दैनिक सनातन प्रभातमधील ऋतुनुसार दिनचर्येत करण्याचे पालट सांगणारा लेख वाचून आधीच्या पिढीतील लोकांच्या धर्माचरणाचे आणि त्यातून त्यांना होणार्‍या लाभाचे स्मरण होणे

श्रीमती रजनी नगरकर

‘दैनिक सनातन प्रभातमधून ‘प्रत्येक ऋतुमानात आहार-विहार कसा असावा’ याविषयी वैद्य मेघराज पराडकर साधकांना नियमितपणे सूचना सांगतात. हिवाळा आला की, उन्हात बसा आणि शरिरात अल्प असलेले ‘ड’ जीवनसत्त्व वाढवा ही सूचना देतातच. प्रतिदिन व्यायाम करा, प्रशिक्षण करा, बिंदूदाबन करा, अशा अनेक सूचना दैनिकातून साधकांना मिळत असतात. या सूचना वाचून जाणवलेली सूत्रे पुढे देत आहे.

१. पूर्वीच्या काळी नित्य कृतींमधूनच आरोग्यविषयक कृती सहजपणे घडत असणे आणि आज त्यासाठी वेगळे पैसे मोजूनही वेळ नसणे

१ अ. देवपूजेसाठी पत्री आणण्यासारख्या कृतीतून आपोआप पावलांचे बिंदूदाबन होत असणे : पूर्वीच्या काळी कुठे या सूचना नागरिकांना मिळत होत्या ? साधी गोष्ट. माणसांना दूर्वा काढायला, बेल आणायला लांब लांब जावे लागायचे. तेही चप्पल न घालता जायचे ! यातून चालणे तर व्हायचेच, त्याचसमवेत आपोआप पावलांचे बिंदूदाबनही होत असे आणि त्या वनस्पतीतून येणारी देवतेची स्पंदने त्या व्यक्तीला मिळत असत.

गवतातून चालल्यामुळे पायांना लाभच होत असे. आता त्यासाठी घराभोवती मुद्दाम ‘लॉन’ करावे लागतात, त्याला राखण्यासाठी पैसेही खर्च करावे लागतात, तरी त्यात वावरायला माणसाला किती वेळ मिळतो ? केवळ छायाचित्रे काढण्यापुरती ही सजावट असते !

१ आ. जात्यावर दळण दळल्याने व्यायाम, घरचे दळण आणि भगवंताच्या स्मरणाने दिवसाचा आरंभ, असा तिहेरी लाभ होत असणे : पूर्वी महिला पहाटेच दळण दळत होत्या. मला आठवते आमच्या वाड्यातील एक गृहिणी पहाटेच मोकळ्या आवाजात जात्यावरच्या ओव्या गात दळण दळत असे आणि त्या आवाजामुळे आम्हाला जाग येत असे. मी त्यांना कधी कधी म्हणायचे, ‘‘तुम्ही आम्हाला सकाळी झोपू का देत नाही ?’’

जात्यावर दळण दळल्याने ३ गोष्टी साध्य होत होत्या, व्यायाम, घरचे दळण आणि ‘पहाटेच्या समयी मुखे म्हणा हरि हरि’, म्हणजे भगवंताच्या स्मरणाने दिवसाचा आरंभ !

१ इ. पाटा-वरवंट्याच्या उपयोगाने स्त्रियांच्या हातांना आणि कमरेला व्यायाम होत असणे : पूर्वी प्रतिदिन आहारात ताटात डाव्या-उजव्या बाजूंचे पदार्थ आवर्जून केले जायचे. डाव्या बाजूला चटणीही असायची. ती लागायची थोडीच; पण आतासारखी ‘मिक्सर’मधली नाही, तर पाट्यावर वाटलेली मऊसूत. तिची एक वेगळीच चव असायची.

पाडवा, श्रावणी शुक्रवार, महालक्ष्मी, दसरा यांसारख्या काही ठराविक मोठ्या सणांच्या वेळी पुरणपोळी हेच पक्वान्न असायचे. सर्व स्वयंपाकासमवेत या पक्वान्नाचा नैवेद्य देवाला दाखवला जायचा. घरातील सर्व कामकाज सांभाळून, सर्व स्वयंपाकासह पुरणपोळीचा नैवेद्य वेळेवर सिद्ध (तयार) असायचा आणि हे सर्व सहजतेने व्हायचे. ‘पुरणपोळी हा ‘पूर्ण’ स्वयंपाक’, असे माझी आई म्हणत असे. पुरण वाटतांना स्त्रियांच्या हातांना आणि कमरेला व्यायाम व्हायचा. उकिडवे बसण्याची सवय रहायची. त्यामुळे त्या घरचे काम सहजतेने करायच्या. आता ‘मिक्सर’ लावायचाही गृहिणीला कंटाळा येतो. त्यांच्याकडे वेळही नसतो. त्यामुळे आता सिद्ध केलेल्या पुरणपोळ्याही बाजारात मिळतात.

१ ई. विविध सणांच्या वेळी खेळल्या जाणार्‍या खेळांमुळे आरोग्य चांगले रहाण्यास साहाय्य होत असणे : नागपंचमी, मंगळागौर, हरितालिका, अष्टमी यांसारख्या विविध सणांच्या वेळी लहान-थोर सर्वच वयोगटांतील स्त्रिया झिम्मा, फुगडी, फेर, गाठोडे असे विविध प्रकारचे खेळ खेळायच्या. त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले रहायचे.

सध्या शाळेत बसायला बेंच, घरी जेवायला ‘टेबल-खुर्ची’, झोपायला दिवाण, पलंग; अगदी शौचाला पाश्‍चात्त्य पद्धतीचे शौचालय (कमोड) ! धुणे धुवायला यंत्र, स्वयंपाक घरात उभ्याचा ओटा, वाटायला ‘मिक्सर’ ! सारे यंत्रमय जीवन ! त्यामुळे आताच्या मुलांना चटकन मांडी घालून सुखासनात बसता येत नाही. पद्मासन तर सोडूनच द्या.

महिला उभ्यानेच वेणी-फणी करतात. पाणी भरावे लागत नाही; कारण सिटेंक्सच्या टाक्या भरलेल्या असतात. सकाळी दारापुढे रांगोळी काढत नाहीत. भाजी निवडायला बसत नाहीत. सध्या बर्‍याच गृहिणी निवडलेले धान्य, दळलेली पिठे, निवडलेल्या भाज्या विकत आणण्यास प्राधान्य देतात. सध्या शहरांतून आपल्या कुटुंबाला एक वेळ पुरेल एवढी निवडलेली भाजी, त्यासाठी लागणारे मिरची, लसूण, आले, खोबरे असे मसाल्याचे सर्व साहित्य उपलब्ध असते. पोळ्याही करायला नकोत, पोळ्यांची दुकाने आता सर्रास असतात. दळण घेऊन जाणारी गृहिणी फार क्वचित दिसते. जी जाते ती वेडी; कारण अनावश्यक गोष्टीत ती वेळ देते ना ! तोच वेळ दूरदर्शनवरील एखादी मालिका बघण्यात किंवा ‘फेसबूक’वर आलेले संदेश, भ्रमणभाष संचावर ‘अ‍ॅप्स’ वर आलेले संदेश वाचण्यात आणि अन्य काही बघण्यात वेळ घालवलेला त्यांना चालतो.

१ उ. पहाटे उठून स्नानादी कर्मे उरकल्याने सात्त्विकता आणि चैतन्य यांचा लाभ सहजतेने मिळत असणे : पूर्वी पहाटे काकडआरती असायची. त्यामुळे पहाटे उठून स्नानादी आटोपून स्त्रिया देवळात जायच्या. त्यामुळे पहाटेच्या सात्त्विकतेचा लाभ घेणे आणि देवतेचे चैतन्य ग्रहण करणे त्यांना सहज शक्य होत होते. सणासुदीला पहाटेच्या अभ्यंगस्नानाचाही लाभ सर्वांना होत असे. देवतांचे दर्शन, साधकांचा सत्संग, साधनेच्या भावविश्‍वात स्त्री-पुरुष रमत असत.

सध्या बाहेर फिरायला निघतात, ते रात्र झाल्यावर. रात्रीच्या वेळी दूरदर्शन मालिका, चित्रपट बघायला. त्यात युवा पिढीला धरबंद नसतो आणि सकाळी उठायलाही धरबंद नसतो.

१ ऊ. चातुर्मासात केलेल्या नियमांमुळे अनेक गोष्टी साध्य करणे : पूर्वी महिला चार्तुमासात एखाद्या लांबच्या देवाला जाण्याचा नियम करायच्या, तेही कोणत्याही कामात सवलत न घेता ! त्यांच्या दुपारच्या विश्रांतीच्या वेळेत त्या आपला नियम पूर्ण करायच्या. त्यात देवतांच्या सान्निध्यासमवेतच मोकळ्या वातावरणात जाणे, एकत्र येणे, पाय मोकळे करणे, अशा अनेक गोष्टी त्या सहज साध्य करायच्या.

आता फिरायला जाणे ठाऊक नाही; कारण घरात प्रत्येकाच्या नावाची दुचाकी आणि चारचाकी उपलब्ध असते. अगदी जवळ जायचे असेल, तरी ते गाडीविना जात नाहीत. स्वयंपाक झाला नाही, तर कार्यालयात ‘कॅन्टीन’ असतेच. मुलांना ‘पॉकेट-मनी’ दिला की, हवे ते खायला मिळाले; म्हणून मुलेही खुश !

१ ए. पारंपरिक पोशाखात जुन्या अवजारांसहित कामे करण्याने सात्त्विकतेचा लाभ मिळून आरोग्यही चांगले रहाणे : अहो, एवढेच काय शेतातील सर्व कामे करण्यासाठी आता यंत्रे आल्याने जुने नांगर धरणे किती नवीन शेतकर्‍यांना ज्ञात आहे ? ही सर्व कामे करतांना आतासारखे बर्मुडा किंवा जीन्स घालणे, ड्रेस घालणे, गाऊन चढवणे नव्हते. स्त्री-पुरुषांना भारतीय पारंपरिक पोशाखात वावरावे लागायचे. त्यात त्यांना कुठे सवलत नव्हती. पारंपरिक पोशाखामुळे सर्वांना सात्त्विकतेचा लाभ मिळत असे आणि जुन्या अवजारांच्या उपयोगामुळे शारीरिक श्रम होऊन आरोग्यही चांगले रहात असे.

२. नवीन पिढी घडवण्याचे दायित्व स्वीकारून ‘जुने ते सोने’ ही म्हण सार्थ ठरवण्यासाठी सिद्ध होणे अपेक्षित !

आता तुम्ही म्हणाल, ‘काळ पालटला आहे. सुविधा असतांना कशाला त्या जुन्या रहाटगाडग्यात अडकवता ? तेच-तेच सांगून काही पालट होणार आहे का ? काळानुसार चालायलाच हवे ना !’ हो, सुविधांचा लाभ अवश्य घ्या; पण धर्माचरण, आपल्या रीती-भाती मात्र सोडू नका. हिंदु धर्माची शिकवण थोर आहे. ती काळानुसार आणि ऋतुमानानुसार आहे, हे विसरू नका. आज तुम्ही केले नाही, तर तुमच्या मुलांना पुढे काय समजणार ? देवाने आपल्याकडे मुलांना घडवण्याचे दायित्व दिलेले असते. मुले अनुकरणशील असतात. ही सूत्रे लक्षात घेऊन हिंदु राष्ट्राची पिढी घडवण्यास आज नाही, आत्ताच सिद्ध व्हा.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले धर्माचरणाचे महत्त्व साधकांच्या मनावर बिंबवून हिंदु राष्ट्रातील नवीन पिढी घडवत असणे

सनातनच्या रामनाथी आश्रमात मात्र यातील बर्‍याचशा गोष्टी राबवल्या जातात. मुली अंगण सारवू शकतात. भांडी घासू शकतात. प्रतिदिन झाडणे, पुसणे या नित्य सेवा त्या सहजतेने करतात. आलेल्या पाहुण्यांना आपल्या हिंदु पद्धतीनुसार भोजन वाढू शकतात. अर्थात् हे सर्व आम्हाला शिकवत आहेत, परात्पर गुरु डॉक्टर आठवले ! धर्माचरण केल्याने त्यातून साधकांची साधना व्हावी, असेच त्यांना वाटते. हीच पिढी हिंदु राष्ट्राचे दायित्व घेऊन पुढील पिढी सिद्ध करील.

तेव्हा एक सांगावेसे वाटते की, साधकांनो नवीन उपकरणांचा लाभ अवश्य घ्या; पण घालून दिलेल्या रीती आणि परंपरा विसरू नका. त्याच आपल्याला तारणार आहेत. सक्षम शरीर देणार आहेत. निरोगी शरीर असल्यासच चांगली साधना करता येते. शरीराविना आपण साधना करू शकणार नाही. मनुष्य जन्मातच साधना करता येते. शरीर सुदृढ असेल, तर साधनेत गती प्राप्त होईल. हे आपण लक्षात ठेवूया.

जुने तेच सोने । हे हिंदु धर्माचे मर्म ।

ते आचरणात आणणे । हे साधकाचे सत्कर्म ।

घडेल नवी पिढी । देईल तुम्हाला दुवा ।

मन, शरीर राहील सुदृढ । हवा कशाला दवा ॥’

– रजनी नगरकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.


Multi Language |Offline reading | PDF