‘हिंदुस्थान युनिलिव्हर’ आस्थापनाच्या संचालकांच्या विरोधात पाळधी (जळगाव) येथे पोलिसांत तक्रार नोंद

हिंदुविरोधी विज्ञापन प्रसारित केल्याचे प्रकरण

जळगाव, १३ मार्च (वार्ता.) – ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’ या आस्थापनाने ‘सर्फ एक्सेल’ या उत्पादनाचे रंगपंचमीनिमित्त एक विज्ञापन प्रसारित केले आहे. या विज्ञापनात हिंदूंच्या सणांच्या निमित्ताने पुन्हा एकदा जाणीवपूर्वक हिंदूंचा अवमान करण्यात आला आहे. यापूर्वीही या आस्थापनाच्या अनेक विज्ञापनांतून हिंदूंचा आणि त्यांच्या श्रद्धास्थानांचा अवमान करण्यात आला आहे. त्यामुळे या आस्थापनाच्या संचालकांवर भा.दं.सं. कलम २९५ अ आणि १५३ अ अन्वये गुन्हा नोंद करण्यात यावा, विज्ञापनांच्या माध्यमातून पुन्हा धार्मिक भेदभाव केला जाऊ नये, संबंधित विज्ञापनाच्या प्रसारणावर त्वरित बंदी घालावी, अशा मागण्या करत या आस्थापनाच्या कार्यकारी संचालकांच्या विरोधात १३ मार्च या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पाळधी (जिल्हा जळगाव) येथे तक्रार नोंद करण्यात आली. पाळधी येथील धर्मप्रेमी श्री. राहुल वासुदेव धनगर यांनी ही तक्रार नोंदवली आहे. या वेळी सर्वश्री गणेश धनगर, दीपक माळी, रमेश महाजन, शिवझेप संघटनेचे श्री. गोलू पितांबर माळी आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद शिंदे हे उपस्थित होते.

‘हिंदुस्थान युनिलिव्हर’ आस्थापनाच्या विरोधात धुळे येथे आंदोलन

धुळे आणि नंदुरबार येथे शासकीय अधिकार्‍यांना निवेदन सादर

धुळे, १३ मार्च (वार्ता.) – ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’ या आस्थापनाकडून  श्री गणेश जयंती, नवरात्र, कुंभमेळा आणि होळी यांचे औचित्य साधून हिंदुविरोधी विज्ञापने प्रसारित करून हे कृत्य केले जात आहे. हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी अन् धर्मप्रेमी यांच्या वतीने या आस्थापनावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी धुळे येथे १२ मार्च या दिवशी आंदोलन करण्यात आले.

त्यानंतर धुळे येथील उपजिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे, तर नंदुरबारचे जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांना निवेदन देण्यात आले. ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’ या आस्थापनाद्वारे प्रसारित करण्यात येणार्‍या विज्ञापनावर त्वरित बंदी घालण्यात यावी, तसेच आस्थापनावरही योग्य ती कार्यवाही करावी’, अशा मागण्या या निवेदनांद्वारे करण्यात आल्या. या वेळी सर्वश्री जितेंद्र पाटील, आकाश गावित, नरेंद्र चौधरी, मयूर चौधरी, कपिल चौधरी, सतीश बागुल, चेतन राजपूत, अमोल ठाकरे आदी धर्मप्रेमी उपस्थित होते.

‘हिंदुस्थान युनिलिव्हर’च्या विज्ञापनातील हिंदुद्वेष !

१. यात अन्य धर्मियांसाठी हिंदूंच्या पवित्र रंगांचा उल्लेख ‘डाग’ म्हणून करण्यात आला आहे.

२. मुसलमानांचे नमाज हिंदूंपेक्षा अधिक पवित्र असल्याचे सांगण्याचा प्रयत्न झाला आहे.

३. ‘होळीच्या दिवशी हिंदू हे मुसलमानांवर जाणीवपूर्वक रंग फेकतात’, असे दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे.

४. ‘मुसलमानांना रंग लागू नये; म्हणून स्वतःला रंग लागल्यास चालेल’, असा संदेशही यातून दिला गेला आहे.

हिंदुस्थान युनिलिव्हरचा विरोध करा ! – राष्ट्रीय वारकरी परिषदेचे आवाहन

ह.भ.प. बापू महाराज रावकर

मुंबई – हिंदुस्थान युनिलिव्हर आस्थापनाकडून होळी सणाचे विडंबन केल्याच्या प्रकरणी सर्व हिंदूंनी या आस्थापनाचा कडाडून विरोध करावा, असे आवाहन राष्ट्रीय वारकरी परिषदेचे कार्यवाह ह.भ.प. बापू महाराज रावकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. या पत्रकात म्हटले आहे की, ‘सर्फ एक्सेल’ आस्थापनाच्या मालावर बहिष्कार घालावा. दुसरे कुणी असे धाडस करू नये, यासाठी सरकारला या आस्थापनावर योग्य ती कारवाई करण्यासाठी भाग पाडावे. या आस्थापनाची चौकशी करून यामागे काही षड्यंत्र असू शकते का, याची सरकारने चौकशी करावी.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now