नीरव मौजमजा !

संपादकीय

भारतीय बँकांची १३ सहस्र ५०० कोटी रुपयांची फसवणूक करून देशाबाहेर पळून गेलेले नीरव मोदी लंडनमध्ये मौजमजा करत आहेत. ७० कोटींहून अधिक रुपयांच्या बंगल्यात काही लक्ष रुपये भाडे देऊन रहात आहेत. ते लक्षावधी रुपयांचे ‘जॅकेट’ वापरत आहेत. त्यांनी हिर्‍याचा नवीन व्यवसायही चालू केला आहे, अशा बातम्या काल प्रसिद्धीमाध्यमांमध्ये झळकल्या. ब्रिटीश पत्रकार त्यांना प्रश्‍न विचारत आहेत आणि नीरव मोदी दिलखुलासपणे हसत त्यांना टाळत रस्त्यावर मोकळेपणाने चालत असल्याचा व्हिडिओ काल जगाने पाहिला. तेव्हा ‘भारतीय सुरक्षा यंत्रणांना न सापडणारे आणि ‘इंटरपोल’ने नोटीस जारी केलेले हेच का ते नीरव मोदी ?’, असा प्रश्‍न पडला. भारतात राहून अनधिकृतपणे अथवा फसवणूक करून अब्जावधींची माया जमवणारे, गुन्हे करणारे त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाल्यावर कोणालाही कुणकुण लागू न देता देशाबाहेर पोबारा करतात आणि नंतर चालू होतो तो ‘चोर आणि पोलीस यांचा खेळ.’

तसे नीरव मोदी एकटेच असे नाहीत. त्यांचे मामा मेहूल चोक्सी यांनीसुद्धा वेगळ्या देशात आश्रय घेतला आहे. देशातील बँकांना ९ सहस्र कोटी रुपयांचा चुना लावून विजय मल्ल्याही अगदी सुखनैवपणे ब्रिटनमध्ये जीवन जगत आहेत. कुख्यात गुंड दाऊद इब्राहीम पाकमध्ये आश्रय घेऊन भारतात बॉम्बस्फोटांचे कट रचतो आणि अंमलात आणतोे. आयपीएल् क्रिकेट सामन्यांच्या प्रकरणी घोटाळ्यात अडकलेले ललीत मोदी देशाबाहेर राहून ट्वीट करत येथील राजकीय उलथापालथ करण्याचा प्रयत्न करतात. भारताचे गुन्हेगार ना भारतीय पोलिसांना दिसतात ना आंतरराष्ट्रीय पोलिसांना (इंटरपोल); मात्र ते प्रसारमाध्यमांद्वारे जनतेला दिसतात.

ज्या लोकांचे कष्टाचे पैसे गेले, ठेवी बुडाल्या, त्यांना या स्थितीला उत्तरदायी असणारा गुन्हेगार असा मौजमजा करतांना दिसल्यावर काय वाटत असेल ?, याचा शासनकर्ते विचार करतील का ? केवळ काही कायदेशीर प्रक्रिया, तरतुदी पूर्ण करण्याचा वेळकाढूपणा करत बसल्यामुळे अशा गुन्हेगारांचे आयतेच फावते आहे. या ठिकाणी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव ठळकपणे दिसून येतो. इस्रायलचे शासनकर्ते इस्रायली जनतेला त्रास देणार्‍यांना जगातून हुडकून काढून शिक्षा करतात. परिणामी ते केवळ तेथील जनतेच्याच नव्हे, तर जगभरातील लोकांच्या कौतुकास आणि विश्‍वासास पात्र ठरतात. भारतीय शासनकर्ते मात्र कायदेशीर प्रक्रियांच्या नावाखाली हात चोळत बसतात आणि जनतेचा विश्‍वास गमावतात. जगात भारताची प्रतिमा एक नेभळट राष्ट्र म्हणून झाली आहे. मागील ५ वर्षांत ३ ‘सर्जिकल स्ट्राईक’ केल्याचे अभिमानाने सांगितले जात असले, तरी देशाची प्रतिमा सुधारण्यास ते पुरेसे नाहीत. देशाचा गुन्हेगार जगात कुठेही असला, तरी त्याच्या मुसक्या आवळण्याची आणि जगाला ‘भारताची कृती योग्य आहे’, असे पटवून देण्याची धमक जोपर्यंत शासनकर्त्यांमध्ये येत नाही, तोपर्यंत असे गुन्हेगार भारताबाहेर पळून जाण्याचे प्रकार थांबणार नाहीत. हे होण्यासाठी जनतेने शासनकर्त्यांवर दबाव निर्माण करणे आवश्यक आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now