हिंदुविरोधी विज्ञापन प्रसारित केल्यावरून ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’ आस्थापनाच्या विरोधात गोवा आणि सोलापूर येथे पोलिसांत तक्रार प्रविष्ट

‘हिंदुस्थान युनिलिव्हर’च्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे हिंदु जनजागृती समितीचे आवाहन !

मुंबई – ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’ आस्थापनाच्या ‘सर्फ एक्सेल’ या उत्पादनाचे रंगपंचमीनिमित्त एक विज्ञापन प्रसारित केले आहे. या विज्ञापनातून हिंदूंच्या सणांच्या निमित्ताने पुन्हा एकदा हेतूतः हिंदूंचा अवमान करण्यात आला आहे. यापूर्वीही या आस्थापनाच्या अनेक विज्ञापनांतून हिंदू आणि हिंदूंचे श्रद्धास्थान यांचा अपमान केला आहे. त्यामुळे या आस्थापनाच्या संचालकांवर भा.दं.सं. कलम २९५ अ आणि १५३ अ यानुसार गुन्हा प्रविष्ट करण्यात यावा, पुन्हा विज्ञापनांच्या माध्यमातून धार्मिक भेदभाव केला जाऊ नये, अशी कठोर कारवाई करावी आणि संबंधित विज्ञापनांवर त्वरित बंदी घालावी, अशी मागणी करत या आस्थापनाच्या कार्यकारी संचालकांच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गोवा येथे श्री. चंद्रकांत (भाई) पंडित यांनी म्हापसा पोलीस ठाण्यात, तर पंढरपूर (सोलापूर) येथे श्री. पुरुषोत्तम लंके यांनी पोलीस  ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. गोवा येथे श्री. जयेश थळी, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री गडेकर, सनातन संस्थेच्या सौ. शुभा सावंत या वेळी उपस्थित होत्या. तसेच पंढरपूर येथे हिंदु महासभेचे अध्यक्ष श्री. बाळकृष्ण डिंगरे, पेशवाई युवा मंचचे अध्यक्ष श्री. ओंकार कुलकर्णी, हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता नीलेश सांगोलकर आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे हे उपस्थित होते.

या संदर्भात हिंदु जनजागृती समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,

१. या विज्ञापनात ‘होळीच्या दिवशी लहान मुले रंग खेळत असतांना एक लहान हिंदु मुलगी सायकल चालवत येते आणि तेथील मुलांना तिच्यावर रंग फेकण्याचे आवाहन करते.

त्यांचे रंग आणि पाण्याचे फुगे संपेपर्यंत तेथे ती फेर्‍या मारते. त्यांचे रंग आणि पाण्याचे फुगे संपल्यावर ती एका घरासमोर जाते. त्या एका घरातून पांढरा शुभ्र सदरा आणि पायजमा घातलेला लहान मुसलमान मुलगा बाहेर पडतो. ती मुलगी त्याला ‘बाहेर ये, सर्व (रंग) संपले आहेत’, असे सांगत सायकलवर बसवून मशिदीच्या समोर नेऊन सोडते. तेव्हा तो मुलगा म्हणतो, ‘मी नमाज पढून येतो.’ त्या वेळी ती मुलगी म्हणते, ‘नंतर रंग पडेल.’ त्याच वेळी ‘आपलेपणाच्या रंगात इतरांना रंगवतांना डाग लागले, तर ते डाग चांगले आहेत’, असा संदेश दिला जातो. यातून या आस्थापनाला नेमका काय संदेश द्यायचा आहे ? रंगपंचमीच्या दिवशी हिंदू नमाजपठणाला जाणार्‍या मुसलमानांवर रंग उडवतात का ? हिंदु मुलगी आणि मुसलमान मुलगा अशी पात्रे दाखवून काय साध्य करायचे आहे ? हिंदूंची रंगपंचमी आणि मुसलमानांचा नमाज यांचा काही संबंध आहे का ? प्रत्येक वेळी हिंदु सणांच्या वेळीच अशी विज्ञापने का येतात ?, असे अनेक प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होतात. सामाजिक माध्यमांतून खूप मोठ्या प्रमाणात याचा विरोध होऊनही या आस्थापनाकडून याविषयी काहीही प्रतिसाद मिळालेला नाही, यातूनच या आस्थापनाला हिंदूंच्या धर्मभावनांची किती किंमत आहे, हेच दिसून येते.

२. ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’चे हे पहिलेच वादग्रस्त विज्ञापन नसून यापूर्वी एका विज्ञापनात ‘कुंभमेळ्यात स्वतःच्या म्हातार्‍या आईवडिलांना मुले सोडून देण्यासाठी आणतात’, अशा आशयाचे ‘रेड लेबल’ चहाचे वादग्रस्त विज्ञापन नुकतेच प्रसारित केले होते.

३. त्याआधी गणेशचतुर्थीच्या काळात मुसलमान गणेशमूर्ती विक्रेता आणि मूर्ती घ्यायला आलेला हिंदु व्यक्ती यांचे वादग्रस्त विज्ञापन प्रसारित केले होते.

४. एकूणच ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’ने हिंदुविरोधी विज्ञापनांची मालिका चालवल्याचे दिसून येते. आता मात्र हिंदू हे सहन करणार नाहीत. या विरोधात ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’च्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करत आंदोलन छेडले जाईल, असेही समितीने म्हटले आहे.

सामाजिक प्रसारमाध्यमातून तीव्र संताप व्यक्त !

मुंबई – ‘हिंदुस्थान युनिलिव्हर या विदेशी आस्थापनाने ‘दाग अच्छें है’ अशा टॅगलाईनखाली ‘सर्फ एक्सेल’ या कपडे धुण्याच्या चुर्‍याचे विज्ञापन नुकतेच होळीच्या सणाच्या पार्श्‍वभूमीवर प्रसारित केले. त्या विरोधात सामाजिक प्रसारमाध्यमातून अप्रसन्नता व्यक्त होत असून धर्माभिमानी हिंदू ‘ट्विटर’वर त्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त करत आहेत.

‘नेहमी विज्ञापनात हिंदूंंच्या सणांनाच का लक्ष्य केले जाते ?’ ‘असे विज्ञापन हे लव्ह जिहादला खतपाणी घालणारे आहे. अशा प्रकारे तुम्ही अन्य पंथियांच्या सणांच्या वेळी का दाखवत नाही ?’, ‘होळीला उडवलेले पवित्र रंग हे डाग कसे काय ?’, अशी विचारणा करणार्‍या प्रतिक्रिया सध्या सामाजिक प्रसारमाध्यमांतून (सोशल मीडियातून) उमटत आहेत. त्यामुळे ‘सर्फ एक्सेल’ या उत्पादनावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. ‘boycottsurfexcel’ अशा हॅशटॅगखाली अनेक नेटकर्‍यांनी या विज्ञापनावर संताप व्यक्त केला आहे.


Multi Language |Offline reading | PDF