परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या देहत्यागाचे श्री. निषाद देशमुख यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

३.३.२०१९ या दिवशी देवद आश्रमात रहाणारे परात्पर गुरु पांडे महाराज यांनी संध्याकाळी ५.२२ मिनिटाला देहत्याग केला. त्यांच्या देहत्यागाचे श्री. निषाद देशमुख यांनी रामनाथी आश्रमातून केलेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.

श्री. निषाद देशमुख

१. परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या मृत्यूघटिकेचे केलेले सूक्ष्म परीक्षण

‘परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या मृत्यूघटिकेचे परीक्षण केल्यावर पुढील सूत्रे लक्षात आली.

अ. ‘देहत्याग करण्याच्या काही क्षण पूर्वीपासून परात्पर गुरु पांडेबाबा यांनी त्यांची प्राणज्योत आज्ञाचक्रावर धारण केली आहे’, असे दिसले. ‘परात्पर गुरु पांडेबाबा स्वतःच्या योगसामर्थ्याने कधीही देहत्याग करू शकतात; पण ईश्‍वरेच्छेची ते वाट पहात आहेत’, असे लक्षात आले.

आ. मृत्यू होतांना देहातील प्राणशक्ती कार्यरत होऊन लिंगदेहाला स्थूलदेहाच्या बाहेर ढकलते. परात्पर गुरु पांडेबाबा यांच्या देहात वायूंच्या तशा हालचाली न जाणवता समप्रमाणात वायूप्रवाह चालू होता. ‘परात्पर गुरु पांडेबाबा सहजयोगी असून साधनेमुळे त्यांनी गाठलेल्या अत्युच्च स्थितीची ही अनुभूती आहे’, असे लक्षात आले.

इ. परात्पर गुरु पांडेबाबा यांच्यावर पाताळातील अनेक बलाढ्य वाईट शक्ती आक्रमण करण्याचा प्रयत्न करत होत्या; पण श्रीगणपतीने त्यांच्या आणि वास्तूभोवती निर्माण केलेल्या संरक्षककवचामुळे आक्रमणाचा केवळ २ – ३ टक्के परिणाम होत होता. यामुळे वाईट शक्तींचे तीव्र आक्रमण असतांनाही परात्पर गुरु पांडे बाबांच्या भोवती दाब न जाणवता चैतन्य जाणवत होते.

ई. ‘परात्पर गुरु पांडेबाबांनी देहत्याग करण्यापूर्वी अनेक ऋषी-मुनी त्यांच्या खोलीत उपस्थित असून वेदमंत्रोच्चार करत आहेत’, असे दिसले.

उ. ‘ईश्‍वराकडून परात्पर गुरु पांडेबाबा यांच्या स्थूलदेहाकडे पांढरा प्रकाश प्रक्षेपित होत असून अनेक देवता त्यांना पुष्पांजली अर्पण करत आहेत’, असे दिसले. ‘ईश्‍वराने परात्पर गुरु पांडेबाबा यांना देहत्यागाची परवानगी दिली’, असे जाणवले.

ऊ. ‘परात्पर गुरु पांडेबाबा यांच्या आज्ञाचक्रावरील ज्योतीची दोन रूपे झाली. त्यातील एक ज्योती रूप सत्यलोकात, तर दुसरे ज्योती रूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यात समाविष्ट झाले आणि याप्रकारे परात्पर गुरु पांडेबाबा यांनी देहत्याग केला’, असे दिसले. ‘परात्पर गुरु पांडेबाबा देहत्यागाच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यात प्राणरूपात समाविष्ट झाले आहेत’, असे लक्षात आले.

ए. परात्पर गुरु पांडेबाबा यांच्या देहत्यागानंतर सूक्ष्मातून मोठ्या प्रमाणात चंदनाचा सुगंध आला.

ऐ. ‘देहत्यागानंतर परात्पर गुरु पांडेबाबा यांच्या पार्थिवातून अनेक प्रकारचे आणि विविध रंगांचे दैवी कण बाहेर पडून विश्‍वभराच्या सर्व साधकांकडे प्रक्षेपित होत आहे’, असे दिसले. ‘सर्वत्रच्या साधकांना साधना करण्यासाठी ते आपली शक्ती देत आहेत’, असे जाणवले.

ओ. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी संध्याकाळी ५.२२ या वेळेवर देहत्याग केला. ५+२+२ = ९ होतात. संख्याशास्त्रानुसार ९ हा पूर्णांक आहे. ‘परात्पर गुरु पांडेबाबा पूर्णत्वाला गेले आहेत. याची ‘काळपुरुषाने दिलेली ही साक्ष आहे’, असे जाणवले.

औ. ‘भूलोकातून उच्चलोकात जाण्यात काळाचे अडथळे असतात. परात्पर गुरु पांडेबाबा यांनी देहत्याग केल्याक्षणी काळाचा कोणताही अडथळा नव्हता. यामुळे त्यांचा लिंगदेह अलगद सत्यलोकात गेला आहे’, असे दिसले. ‘परात्पर गुरु पांडेबाबा यांचे रक्षण करण्यासाठी ईश्‍वराने काळाचे सर्व अडथळे अल्प केले आहेत’, असे लक्षात आले.

अं. परात्पर गुरु पांडेबाबा यांनी देहत्याग केल्यानंतर खोलीतील निर्गुण तत्त्वात पुष्कळ वाढ होऊन शांती जाणवत होती.

२. परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या पार्थिवाचे केलेले सूक्ष्म परीक्षण

परात्पर गुरु पांडे महाराज यांनी देहत्याग केल्यानंतर सूक्ष्मातून मी त्यांच्या पार्थिवाच्या जवळ गेलो. त्या वेळी पुढील सूत्रे लक्षात आली.

अ. परात्पर गुरु पांडे महाराज यांचे पार्थिव सूक्ष्मातून पूर्ण श्‍वेत दिसत होते. सर्वसाधारण जिवांचा पार्थिव देह सूक्ष्मातून काळसर दिसतो. ‘पार्थिवातून प्रक्षेपित होणार्‍या निर्गुण तत्त्वाची ही अनुभूती आहे’, असे लक्षात आले.

आ. परात्पर गुरु पांडेबाबांचे पार्थिव म्हणजे मृतदेह नसून एक पोकळी आहे आणि त्याच्यातून समष्टीसाठी आवश्यक निर्गुण तत्त्व प्रक्षेपित होत आहे, असे जाणवले. ‘त्यांच्या समष्टी कल्याणाच्या तळमळीमुळे पार्थिवातून निर्गुण तत्त्व प्रक्षेपित होत आहे’, असे जाणवले.

इ. पार्थिव असलेल्या खोलीतील जवळपासचे सर्व वातावरण स्तब्ध असून सर्वत्र आनंद आणि शांती यांची स्पंदने जाणवत होती. ‘परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या साधकांवर असलेल्या प्रीतीमुळे त्यांच्यातील निर्गुण तत्त्व आनंद आणि शांती यांच्या रूपांत प्रगट होऊन साधकांना निरनिराळ्या अनुभूती देत आहे’, असे जाणवले.

ई. ‘परात्पर गुरु पांडेबाबांचे पार्थिव ठेवलेल्या खोलीत सूक्ष्मातून ‘ॐ’कार ध्वनी ऐकू येऊन त्याची दैवी साक्षही त्या खोलीत उमटली आहे’, असे जाणवले.

उ. परात्पर गुरु पांडेबाबांच्या पार्थिवाचे सूक्ष्म परीक्षण करतांना त्यातून प्रक्षेपित निर्गुण तत्त्वाचा परिणाम माझ्या आज्ञा आणि सहस्रार या चक्रांवर जाणवत होता. त्यामुळे माझा श्‍वास मंद होऊन ध्यान लागत होते.

३. परात्पर गुरु पांडे महाराज यांची सर्वत्रच्या साधकांवरील कृपा आणि त्यांच्या देहत्यागाची वैशिष्ट्ये

‘परात्पर गुरु पांडे महाराज यांचा अचानक देहत्याग का झाला ?’, असे विचार मनात आल्यावर ईश्‍वराकडून पुढील ज्ञान मिळाले.

३ अ. अघोरी बलाढ्य वाईट शक्ती यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर केलेले प्राणघातक आक्रमण स्वतःवर घेऊन देहत्याग करणारे परात्पर गुरु पांडे महाराज : ‘जानेवारी २०१९ पासून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वाईट शक्ती आणि अधर्म पक्ष यांच्याशी समोरासमोरचे युद्ध चालू झाले आहे. या युद्धात जिंकण्यासाठी वर्तमानकाळात अघोरी बलाढ्य वाईट शक्ती परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर आक्रमण करत आहे. सर्व वाईट शक्तींमध्ये अघोरींची शक्ती सर्वाधिक असते. अघोरींना ‘मारण शक्ती (कुणाचाही मृत्यू घडवून आणणे, ती शक्ती)’ प्राप्त असून आयुष्यात एकदाच त्यांना तिचा वापर करता येतो. अशा मारण शक्तीचा वापर अघोरींनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर केला होता. ईश्‍वरी राज्य (हिंदु राष्ट्र) स्थापनेसाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व आवश्यक आहे. यामुळे ईश्‍वरेच्छेने परात्पर गुरु पांडे महाराज यांनी ते शक्तीप्रहार स्वतःवर घेतले आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे रक्षण केले. (मयन महर्षींनी पू. (डॉ.) ॐ उलगनाथन्जी यांच्या माध्यमातून असेच सांगितले आहे. – संकलक)

३ आ. मारक शक्तीचा प्रहार होऊनही जीवित राहून ईश्‍वरेच्छेने देहत्याग करण्याचा ‘पराक्रम’ करणारे परात्पर गुरु पांडे महाराज : मारक शक्तीचा शक्तीप्रहार झाल्यावर जीवित रहाणे अशक्य असते. असे होऊनही खडतर साधनेमुळे स्थळ आणि काळ यांना पराजित करून काही काळ जीवित रहाण्याचा ‘दिव्य पराक्रम’ परात्पर गुरु पांडे महाराज यांनी केला आणि ईश आज्ञेनुसार पुढचे समष्टी कार्य करण्यासाठी योग्य वेळी त्यांनी देहत्याग केला. हे त्यांचे आगळेवेगळे दिव्यत्व आहे. अशा थोर विभूतींना शिरसाष्टांग नमस्कार !’

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.३.२०१९, रात्री ७.४५)

४. परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या चैतन्यामुळे देवद आश्रमातील बाहेरील बाजूच्या छायाचित्रात लिंगदेह आणि निळसर रंग दिसणे

‘परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या देहत्यागानंतर सौ. प्रियांका राजहंस यांनी देवद आश्रमाच्या बाहेरील बाजूचे श्री. महेंद्र सहस्रबुद्धे यांनी काढलेले एक छायाचित्र सूक्ष्म परीक्षणासाठी पाठवले. त्याचे परीक्षण येथे देत आहे.

अ. चित्रामध्ये दिसणारे पांढरे गोलाकार (orbs) लिंगदेहांचे प्रतीक आहे. परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या देहत्यागानंतर अनेक ऋषी-मुनी, तसेच साधना करणारे जीव त्यांच्या पार्थिवाचे दर्शन आणि चैतन्य ग्रहण करण्यासाठी देवद आश्रमात आले आहेत. त्याची ही स्थूल साक्ष आहे.

आ. चित्रामध्ये निळा आणि काळा असे दोन रंग दिसत आहेत. त्याच्यातील निळा रंग परात्पर गुरु पांडे महाराज यांच्याकडून सर्वत्र प्रक्षेपित होत असलेले निर्गुण तत्त्वाचे प्रतीक आहे, तर काळा रंग वाईट शक्ती करत असलेल्या आक्रमणांचा प्रतीक आहे.’

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.३.२०१९, रात्री ८.२३)

सूक्ष्म परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म परीक्षण’ म्हणतात.

परात्पर गुरु पांडे महाराज यांनी देहत्याग केल्यानंतर त्यांनी दिलेला मंत्रजप करतांना देवद आश्रमात ते झोपत असलेल्या बिछान्यावर प.पू. अनंतानंद साईश यांनी उशीच्या बाजूस स्वतःच्या चरणपादुका ठेवल्याचे दिसणे

‘परात्पर गुरु पांडे महाराज यांनी देहत्याग केल्यानंतर ५.३.२०१९ या दिवशी मी त्यांनी दिलेला उपायांचा मंत्रजप करत रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात बसले होते. त्या वेळी मला पुढील दृश्य दिसले, ‘देवद आश्रमातील फाटकामधून पाच मोर आश्रमात आले. ते परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या कक्षाकडे गेले. त्यातील एक मोर ध्यानमंदिरात फिरून आला आणि परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या कक्षात गेला. तेव्हा परात्पर गुरु पांडे महाराज ज्या बिछान्यावर झोपत, त्यावर प.पू. अनंतानंद साईश बसलेले दिसले. त्यांनी बिछान्याच्या उशीच्या बाजूस स्वतःच्या चरणपादुका ठेवल्या आणि ते निघून गेले. ते मोर इतके सात्त्विक होते की, ते दृश्य सतत डोळ्यांसमोर येते. मला ही अनुभूती दिली; म्हणून परात्पर गुरु आठवले यांच्या चरणी कोटी कोटी वेळा कृतज्ञता व्यक्त करते.’ – श्रीमती अंजली कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

श्रीमती अंजली कुलकर्णी

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.


Multi Language |Offline reading | PDF