जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शिवयोद्धा संघटनेच्या वतीने सनातन संस्था आणि रणरागिणी गटाच्या प्रतिनिधींचा सत्कार

फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष श्री. प्रदीप नाईक सनातन संस्थेच्या कु. संगीता नाईक यांचा सत्कार करतांना

फोंडा, १० मार्च (वार्ता.) – शिवयोद्धा संघटनेच्या वतीने खडपाबांध, फोंडा येथील विश्‍व हिंदु परिषद सभागृहात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष श्री. प्रदीप नाईक, शिवयोद्धा संघटनेचे मार्गदर्शक तथा अधिवक्ता श्री. गौतम पेडणेकर, संघटनेचे संस्थापक श्री. शिवप्रसाद जोशी आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत कार्य करणार्‍या महिलांचा सत्कार करण्यात आला आणि यामध्ये सनातन संस्थेच्या कु. संगीता नाईक आणि रणरागिणीच्या सौ. राजश्री गडेकर यांचा सहभाग होता.

फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष श्री. प्रदीप नाईक यांच्या हस्ते सनातन संस्थेच्या कु. संगीता नाईक आणि रणरागिणीच्या सौ. राजश्री गडेकर यांचा शाल आणि मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देतांना कु. संगीता नाईक म्हणाल्या, हा सन्मान माझा नसून गेली अनेक वर्षे राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी रात्रंदिवस झटून अध्यात्मप्रसार करणारे सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु प.पू. (डॉ.) जयंत बाळाजी आठवले यांचा आहे. हिंदु संस्कृती फार महान असून ती संपूर्ण जगाला योग्य दिशा देते. हिंदूंनी धर्मानुसार आचरण केल्यास कुटुंब, समाज आणि राष्ट्र यांच्यामध्ये योग्य पालट व्हायला वेळ लागणार नाही. सनातन संस्था गेली २५ वर्षे धर्मप्रसाराचे कार्य अवितरपणे करत आहे. हिंदूंची वेशभूषा कशी असावी ? दैनंदिन जीवन कसे असावे ? सण-उत्सव कसे साजरे करावेत ? यांविषयी सनातन संस्था मार्गदर्शन करत आहे. कु. संगीता नाईक यांनी नामजपाचे महत्त्वही या वेळी सांगितले. या वेळी रणरागिणीच्या सौ. राजश्री गडेकर यांचेही मार्गदर्शन झाले. रणरागिणीच्या राष्ट्र आणि धर्म रक्षणाच्या कार्यात महिलांनी सहभाग घेण्याचे आवाहन सौ. गडेकर यांनी या वेळी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खुशबू कवळेकर यांनी केले.


Multi Language |Offline reading | PDF