शिकारी कोण ? सावज कोण ?

श्री. भाऊ तोरसेकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी एक गोष्ट ५ वर्षांपूर्वीच्या प्रचारात नेहमी सांगायचे. काल-परवा त्यांनी ‘इंडिया टुडे’च्या एका समारंभात त्याच गोष्टीची आठवण उपस्थितांना करून दिली; पण त्यातला आशय किती श्रोत्यांच्या ध्यानात आला असेल, याची शंकाच आहे; कारण तेव्हाही लोकांनी हसून टाळ्या वाजवल्या होत्या आणि याही वेळी टाळ्या वाजल्या. ती गोष्ट अशी, दोन मित्र अभयारण्यात शिकारीला जातात आणि शुकशुकाट असल्याने पाय मोकळे करायला जीपच्या बाहेर पडून फिरत असतात. त्यांची बंदूक गाडीतच राहिलेली असते आणि अकस्मात् त्यांना वाघ सामोरा येतो. तो गुरगुरू लागतो, तर दोघेही मित्र भयभीत होतात. त्यांना काही सुचत नाही. शेवटी त्यातील धूर्त माणूस सावधपणे स्वत:च्या खिशातील बंदुकीचा परवाना काढून वाघाला दाखवतो. बंदूक आणि परवाना यातील फरक ज्यांना परिणामांच्या संदर्भाने ओळखता येईल, त्यांच्यासाठी अशी गोष्ट बोधकथा असू शकते. ज्यांना आशयाचा गंध नसतो, त्यांच्यासाठी अशा गोष्टी कामाच्या नसतात. ते दुष्परिणामातून सुटू शकत नसतात. सध्या पुलवामाचे आक्रमण आणि पाकिस्तानात बालाकोटवर भारताने केलेले हवाई आक्रमण, यांचे राजकारण रंगलेले आहे. त्यात या गोष्टीतला आशय नेमका फिट बसणारा आहे; कारण या निमित्ताने देशातील जनतेच्या भावना संवेदनशील झालेल्या आहेत आणि पाकिस्तानला नामशेष करा; म्हणून सामान्यजन वाघासारखे गुरगुरत आहेत. अशा वेळी आक्रमण खरेच झाले काय आणि असेल, तर खरोखर किती जिहादी मारले गेले? असले प्रश्‍न गैरलागू असतात. जेव्हा सामान्य जनता पाकची नाचक्की बघायला उत्सुक असते, तेव्हा तशा कल्पनेच्या विरोधात बोलणेही वाघाला अंगावर घेण्यासारखे असते. तोच मूर्खपणा मोदी विरोधकांनी मागल्या २ आठवड्यांत मनसोक्त चालवला आहे. त्याची किंमत त्यांना आगामी लोकसभा मतदानात मोजावी लागणार आहे.

१. हवाईदलावरच संशय घेणे, हा मोदीविरोधकांचा खुळेपणा !

खुळेपणा एकदा चालू झाला, मग त्याला कुठे थांबवायचे त्याचा कुणालाही अंदाज येऊ शकत नसतो. राहुल गांधींनी अविश्‍वास प्रस्तावाच्या वेळी राफेलचा डंका वाजवला. तिथून या खुळेपणाला प्रारंभ झाला होता. त्याला तेव्हा माध्यमात खूप प्रसिद्धी मिळाली; म्हणून विरोधी पक्ष त्या खुळेपणात खेचले गेले आणि आता कुठवर जाऊन थांबावे, याचाही अंदाज त्यांपैकी कुणाला येत नाही, अशी दशा झालेली आहे. राफेल खरेदीत भ्रष्टाचार वा गफलत झाल्याचा कुठला क्षुल्लक पुरावाही मागच्या ८ मासांत राहुल वा कोणाला देता आलेला नाही. अगदी सर्वोच्च न्यायालयापासून प्रत्येक व्यासपिठावर त्या आरोपाचे रितसर खंडण झालेले आहे; पण नवे काही खुसपट काढून राहुल नवा आरोप करतात आणि नव्याने खुळेपणा चालू होतो. मग प्रसिद्धीसाठी मोदी आणि त्यांच्या सरकारवर कुठलेही बिनबुडाचे आरोप करून खळबळ माजवणे, हा उद्योग होऊन बसलेला आहे. त्याचाच एक भाग असा की, मोदी वा भाजपने काहीही म्हणावे, मग त्याच्यावर विरोधकांनी प्रश्‍नचिन्ह लावायचे, हा खाक्या होऊन बसला. अशा ओघात पुलवामाची घटना घडली आणि तेव्हा मोदींच्या नावावर खापर फोडणारा नवा विषय विरोधकांना मिळून गेला. पुलवामानंतर पुन्हा ‘सर्जिकल स्ट्राईक’ होणार अशी चर्चा चालू असतांना, भारतीय हवाईदलाने थेट पाकिस्तानात घुसून बॉम्ब आक्रमण केले. आता त्याचे कौतुक करायचे, तर मोदींची ५६ इंची छाती मान्य करावी लागते; म्हणून आधी मोदी सरकारचे नावही न घेता हवाईदलाचे कौतुक करण्यात आले; पण सामान्य जनतेसाठी आक्रमणाचे श्रेय तत्कालीन सरकारला मिळत असल्याने विरोधकांना पवित्रा पालटावा लागला. आक्रमणाचे कौतुक म्हणजे श्रेय मोदी सरकारला असे होत असल्याने आक्रमणाविषयीच शंका घेण्याचा पर्याय शोधण्यात आला; पण अशा शंका प्रश्‍नांनी विरोधक सेनेवर, हवाईदलावरच संशय घेत असल्याचे आयते चित्र तयार झाले. यालाच ‘खुळेपणा’ म्हणतात.

२. मोदींना प्रत्येक बाबतीत खोटे पाडण्याच्या हव्यासाने बेभान झालेले आणि राफेलच्याच झिंगेत रमलेले राहुल गांधी अन् त्यांची काँग्रेस !

हवाईदलाचे अभिनंदन करून विषय संपवला असता. पुन्हा विरोधक अन्य आर्थिक, सामाजिक विषयाकडे वळले असते, तर भाजप वा मोदी यांनी त्या आक्रमणाचे राजकीय भांडवल करण्याची संधी नाकारली गेली असती; पण तितका शहाणपणा विरोधकांकडून कोणाला अपेक्षित आहे? त्यांना मोदींना विरोध करण्यापेक्षा मोदींची हेटाळणी आणि टवाळी करण्यात अधिक स्वारस्य आहे. साहजिकच हवाईदलासह भारतीय सेनेचे कौतुक भाजप वा मोदी यांनी करताच, आक्रमणच शंकास्पद करण्याशिवाय विरोधकांना पर्याय उरला नाही. वास्तविक तोच मोदी वा भाजपाने विरोधकांसाठी लावलेला सापळा होता. जंगलात श्‍वापदाला मारण्यासाठी सापळा लावला जातो आणि चहूकडून हाकारे उठवून त्या जनावराला त्या सापळ्याच्या दिशेने ढकलले जात असते. बेभान होऊन सावज पळत सुटले, मग सापळ्यात येऊन फसते किंवा बंदुकीच्या आवाक्यात येत असते. मोदींना प्रत्येक बाबतीत खोटे पाडण्याच्या हव्यासाने बेभान झालेल्या विरोधकांना त्याचे भान राहिले नाही. राफेलच्याच झिंगेत रमलेल्या राहुल गांधींसह काँग्रेसला त्याचे स्मरण उरले नाही. मोदी बोलले की विरोध, या आवेशात मग त्यांनी मोदींच्या पुलवामा किंवा बालाकोटच्या विषयावरही विरोध हाती घेतला आणि व्यवहारात विरोधकांची भाषा सेना आणि हवाईदलाच्या विरोधात बोलली जाऊ लागली. हवाईदल वा सेनेच्या शौर्याविषयी शंका वा टवाळी केव्हा होऊन गेली, तेही अद्याप विरोधकांना समजलेले नाही. बंदूक आणि बंदुकीचा परवाना यातला फरक तसा असतो. विरोधक जनभावनेच्या वाघाला तत्त्वाचे खुलासे देत आहेत. आम्ही सरकारवर टीका करतो आहोत आणि सैन्याच्या शौर्याविषयी आम्हाला शंका नाही, असे लाजिरवाणे खुलासे देण्याची वेळ आलेली आहे; पण जनमानसात विरोधक सेनेचेही विरोधक वा पाकिस्तानवादी ठरून गेले आहेत. ह्याला म्हणतात सापळा!

३. काँग्रेससह मोदीविरोधकांची नौका आगामी लोकसभेत बुडवायला एकटे राहुल गांधी पुरेसे !

मोदींनी मोठ्या कुशलतेने आणि धूर्तपणे विरोधकांच्या हव्यासाचा आपल्या राजकीय सापळ्यासाठी उपयोग करून घेतला आहे. विरोधक आपल्या विरोधात प्रत्येक गोष्टीचा गैरवापर बेभानपणे करतात, हे ओळखून, इथे मोदींनी विरोधकांना अतिशय अलगद पकडले. आपल्या सापळ्यात ओढले. पुलवामा घातपाताचा दोष मोदींच्या माथी मारतांना हवाई प्रतिआक्रमणाचे श्रेय नाकारण्यात विरोधक इतके वहावत गेले की, कुठला आरोप कोणाविरुद्ध होतोय, याचेही भान या अर्धवटांना राहिले नाही; पण मोदी सावध होते आणि बालाकोट आक्रमणावर शंका घेतली जाताच मोदींनी सफाईने विरोधकांचा चेहरा सेनाविरोधी किंवा पाकवादी असा रंगवून घेतला. ज्या देशात पाकला साध्या क्रिकेट सामन्यात पराभूत केल्यावर जल्लोश होतो, त्या देशात पाकिस्तानावर हवाई आक्रमण भारताने केल्यास किती जोश असेल? त्याच्या विरोधात शंका वा शब्द कोण ऐकून घेईल काय? असली भाषा वाहिन्या वा बौद्धिक वर्तुळात ठीक असते. सामान्य भारतियाला तोच देशद्रोह वाटत असतो आणि तिथेच मोदींनी चतुराईने डाव विरोधकांवर उलटवून टाकला आहे. ‘मोदीला शिव्या द्या, माझी निंदा करा; पण भारतीय सेना आणि शौर्याला अपमानित करू नका’, हे मागल्या दोनचार दिवसांतील आवाहन सामान्य भारतियाच्या काळजाला हात घालणारे आहे. त्यामुळे मोदींची शिकार करायला निघालेले विरोधी पक्षाचे शिकारी स्वत:च शिकार होऊन गेलेले आहेत. हे इतके कमी होते म्हणून की काय सध्या दिग्विजय सिंह पुन्हा बोलू लागले आहेत. काँग्रेससह मोदीविरोधकांची नौका आगामी लोकसभेत बुडवायला एकटे राहुल गांधी पुरेसे असतांना असे अनेक दिग्गज मैदानात आलेले असतील, तर त्यांच्या पराभवासाठी कोणी कशाला कष्ट घ्यायला हवेत?

– श्री. भाऊ तोरसेकर

(संदर्भ : जागता पहारा,  http://jagatapahara.blogspot.com)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now