नोटाबंदीला रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाचा विरोध होता !

नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ या दिवशी देशात  घोषित केेलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळातील काही संचालकांचा विरोध होता. मोदी यांच्या घोषणेपूर्वी काही घंटे आधी झालेल्या बैठकीत झालेल्या चर्चेत हा विरोध झाला होता. या बंदीमधील काही कारणांना या संचालकांचा विरोध होता; मात्र जनहिताचा विचार करून त्यांनी या निर्णयाला पाठिंबा दिल्याचे वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने प्रकाशित केले आहे.

१. नोटाबंदीमुळे बनावट नोटा, काळा पैशावर नियंत्रण मिळवता येईल, तसेच डिजिटल व्यवहाराविषयी अधिकाधिक जागरूकता निर्माण करता येईल, असे सरकारकडून सांगण्यात आले होते; मात्र याला संचालकांच्या बैठकीत सहमती नव्हती. मंडळातील प्रत्येक संचालकांनी त्यांचे मत मांडले होते. ‘काळा पैसा बहुतांश सोने आणि मालमत्ता यांच्या स्वरूपात असल्याने नोटाबंदीमुळे त्याच्यावर काहीही परिणाम होणार नाही’, असे मत मांडण्यात आले होते. आताची परिस्थिती पहाता नोटाबंदीचा काळ्या पैशावर काही परिणाम झाला नसल्याचेच लक्षात येत आहे.

२. देशाच्या ‘जीडीपी’वर (सकल राष्ट्रीय उत्पादनावर) याचा नकारात्मक परिणाम होईल, अशी भीतीही संचालकांकडून व्यक्त करण्यात आली होती. असे काही आक्षेप असून सुद्धा नोटाबंदीला रिझर्व्ह बँकेच्या मंडळाने मान्यता दिली. यानंतरच पंतप्रधान मोदी यांनी नोटाबंदीची घोेषणा केली.


Multi Language |Offline reading | PDF