राहुल‘जी’ !

संपादकीय

हिंदी भाषेमध्ये एखाद्या व्यक्तीला आदरणीय, प्रतिष्ठित, सम्मानित (सन्मानित), सम्माननीय (सन्माननीय), माननीय, श्रद्धेय, कुलीन, कुलवान आदी आदरार्थी म्हणून उल्लेख करण्यासाठी त्याच्या नावापुढे ‘जी’ हा शब्द लावला जातो, उदा. श्रीरामजी, श्रीकृष्णजी. आता येथेही हे पहायला हवे की, कोणती व्यक्ती कोणासाठी आदरणीय आणि सन्माननीय आहे. भक्त, भाविक हे संत, गुरु, देवता यांना ‘जी’ हा शब्द लावू शकतात, एखादा गुंड, भ्रष्टाचारी, अनैतिक राजकीय नेता असल्यासही त्याचे सहकारी, कार्यकर्ते, समर्थक त्याच्या नावानंतर ‘जी’ लावू शकतात, कारण ती व्यक्ती त्यांच्यासाठी आदरार्थी असू शकते; मात्र तीच व्यक्ती समाजाच्या दृष्टीने आदर करण्याऐवजी तिरस्कार करण्याच्या लायकीची असते. काही वेळेला थेट त्या व्यक्तीचा अनादर करता येत नाही किंवा तिला मान देण्याचे टाळता येत नाही, तेव्हाही ‘जी’ लावण्यात येते. राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या संदर्भात जनतेला हे करावे लागते, असे सर्वत्र आढळून येते. हे सांगण्याचा उद्देश हा की, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देहली येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या संमेलनामध्ये जैश-ए-महंमदचा प्रमुख आणि पुलवामा येथील आतंकवादी आक्रमणाचा मुख्य सूत्रधार मसूद अझहर याचा उल्लेख करतांना ‘अझहरजी’ असा केला आहे. मसूद अझहर याला कंदहार विमान अपहरण प्रकरणात अजित डोवाल हे सोडण्यास गेले होते, असा उल्लेख करतांना राहुल‘जी’ यांनी हा उल्लेख केला. आता यातून काय समजायचे ते समजायला हरकत नाही.

मनातले जिभेवर !

काँग्रेस अध्यक्षांकडून भारतियांना, भारतीय सैनिकांना ठार करणार्‍या आतंकवादी संघटनेच्या प्रमुखाला आदरार्थी शब्द वापरून त्यांनी त्यांच्या पक्षाची मानसिकता पुन्हा एकदा उघड केली आहे. यापूर्वी काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी आतंकवादी ओसामा बिन लादेन याचा उल्लेख करतांना ‘ओसामाजी’ असा केला होता. त्यानंतर आता थेट काँग्रेस अध्यक्ष एका आतंकवाद्याचा उल्लेख ‘जी’ लावून करत आहेत. पुलवामा येथील आक्रमणानंतर देशातील जनता संतप्त असतांना, मसूद याच्यावर कारवाई होण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत असतांना काँग्रेस अध्यक्ष त्याला ‘जी’ कसे काय म्हणू शकतात ? काँग्रेसवाल्यांकडून असा आदर होण्यामागे त्यांची पाकप्रेमी आणि आतंकवादी प्रेमी मानसिकता कारणीभूत असून असे विधान करण्यामागे केवळ भाजपद्वेषच दिसून येतो. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवाल यांना लक्ष्य करतांना राहुल यांनी हे विधान केले. डोवाल मोदी यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. याचमुळे त्यांच्यावर टीका करतांना राहुल गांधी मसूद याचा आपण आदर करत आहोत, हे विसरले. विसरले नाही, तर त्यांच्या मनातले समोर आले. डोवाल यांनी मसूद याला सोडले नव्हते, तर तत्कालीन भाजप सरकारने सर्व पक्षियांचे मत घेऊन हा निर्णय घेतला होता, हा इतिहास आहे. याचे पुरावेही उपलब्ध आहेत; मात्र एखाद्याच्या मनात द्वेष असला की, तो खरे-खोटे जाणून न घेता किंवा जाणूनही ती व्यक्ती काहीही बरळू लागते. राहुल यांच्यावर या शब्दावरून टीका होऊ लागल्यावर काँग्रेसचे नेते अहमद पटेल म्हणाले की, ‘राहुल यांनी गमतीने असे म्हटले, त्याचा बाऊ करण्यात काही अर्थ नाही.’ राजस्थानमधील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणतात की, गांधी घराण्याने देशासाठी प्राणत्याग केला आहे. इंदिरा गांधी, राजीव गांधी ही उदाहरणे असतांना राहुल गांधी आतंकवाद्यांना आदरार्थी म्हणतील, असे समजणेच चुकीचे आहे.’ अहमद पटेल, अशोक गेहलोत यांच्यासारख्या नेत्यांचे आयुष्य गांधी घराण्याची ‘हांजी हांजी’ करण्यात गेले आहे, ते अशा प्रकारेे त्याचे समर्थनच करणार, यात आश्‍चर्याचे काही नाही. मुळात भारतीय नागरिक आणि सैनिक यांच्या हत्या करणार्‍या आतंकवादी संघटनेच्या प्रमुखाला ‘जी’ म्हणणे ही गंमत असू शकत नाही, असे जनतेला वाटते. जर लोकांना हे पटलेले नाही, तर राहुल यांनी क्षमा मागणे अपेक्षित आहे; मात्र काँग्रेसी नेते त्याचे अशा प्रकारे समर्थनच करत आहेत, हे लक्षात घ्यायला हवे.

काँग्रेस सत्तेवर आल्यास आतंकवाद्यांना बिर्याणी !

भारतातील जिहादी आतंकवादाचा प्रारंभ वर्ष १९८७ पासून झाला. या वर्षी जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या राज्यातील निवडणुकीपासून जिहाद्यांनी कारवाया प्रारंभ केल्या. वर्ष १९९० मध्ये जिहाद्यांनी हिंदूंना मशिदींवरील भोंग्यांवरून धमकी देऊन पळून जाण्यास सांगितले. त्या वेळी काँग्रेसने या जिहाद्यांवर कोणतीही कारवाई केली नाही. त्याचा परिणाम सहस्रो हिंदूंना ठार करण्यात आणि साडेचार लाखांहून अधिक हिंदूंनी तेथून पलायन करण्यात झाला. अजूनही हे हिंदू त्यांच्या मूळ ठिकाणी जाऊ शकत नाहीत, ही स्थिती आहे. गेल्या ३ दशकांपैकी, १५ वर्षे देशात काँग्रेसचेच सरकार होते; मात्र या काळात काँग्रेसने हा आतंकवाद नष्ट करण्यासाठी कोणताही प्रयत्न केला नाही. त्याच्या काळातच जैश-ए-महंमद, लष्कर-ए-तोयबा, हिजबुल मुजाहिदीन या आतंकवादी संघटना राज्यात कारवाया करू लागल्या. यावर राहुल गांधी काही बोलणार नाहीत. काश्मीरच्या समस्येचे मूळही काँग्रेस आणि राहुल यांचे पणजोबा नेहरू उत्तरदायी आहेत. काश्मीरमधील हिंदु महाराजा हरिसिंह यांच्या हातातील सत्ता शेख अब्दुल्ला यांना देणारेही नेहरूच आहेत. हीच काँग्रेसची परंपरा ‘राहुलजी’ चालवत आहेत. त्यातूनच ते ‘अझहरजी’, त्यांचे नेते ‘ओसामाजी’ असे शब्द वापरत आहेत. त्यामुळे काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यास आतंकवाद नष्ट होण्यापेक्षा त्यांचा आदर, सत्कार झाल्यास, त्यांना पुन्हा एकदा बिर्याणी खाऊ घातली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही !

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now