक आहे.

२. कॅलिफोर्निया विद्यापिठातील प्रा. जेनिफर बसेल यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतात केंद्रीय स्तरावरील ९० टक्के नेत्यांवर मतदारांना रोख रक्कम देणे, मद्य पुरवणे किंवा व्यक्तीगत वापरासाठी भेटवस्तू देणे याचा दबाव जाणवतो. गृहोपयोगी वस्तूपासून ते बकरीपर्यंत गोष्टी मतदारांना भेट म्हणून द्याव्या लागतात. सभेला गर्दी जमवण्यासाठी विनामूूूल्य बिर्याणी किंवा ‘चिकन करी’ असलेले भोजन द्यावे लागते. (अशा रितीने लाच देऊन निवडून येणारे लोकप्रतिनिधी पुढे भ्रष्टाचार करणार नाहीत, तर काय करणार ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF