साईबाबा संस्थानचे ३ विश्‍वस्त बडतर्फ ! 

शिर्डी, १३ मार्च – शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थामधील तीन सदस्यांना बडतर्फ केल्याची अधिसूचना विधी आणि न्याय विभागाने नुकतीच घोषित केली. त्यामुळे आता व्यवस्थापन मंडळात केवळ पाचच सदस्य राहिले आहेत. शिवसेनेच्या तीन सदस्यांनी नियुक्तीपासून एकाही सभेला उपस्थिती दर्शवली नाही. त्यामुळे या तीन सदस्यांना शासनाने २ फेब्रुवारी २०१९ या दिवशी संस्थानमधून काढून टाकलेे. १२ मार्च या दिवशी संस्थानने या तीन विश्‍वस्तांच्या नावावर चिकटपट्टी लावून त्यांची नावे झाकून टाकली. मधल्या कालावधीत भारतीय जनता पक्षाच्या तीन विश्‍वस्तांनी त्यागपत्र दिले होते.

१० विश्‍वस्तांच्या नियुक्तीचा पुनर्विचार करण्याचा न्यायालयाचा आदेश !

महाराष्ट्र शासनाच्या विधी आणि न्याय विभागाने साईबाबा संस्थानचा कारभार पहाण्यासाठी शासनाने नेमलेल्या ११ पैकी १० विश्‍वस्तांच्या विरोधात अधिनियमाच्या तरतुदींच्या विरोधात माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. संजय काळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाकडे याचिका केली आहे. त्यात त्यांना यश मिळाले असून न्यायालयाने शासनाला त्यांच्या नियुक्तीचा पुनर्विचार करण्याचा आदेश दिला आहे.

सध्याचे विश्‍वस्त मंडळ विसर्जित करून चारित्र्यसंपन्न साईभक्तांचे विश्‍वस्त मंडळ नेमावे ! – संजय काळे

या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. संजय काळे म्हणाले, ‘‘आता संस्थान विश्‍वस्त मंडळात महिला नाही. सामाजिक आणि आर्थिक मागास सदस्य नाही. आठ तज्ञ विश्‍वस्त नाहीत. त्यामुळे आता विश्‍वस्त मंडळ शासनाने विसर्जित करावे. शासनाने आंतरराष्ट्रीय स्तरावर साई संस्थानची चाललेली अवहेलना थांबवून न्यायमूर्ती धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती मंगेश पाटील यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे स्वच्छ आणि चारित्र्यसंपन्न साईभक्तांचे विश्‍वस्त मंडळ नेमावे.’’

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now