‘नेमेची येती’ निवडणुका !

संपादकीय

गेले अनेक दिवस नागरिकांसह राजकीय पक्ष चातकासारखे ज्याची वाट पहात होते, त्या लोकसभेच्या निवडणुका १० मार्चला शेवटी घोषित झाल्या. लोकशाही मार्गाने निवडणुका पार पाडण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, उमेदवारांवर आमची करडी नजर असेल, आमचे ‘फ्लाईंग स्कॉड’ सतत स्वतंत्र सर्वेक्षण करेल, मतदारांना केवळ लघुसंदेश पाठवून त्यांची माहिती मिळेल, यांसह अनेक दावे नेहमीप्रमाणे निवडणूक आयोग करत असला, तरी पैसा आणि गुन्हेगारी यांनी प्रत्येक राजकीय पक्ष लिप्त असल्याने प्रत्यक्षात निवडणुका कशा होतात, त्या कशा जिंकल्या जातात आणि ज्यांना मतदारराजा म्हटले जाते, त्याच्या मताला खरोखरच किती मूल्य आहे, हे सर्वश्रुत आहे !

गुन्हेगारांना निवडून येण्यापासून रोखू न शकणारा हतबल निवडणूक आयोग !

वर्ष १९५२ मध्ये जी सार्वत्रिक निवडणूक पार पडली, त्यात अनेक उमेदवारांकडे अनामत रक्कम भरण्यासही पैसे नसत. ही रक्कम आणि निवडणूक व्यय अनेकांनी वर्गणी काढून जमा केलेली असायची. त्याकाळी काळा पैसा फार थोड्या प्रमाणात निवडणुकीच्या माध्यमातून खेळत असे. वषेर्र् जसजशी पुढे गेली तसतसे हळूहळू उद्योगपती, गुंड-भ्रष्टाचारी आपल्याला हवा तो उमेदवार निवडून आणण्यासाठी त्याच्या मागे पैसे लावू लागले. पुढच्या टप्प्यात पप्पू कलानी, अरुण गवळी, उत्तरप्रदेश येथील राजा भैय्या, यांसह अनेक गुंडच निवडणुका लढवू लागले. ज्या विधानसभा-लोकसभा येथे असे उमेदवार निवडून जात असतील, तिथे त्यांच्याकडून सामान्यांच्या हिताचे काही होईल, याचा विचार तरी करू शकतो का ? आज ‘मनी पॉवर आणि मसल पॉवर’ ज्यांच्याकडे आहेत, असे ‘बाहुबली’च निवडणूक लढवू शकतात. अशा प्रकारे निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना सामान्यांशी काहीएक देणे नसल्याने असे लोकराज्य आणि या निवडणुका वारंवार निरर्थकच ठरत आहेत !

निवडणूक आयोगाचे वरवरचे उपाय !

मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी आणि उमेदवारांचे खरे स्वरूप समोर येण्यासाठी निवडणूक आयोग प्रत्येक वेळी नवनवीन उपाययोजना करतो. गेल्या काही निवडणुकांपासून प्रत्येक उमेदवारावर नोंद असलेल्या गुन्ह्यांचे फलक सार्वजनिक चौकात लावणे, वर्तमानपत्रांमधून उमेदवारांचा तपशील घोषित करणे, तसेच अन्य उपाययोजना निवडणूक आयोग करत आहे. यंदा काही अपप्रकार आढळ्यास त्याची माहिती देण्यासाठी एक स्वतंत्र ‘अ‍ॅप’ची निर्मिती करण्यात आली आहे. ज्याद्वारे थेट नागरिक छायाचित्र अथवा चलचित्र त्यावर टाकून अपप्रकार निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देऊ शकेल ! आजपर्यंत झालेल्या अनेक निवडणुकांमध्ये अनेक राजकीय नेत्यांवर गुन्हे नोंद झाले; मात्र त्याच्या पुढे त्याचे काय झाले, हे कधीच समोर येत नाही.

स्वार्थी राजकीय पक्ष !

मुळात लोकराज्याला कलंकित करणारे लोक आकाशातून येत नाहीत. ते काँग्रेस-भाजप, तसेच अन्य पक्षांचे जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधीच असतात. कलंकित लोकप्रतिनिधी उभे राहू नयेत, ते निवडून येऊ नयेत, अशी कोणतीही व्यवस्था ना निवडणूक आयोगाकडे आहे, ना कोणत्याही राजकीय पक्षाची तशी इच्छा आहे ! निवडून येणे हा एकमेव निकष असल्याने ठेकेदार, व्यावसायिक, गुन्हेगार, माफिया या लोकांना तिकिटे दिली जातात आणि ते निवडून येतात. निवडणूक आयोगाने खासदारांसाठी व्ययाची मर्यादा ४० लक्ष रुपयांवरून ७० लक्ष रुपयांपर्यंत केली आहे. याचा सरळ अर्थ आहे की, उमेदवारांना पैसे वाटावेच लागतात, हे आता निवडणूक आयोगाने अप्रत्यक्षरित्या मान्य केल्यासारखेच आहे.

गेल्या निवडणुकांमधील आश्‍वासनांच्या पूर्ततेचे काय ?

प्रत्येक राजकीय पक्ष निवडणुकांना सामोरे जाण्यापूर्वी त्यांचा जाहीरनामा घोषित करत असतो. गेल्या वेळी भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात ३७० व्या कलमाची समाप्ती, काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन, न्यायालयीन मार्गाने राममंदिराची उभारणी यांसह अनेक आश्‍वासने दिली होती. यातील एकही आश्‍वासन भाजपने गेल्या ५ वर्षांत पूर्ण केलेले नाही. यंदाही परत याच आश्‍वासनांचा कटोरा घेऊन राज्यकर्ते नागरिकांसमोर येतील. त्यामुळे अजून किती दिवस हिंदूंनी न पूर्ण होणार्‍या खोट्या आश्‍वासनांच्या ‘लॉलीपॉप’कडे बघत निवडणूक प्रक्रियेला सामोरे जायचे !

छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे, प्रभु श्रीरामचंद्र, चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळात कधीही निवडणुका नव्हत्या, तरीही तेथील प्रजा सुखी आणि समृद्ध होती. प्रजेला काय हवे आहे, याची नेमकी जाणीव या राजांना होती आणि प्रजेलाही त्यांची कर्तव्ये ठाऊक होती. त्या काळात कोणत्याही प्रकारच्या निवडणुका नव्हत्या. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हिंदूंनी आलटून पालटून प्रत्येक राजकीय पक्षाला संधी देऊन पाहिली; मात्र आजही हिंदूंना रस्ते, वीज, पाणी, शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागते. हिंदुहिताचा तर विचार लांबच आहे. सध्याची कोणतीच व्यवस्था नागरिकांना त्यांचे पूर्ण अधिकार देऊ शकत नाही. त्यामुळे समाजातील सर्व घटकांचे कल्याण करणार्‍या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही ! यासाठी हिंदूंनी कंबर कसावी !

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now