सागरी मार्गाला महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचा विरोध

मनमानीपणे निर्णय घेणारी महापालिका जनतेच्या तक्रारीकडे लक्ष देईल का ?


मुंबई –
मुंबईतील सागरी मार्गासाठी रेती पडताळणीच्या (सॉईल टेस्टिंग) अनुमतीविना कोणतीही अनुमती महापालिकेकडे नाही, असा आरोप महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या वतीने करण्यात आला आहे. या प्रकल्पाविषयी कोणत्याही मच्छीमार बांधवांसमवेत चर्चा करण्यात आली नसल्याने या मार्गाला आमचा विरोध आहे, असे संघटनेचे सरचिटणीस किरण कोळी यांनी सांगितले.

मासेमारी विभागाने महापालिकेला पारंपरिक मच्छीमारांना कोणताही धक्का न लागता त्यांच्या अंतर्गत असणार्‍या कामाविषयीचे ना हरकत प्रमाणपत्र दिले होते; परंतु त्यानंतरही वरील आरोप करण्यात आला आहे. केंद्रीय समृद्धी मच्छी अनुसंधान संस्थान (सीएमएफआरआय)ची अनुमती, तसेच अन्य विभागांची अनुमती महापालिकेने घेतली नसल्याचा थेट आरोप समितीकडून करण्यात आला आहे, असे कोळी यांनी म्हटले आहे.

महापालिका सांडपाण्यावर प्रक्रिया न करता समुद्रात सांडपाणी सोडत आहे. त्यामुळे यातील प्लास्टिकसारख्या घटकांमुळे अनेक समुद्री जीव नष्ट झाले आहेत. त्याचप्रमाणे समुद्रात केबलद्वारे मोठे स्फोट केले जात आहेत. या स्फोटांमध्ये ३०० ते ४०० किलोमीटर खाली असणार्‍या क्रूड ऑइलची पडताळणी केली जात असल्याने यात अनेक माशांचा जीव जात आहे, असेही आरोप त्यांनी केले आहेत.

 


Multi Language |Offline reading | PDF