५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पुणे येथील चि. उत्कर्ष अभिनय लोटलीकर (वय ५ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. उत्कर्ष लोटलीकर हा एक आहे !

फाल्गुन शुक्ल पक्ष सप्तमी (१३.३.२०१९) या दिवशी चि. उत्कर्ष अभिनय लोटलीकर याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या कुटुंबियांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

(‘वर्ष २०१७ मध्ये चि. उत्कर्ष लोटलीकर याची आध्यात्मिक पातळी ५३ टक्के होती.’ – संकलक)

चि. उत्कर्ष लोटलीकर

चि. उत्कर्ष लोटलीकर याला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

१. हसतमुख आणि लाघवी

‘उत्कर्ष नेहमी हसतमुख असतो. त्याला सगळ्यांमध्ये मिसळायला आवडते. त्याच्या बोलण्यात गोडवा आहे. त्याचे बोलणे ऐकत रहावेसे वाटते. तो लाघवी आहे. त्याच्या बोलण्याने अन्य त्याच्याकडे आकर्षित होतात.’ – सौ. माधवी लोटलीकर (आजी (वडिलांची आई)), डोंबिवली आणि सौ. माया पिसोळकर (आजी (आईची आई)), अमरावती

२. चांगली आकलनक्षमता

‘त्याने ‘गरुडगमन…’ हे भजन एकदाच ऐकले. ते भजन लक्षात रहायला कठीण असूनही ते त्याच्या स्मरणात राहिले आणि मुखोद्गत झाले. तो अधूनमधून हे भजन गातो.

३. तो शाळेत संस्कृत गाण्यावरील नृत्यात नेहमी सहभागी होतो.’

– सौ. मुक्ता अभिनय लोटलीकर (आई), पुणे

४. समंजस

अ. ‘त्याला एखादे खेळणे हवे असेल आणि त्याला ते न घेण्याविषयी समजावून सांगितले, तर तो हट्ट करत नाही.

आ. त्याची आई सेवा करत असतांना तो तिच्याशी बोलायला जात नाही. त्या वेळी तो मुलांसह खेळतो.

इ. तो स्वतःच्या हाताने जेवतो.’

– सौ. माधवी लोटलीकर

५. ‘त्याला रामायण आणि महाभारत या विषयांवरील मालिका पहायला अन् त्यातील गोष्टी ऐकायला आवडतात.’

– सौ. मुक्ता लोटलीकर

६. इतरांना साहाय्य करणे

अ. ‘जेवतांना बसायला आसन घेणे, ताटे-वाट्या आणि पाणी घेणे, वाटाणे अन् लसूण सोलणे, कोथिंबीर अन् मेथीची भाजी निवडणे, केर काढून कचर्‍याच्या बालदीत टाकणे, अशी कामे करण्यात तो आम्हाला साहाय्य करतो. त्याच्या हातून पाणी सांडल्यास तो स्वतःहून पुसतो. तो कुंडीतील झाडांना पाणी घालतो.’ – सौ. माधवी लोटलीकर

आ. ‘एकदा त्याची आजी (सौ. माया पिसोळकर) पोळ्या करत होती. त्या वेळी त्याने आजीला ‘काही साहाय्य करू का ?’, असे विचारले. त्याने आजीच्या साहाय्याने त्याला जमेल तशी पोळी लाटली.

इ. आम्ही दिवाळीत घरापुढे रांगोळी काढत होतो. त्या वेळी त्याने मला विचारले, ‘‘तुम्हाला साहाय्य हवे का ? मी रांगोळीत रंग भरू का ?’’

– सौ. वैष्णवी पिसोळकर (मामी), जळगाव

७. प्रेमभाव

अ. ‘नातेवाईक आणि मित्र यांच्यावर उत्कर्षचेे प्रेम आहे. त्याला एखादी गोष्ट आवडली नाही, तरी तो प्रेमाने सांगतो. त्याला भांडायला आवडत नाही. कुणी रागावले, तरी तो शांत राहून त्याच्याशी परत बोलायला जातो.

आ. तो त्याला मिळालेला खाऊ सर्वांना वाटतो.’

– सौ. माधवी लोटलीकर

इ. ‘त्याला कुणी खाऊ दिल्यास ‘तो छान झाला आहे’, असे मनापासून सांगतो.’ – सौ. मुक्ता लोटलीकर

८. धर्माचरण करणे

‘त्याला सदरा आणि पायजमा घालायला, तसेच टिळा लावायला आवडते.

९. देवाची ओढ

अ. ‘उत्कर्षला मारुतिस्तोत्र मुखोद्गत आहे. तो शाळेत जाण्यापूर्वी ते म्हणतो.

आ. तो जेवणापूर्वी ‘वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे ।’ हा श्‍लोक म्हणतो.

इ. तो वाहनातून शाळेत जातांना स्वतःहून प्रार्थना करतो आणि इतरांनाही प्रार्थना करायला सांगतो.

ई. एकदा मी त्याला विचारले, ‘‘तू कोणते नामस्मरण करतोस ?’’ तेव्हा तो म्हणाला, ‘‘श्रीरामाचे ! मला प.पू. आबांनी श्रीरामाचे नामस्मरण सांगितले आहे.’’

– सौ. माधवी लोटलीकर

उ. ‘एकदा त्याने अन्नपूर्णादेवी, गणपति आणि देव्हार्‍यातील अन्य देव यांची मनापासून पूजा केली. त्याने तीर्थ काळजीपूर्वक भांड्यात ठेवले.’ – सौ. मुक्ता लोटलीकर

१०. चुकांविषयी संवेदनशील असणे

‘त्याच्याकडून चूक झाल्यास तो देवाची आणि इतरांची क्षमा मागतो. इतरांकडून चूक झाल्यास तो त्यांनाही क्षमा मागण्यास सांगतो.

११. सेवा करायला आवडणे

त्याला लहान मुलांना खेळवायला आवडते. तो वाहनफेरीच्या वेळी घोषणा देतो. त्याला आईच्या समवेत प्रथमोपचार आणि वैद्यकीय तपासणी शिबिरात जायला आवडते.’

– सौ. माधवी लोटलीकर

१२. रुग्णाईत असतांना संतांनी सांगितलेला जप चिकाटीने करणे

‘मी पुण्याला गेले असतांना एकदा तो रुग्णाईत होता. तेव्हा त्याला वैद्यकीय उपचारांनी बरे वाटत नव्हते. त्याच्या रक्ताची तपासणी करूनही त्याच्या आजाराचे निदान झाले नाही. तेव्हा सद्गुरु सत्यवानदादांनी त्याच्यासाठी बीजमंत्राचा जप सांगितला. त्याने रुग्णाईत असतांनाही चिकाटीने नामजप पूर्ण केला.

१३. सूक्ष्मातील जाणणे

तो त्याला आवश्यक असलेला नामजप स्वतःहून करू लागतो.’

– सौ. माया पिसोळकर

१४. भाव

अ. ‘तो माझ्या समवेत मानसपूजा करतांना ‘परात्पर गुरुदेवांनी पांढरे कपडे घातले होते. प.पू. बाबांनी (संत भक्तराज महाराज यांनी) धोतर नेसले होते. परात्पर गुरुदेवांनी मला चॉकलेट दिले’, असे मला सांगतो.

आ. तो शाळेत अक्षरे आणि अंक व्यवस्थित काढतो. त्याला ‘हे कुणी शिकवले ?’, असे विचारल्यास तो ‘श्रीकृष्णबाप्पाने शिकवले’, असे सांगतो.

१५. स्वभावदोष : लवकर राग येणे आणि हट्टीपणा.’

– सौ. मुक्ता लोटलीकर (१.३.२०१९)

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/०६MJck मार्गिकेवरही पाहू शकता.


Multi Language |Offline reading | PDF