मूतखडे होऊ नयेत, म्हणून काय काळजी घ्यावी ?

मार्च मासाच्या दुसर्‍या गुरुवारी जागतिक मूत्रपिंड दिन (World Kidney Day) साजरा केला जातो.

त्यानिमित्ताने…

शरिरातील वायूरूप मळ फुफ्फुसांद्वारे वातावरणात सोडले जातात, द्रवरूप मळ लघवीद्वारे आणि घनरूप मळ शौचाद्वारे शरीराबाहेर सोडले जातात. आपण खाल्लेल्या अन्नातील कार्बोहायड्रेट्स आणि स्निग्धपदार्थ यांचे ऊर्जेत रूपांतर झाल्यावर कार्बन डायॉक्साइड वायू अन् पाणी हे मळरूपाने बाकी (शिल्लक) रहातात; परंतु अन्नातील प्रथिनांपासून पेशींतील घटक आणि ऊर्जा निर्माण झाल्यानंतर युरिआ, युरिक अ‍ॅसिड इत्यादी मळ केवळ मूत्रपिंडांतून लघवीवाटेच शरिरातून बाहेर पडू शकतात. प्रत्येक मूत्रपिंडात १० लाख नेफ्रॉन असतात. त्यातून प्रत्येक दिवशी रक्तातून १७० लिटर द्रवपदार्थ गाळला जातो आणि त्यातून पाणी, क्रिएटिनिन, युरिआ, युरिक अ‍ॅसिड नि शरिरात मळरूप झालेले फॉस्फेट, ऑक्झेलेट, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम इत्यादी क्षार आणि अधिक असलेले आम्ल अन् अल्कली शरिरातून लघवीच्या रूपाने बाहेर टाकले जातात. प्रतिदिन केवळ १.५ लिटर लघवी होते. इतर १६८.५ लिटर द्रव नेफ्रॉनमधील लांब नळीतून परत रक्तात शोषला जातो. या कार्याचे नियंत्रण समानवायू करीत असतो. मूत्रपिंडांचे कार्य नीट न झाल्यास लघवीचे प्रमाण घटते आणि शरिरात मळ साठतात. जास्त प्रमाणात मळ साठल्यास सर्व पेशींच्या कार्यात अडथळा येतो आणि रोग्याची शुद्ध हरपते. सध्या डायालिसिस करून रक्तातील मळांचे प्रमाण घटवता येते. परत परत डायलिसिस करून रोगी जगवता येतो. दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाल्यास अपघातात मृत्यू पावलेल्या माणसाच्या निरोेगी मूत्रपिंडांचे रोपण (ट्रान्सप्लॅन्ट) रोग्याच्या शरिरात करता येते. आयुर्वेदाने गोमूत्राच्या गुणधर्मांचा अभ्यास करून त्याचा औषध म्हणून उपयोग केला आहे. आज जागतिक मूत्रपिंड दिनाच्या निमित्ताने मूतखडे कसे तयार होतात आणि त्यासंदर्भात कोणती काळजी घ्यावी, याविषयी जाणून घेऊया.

१. मूतखडे कसे तयार होतात ?

‘लघवीमध्ये नेहमी कॅल्शियम ऑक्झेलेट, कॅल्शियम फॉस्फेट, मॅग्नेशियम फॉस्फेट, अमोनियम फॉस्फेट व युरेट इत्यादि क्षार विरघळलेल्या स्थितीत आढळून येतात. लघवीच्या प्रवाहामुळे हे क्षार लघवीत निघून जातात. ज्यांच्या घराण्यात मूतखड्याचा त्रास असतो, अशा व्यक्तींना वारंवार मूत्रमार्गाचे इन्फेक्शन झाले किंवा मूत्रमार्गात मूत्रवहनाला अवरोध झाला, तर या क्षारांचे थर त्या ठिकाणी जमू लागतात; परंतु बहुतेक जणांत हे स्फटिक मूत्रप्रवाहामध्ये वाहून जातात. मूत्रमार्गाचे इन्फेक्शन किंवा अवरोध यावर उपाययोजना न झाल्यास क्षारांचे थरावर थर बसून मोठ्या आकाराचे खडे तयार होतात. लहान मुलांत मूतखडे क्वचितच आढळतात. आहारात ऑक्झेलेट, कॅल्शियम, युरिक अ‍ॅसिड इत्यादींचे प्रमाण अधिक असल्यासही मूतखडा होण्याचा संभव असतो.

२. मूतखडा झाल्यास काय त्रास होतो ?

बहुतेक मूतखडे कोणताही त्रास न देता शांतपणे मूत्रपिंडांत किंवा मूत्राशयात तयार होतात आणि वाढतात. पोटासंबंधी इतर तक्रारीसाठी केलेल्या क्ष-किरण तपासणीत ते आढळून येतात. जेव्हा ते मूत्रपिंडांतून गविनी (युरेटर) द्वारा किंवा मूत्राशयातून मूत्रनलिकेमार्फत (मूत्रप्रसेक) शरीराबाहेर पडण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा मात्र रोगी असह्य वेदनांनी तळमळू लागतो आणि जमिनीवर गडबडा लोळू लागतो. नंतर लालसर रंगाची लघवी होते आणि मूतखडा बाहेर पडतो. मूतखड्यामुळे मूत्रमार्गाचे वारंवार इन्फेक्शन होऊ शकते. मूतखड्याचे वातप्रधान, पित्तप्रधान आणि कफप्रधान असे तीन प्रकार आढळतात.

३. मूतखडे होऊ नयेत, म्हणून काय काळजी घ्यावी ?

भरपूर प्रमाणात पाणी प्यावे. त्यामुळे मूत्रातील पाण्याचे प्रमाण वाढून क्षार विरघळलेल्या अवस्थेत रहातील. मूत्रमार्गाचे इन्फेक्शन झाल्यास त्वरित उपाय करावेत. ज्यांच्या घराण्यात आनुवंशिकरीत्या मूतखडे होण्याचा संभव आहे, अशांनी डॉक्टरांकडे जाऊन संपूर्ण तपासणी करून मूतखडे होण्याला कारणीभूत असा काही जन्मजात दोष किंवा मूत्रमार्गातील अवरोध असेल, तर त्यावर ताबडतोब उपाययोजना करून घ्यावी. मूतखड्याच्या प्रकारावरून आहारात काय पथ्य पाळायचे, हे डॉक्टरांकडून समजून घ्यावे.’

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘मूत्रवहनसंस्थेच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार’, लेखक : डॉक्टर, तसेच वैद्याचार्य सद्गुरु वसंत बाळाजी आठवले [एम्.डी. (पीडिअ‍ॅट्रिक्स), डी.सी.एच्., एफ्.ए.एम्.एस्.] आणि डॉ. कमलेश वसंत आठवले [एम्.डी. (पीडिअ‍ॅट्रिक्स), डी.एन्.बी., एम्.एन्.ए.एम्.एस्., एफ्.ए.ए.पी. (पीडिअ‍ॅट्रिक्स अँड निओनेटॉलॉजी) (अमेरिका)]


Multi Language |Offline reading | PDF